Join us  

उपवासाला करा चटपटीत चाट! शिंगाड्याच्या पिठाचा दही भल्ली.. चवीला भारी करायला सोपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 8:14 AM

उपवासालाही चटपटीत चाट (chat for fasting) तयार करता येतं. शिंगाड्याचा पिठाचा दही भल्ला करुन आपण ही इच्छा सहज पूर्ण करु शकतो. चवीला चटपटीत लागणारा दही भल्ला तयार करण्यासाठी फक्त शिंगाड्याचं पीठ, बटाटा, दही आणि मोजक्या मसाल्यांची आवश्यकता असते.

ठळक मुद्देभल्ल्यांसाठी शिंगाड्याचं पीठ मळताना ते मऊ मळावं.भल्ले तळून झाल्यावर पाण्यात बुडवून ठेवावेत. 

उपवासाला खाण्या-पिण्याच्या पदार्थांवर बरेच निर्बंध असतात. उपवासाला अमूक चालत नाही, तमूक खायचं नसतं म्हणून तोंडाला अगदी कुलुप लागलेलं असतं. आणि नेमकं उपवासाच्या दिवशीच भजी, समोसे, चटपटीत चाट खावंसं वाटतं. उपवासाला चाट खावंसं वाटत असेल तर ही इच्छा उपवास आहे म्हणून पूर्ण होणार नाही असं अजिबात नाही. उपवासालाही चटपटीत चाट  (chat for fasting) तयार करता येतं. शिंगाड्याचा पिठाचा दही भल्ला करुन आपण ही इच्छा सहज पूर्ण करु शकतो. चवीला चटपटीत लागणारा दही भल्ला तयार करण्यासाठी (how to make kuttu dahi bhalla )  फक्त शिंगाड्याचं पीठ, बटाटा, दही आणि मोजक्या मसाल्यांची आवश्यकता असते.

 

कसा करायचा उपवासाचा दही भल्ला

शिंगाड्याच्या पिठाचा दही भल्ला करण्यासाठी अर्धा किलो शिंगाड्याचं पीठ, पाव किलो उकडलेले बटाटे, पाव किलो ताजं दही, 1 कप तेल, चवीनुसार सैंधव मीठ, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, 7-8 बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा काळे मिरे पूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, 3 चमचे साखर आणि  1 कप डाळिंबाचे दाणे घ्यावे. दही भल्ला करताना एका मोठ्या भांड्यात शिंगाड्याचं पीठ, बटाटे, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि सैंधव मीठ घालून मिश्रण मऊसर मळून घ्यावं. गॅसवर तेल गरम करण्यास ठेवावं.  पिठाचे छोटे छोटे गोळे करुन ते दोन्ही हातात ठेवून थोडे चपटे करुन घ्यावे. हे चपटे करुन घेतलेले गोळे म्हणजेच भल्ले . हे भल्ले तेलात चांगले तळून घ्यावेत. तळलेले भल्ले काढून ताटात ठेवावेत. एका भांड्यात पाणी घ्यावं. त्यात तळलेले भल्ले बुडवून ठेवावे. 

Image: Google

भल्ले  पाण्यात बुडवून ठेवल्यावर  दह्याचं मिश्रण तयार करुन घ्यावं. त्यासाठी दही फेटून घ्यावं. फेटलेल्या दह्यात साखर, काळे मिरे पूड, जिरे पूड आणि चवीनुसार सैंधव मीठ घालून ते दह्यात नीट कालवून घ्यावं. भल्ले पाण्यातून काढून दोन्ही हातात दाबून पाणी काढून घ्यावं. हे भल्ले एका खोलगट डिशमध्ये ठेवून त्यावर वरुन दह्याचं मिश्रण घालावं. भल्ल्यांवर दही घातल्यानंतर वरुन डाळिंबांचे दाणे घालावेत. आवश्यकता वाटल्यास सैंधव मीठ घालून या चटपटीत दही भल्ल्यांचा आस्वाद घ्यावा. शिंगाड्याच्या पिठाचे हे दही भल्ले उपवासालाच नाही तर एरवी खायला छान लागतात. सध्या उपवासाचा हंगाम आहे तर एकदा शिंगाड्याच्या पिठाचे हे दही भल्ले अवश्य करुन पाहावेत. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.श्रावण स्पेशल