Join us  

रोजचं वरण होईल आता एकदम चविष्ट, घरीच करा खास पारंपरिक आमटी मसाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 1:19 PM

How To Make Maharashtrian Amti Masala At Home : Homemade Masala Recipe : हा आमटी मसाला नेमका बनवायचा कसा? त्याचे साहित्य व कृती काय आहे ते पाहूयात.

'आमटी' हा आपल्या भारतीय जेवणातील एक खास पदार्थ आहे. भारतीय जेवणाच्या थाळीमध्ये आमटीला विशेष महत्व असते. ही चमचमीत, मसालेदार आमटी भात आणि चपातीसोबत खायला अतिशय चवीची लागते. महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रकारची आमटी केली जाते. तुरीच्या किंवा मुगाच्या डाळीच्या वरणाला फोडणी देऊन, वर भरपूर पाणी घालून जो पातळ पदार्थ बनतो त्याला आमटी म्हणतात. आमटीसाठी या पातळ पदार्थात चिंचेचा कोळ, आमसूल,आमचूर, गूळ, ओले खोबरे, मसाल्याची पूड, मीठ असे काही जिन्नस चवीप्रमाणे टाकून भरपूर उकळतात. त्यामुळेच ही आमटी चवीला खूपच छान लागते. 

आपल्या रोजच्या जेवणात डाळींचा समावेश जास्त असतो. तसेच त्यापासून बनणारे वरण, आमटी, साधे वरण, फोडणीचे वरण, वाटणाचे गोडे वरण, आंबट वरण, मसुराची तिखट आमटी, चिंच गुळाची आमटी, कटाची आमटी असे असंख्य आमटीचे प्रकार केले जातात. भारतीय सणांच्या खास दिवशी सगळ्याच घरांमध्ये 'आमटी' हा पदार्थ आवर्जून केला जातो. तसेच चवीने खाल्ला देखील जातो. वेगवेगळ्या कडधान्यांची देखील आमटी केली जाते. ही आमटी अधिक चविष्ट होण्यासाठी त्यात अनेक पदार्थ घातले जातात, त्यापैकीच आमटी मसाला हा एक विशेष मसाला आहे. जो खास आमटीची चव वाढवण्यासाठी घातला जातो. हा आमटी मसाला नेमका बनवायचा कसा? त्याचे साहित्य व कृती काय आहे ते पाहूयात(How To Make Maharashtrian Amti Masala At Home : Homemade Masala Recipe).

साहित्य :- 

१. धणे - १ कप २. तेल - ४ ते ५ टेबलस्पून ३. जिरे - १/२ कप  ४. सुके खोबरे - १ कप ५. काश्मिरी लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४ ६. हळद - १/२ टेबलस्पून ७. हिंग - १/४ टेबलस्पून ८. मेथी दाणे - १ टेबलस्पून ९. कढीपत्ता - २० ते २५ पाने 

ताजा-चविष्ट आणि परफेक्ट साऊथ इंडियन चवीचा सांबार मसाला करण्याची रेसिपी, घरातल्या सांबाराचा दरवळेल सुगंध..

भरली मिरची करण्याची झटपट झणझणीत सोपी रेसिपी, भरली मिरची खाल्लीच नाही तर काय मजा जेवणाची...

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठ्या पॅनमध्ये चमचाभर तेल घेऊन त्यात धणे खरपूस भाजून घ्यावेत. धणे भाजून झाल्यानंतर ते एका वेगळया डिशमध्ये काढून ठेवावे. २. त्यानंतर पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे घालावे हे जिरे तेलात भाजून घ्यावे. जिरे भाजून झाल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून बाजूला ठेवावे. ३. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात किसलेलं सुक खोबर भाजून घ्यावे. हे सुक खोबर भाजल्यानंतर बाजूला काढून ठेवावे. 

स्वत:लाच द्या स्पेशल दावत, घरच्याघरी ‘दाल मखनी’ करण्याची सोपी रेसिपी- नेहमीच्या डाळीपेक्षा खास...

४. त्यानंतर पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात काश्मिरी लाल सुक्या मिरच्या, हळद, हिंग घालून हे सगळे जिन्नस एकत्रित तेलात भाजून घ्यावेत. ५. आता पॅनमध्ये  थोडे मेथी दाणे घेऊन ते तेलात व्यवस्थित भाजून घ्यावे. ६. पॅनमध्ये परत तेल घेऊन त्यात कढीपत्ता घालून तो हलकेच भाजून घ्यावा. ७. आता हे भाजून घेतलेले सगळे जिन्नस एकत्रित करून मिक्सरमध्ये वाटून त्याची पावडर करून घ्यावी. 

आपला आमटी मसाला तयार आहे. हा आमटी मसाला एका हवाबंद डब्यात व्यवस्थित स्टोअर करून ठेवावा. हा आमटी मसाला हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवल्यास किमान ३ ते ४ महिने चांगला टिकून राहतो.

टॅग्स :अन्न