'कोथिंबीर' चा वापर आपण जेवणात रोज करतो. कोणताही पदार्थ तयार करुन झाल्यानंतर त्यावर मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घातली की त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते. पोहे, उपमा यांसारखे काही खास पदार्थ असतात यावर जर कोथिंबीर भुरभुरलेली नसेल तर हे पदार्थ खायला मजा येत नाही. कोथिंबीर आपल्या फ्रिजमध्ये कायम स्टोअर करुन ठेवलेली असतेच. काहीवेळा असं होत की भाजी करण्यासाठी फ्रिजमध्ये एकही भाजी नसते. अशावेळी नेमकं काय करावं हे समजत नाही. अशा परिस्थितीत जर कोथिंबीरची एक जुडी असेल तर कामच फत्ते ! (How to make Kothimbir Zunka).
नेहमी भाजीला काय करावं हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडलेला असतो. रोज त्याच त्या भाज्या, आमट्या खाऊन कंटाळाही येतो. अशावेळी अगदी कमी साहित्यात झटपट काहीतरी करता येईल अशी सोपी भाजी म्हणजे कोथिंबीरची पीठ पेरून केलेली भाजी. ही भाजी करण्यासाठी अगदी बेसिक साहित्य लागत. जर घरात बेसन आणि कोथिंबीर असेल तर आपण ही भाजी अगदी ५ मिनिटांत तयार करु शकतो. ही भाजी आपण चपाती, भाकरी सोबत खाऊ शकतो. फक्त एक जुडी कोथिंबीर वापरुन आपण ही पटकन होणारी कोथिंबीरची भाजी अगदी सहज तयार करु शकतो. पीठ पेरुन कोथिंबीरची भाजी कशी करावी याची सोपी रेसिपी पाहूयात(CORIANDER AND BESAN CURRY)
साहित्य :-
१. कोथिंबीर - १ जुडी
२. तेल - गरजेनुसार
३. जिरे - १/२ टेबलस्पून
४. मोहरी - १/२ टेबलस्पून
५. कढीपत्ता - ५ तर ६ पाने
६. पाणी - गरजेनुसार
७. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
८. कांदा - लसूण मसाला - १ टेबलस्पून
९. हळद - चिमूटभर
१०. मीठ - चवीनुसार
११. बेसन - २ टेबलस्पून
१२. लिंबाचा रस - १ टेबलस्पून
आजी आषाढात हमखास करायची तसे लाल भोपळ्याचे घारगे करण्याची पारंपरिक रेसिपी - पावसाळा स्पेशल...
उपवासाचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? शेफ रणवीर ब्रार सांगतात ' हे ' तेल बेस्ट...
कृती :-
१. एका मोठ्या कढईत तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, हळद, कढीपत्ता घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.
२. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
३. कोथिंबीर घातल्यानंतर यात चवीनुसार लाल तिखट मसाला, हळद, मीठ आणि थोडे पाणी घालावे.
४. सगळ्यात शेवटी यात कोरडे बेसन भुरभुरवून घालावे.
५. ही भाजी चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावी त्यानंतर या भाजीत लिंबाचा रस घालावा.
ही गरमागरम कोथिंबीरीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. बेसन पिठाच्या झुणक्याप्रमाणेच आपण ही भाजी भाकरी किंवा चपाती सोबत खाऊ शकता.