'कोशिंबीर' हा आपल्या रोजच्या जेवणातला मुख्य पदार्थ आहे. जेवणात जर कधी आवडती भाजी नसली की तोंडी लावायला म्हणून आपण लगेच कोशिंबीर बनवतो. काकडी, कांदा,दही, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबूरस यांच्या मिश्रणापासून आपण झटपट चविष्टय कोशिंबीर बनवू शकतो. कोशिंबीर ही वेगवेगळ्या प्रकारांत बनविली जाते. कोशिंबीर खूप कमी वेळात, अगदी कमी साहित्यात उत्तम बनू शकते. उन्हाळ्यात आपल्या पोटाला थंडावा मिळण्यासाठी आपण दुपारच्या जेवणांत बऱ्याचदा कोशिंबीरचा समावेश करतो. कोशिंबीरमध्ये असणारे दही आणि काकडी हे आपल्याला उन्हाळ्यांत हायड्रेटड ठेवण्यास मदत करतात.
कोशिंबीर म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कोशिंबीरमध्ये असणारी क्रिमी दह्याची टेस्ट आणि कापून बारीक चिरलेल्या भाज्या यामुळे अनेकांना कोशिंबीर प्रिय असते. पूर्वीच्या काळी लग्नात मसाले भात व त्यासोबत दही आणि काकडीची पारंपरिक कोशिंबीर दिली जायची. या पारंपरिक कोशिंबीरची चवच खूप सुंदर लागते. कोशिंबीरीची विशेषतः म्हणजे ती बनवताना शिजवावी लागत नाही. झटपट ५ ते १० मिनिटात तयार होते. यंदाच्या उन्हाळ्यांत दही व काकडीची पारंपरिक कोशिंबीर आपल्याला हायड्रेटड व थंडगार ठेवण्यास मदत करेल(How To Make Maharashtrian Khamang Kakdi Chi Koshimbir : Recipe).
साहित्य :-
१. चोचवलेली काकडी - १ कप (एकदम बारीक चिरून घेतलेली)२. दही - १/२ कप३. साखर - १ टेबलस्पून ४. मीठ - चवीनुसार ५. दाण्याचा कूट - २ टेबलस्पून ६. हिरवी मिरची - १ (बारीक चिरुन घेतलेली)७. कोथिंबीर - २ टेबलस्पून ८. किसून घेतलेलं खोबर - १ टेबलस्पून ९. तेल - १ टेबलस्पून १०. मोहरी - १/२ टेबलस्पून ११. कढीपत्ता - ३ ते ४ पानं
कृती :-
१. सर्वप्रथम, काकडीची साल काढून काकडी चोचवून (एकदम बारीक चिरुन घ्यावी) घ्यावी. २. आता एका बाऊलमध्ये दही घेऊन ते चांगले फेटून घ्यावे. ३. दही चांगले फेटून घेतल्यानंतर त्यात दाण्याचा कूट, चवीनुसार मीठ व साखर, किसून घेतलेलं खोबर घालून हे सगळे जिन्नस एकजीव करुन घ्यावे.
४. आता या मिश्रणांत चोचवून घेतलेली काकडी व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. ५. एका पॅनमध्ये तेल घेऊन गॅस मंद आचेवर ठेवून या तेलात मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून खमंग फोडणी तयार करुन घ्यावी.६. तयार करून घेतलेली खमंग फोडणी कोशिंबीरवर ओतावी. आता ही फोडणी चमच्याच्या मदतीने ढवळून कोशिंबीर व फोडणी एकजीव करुन घ्यावी.
काकडीची पारंपरिक थंडागार कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे. ही कोशिंबीर सर्व्ह करतांना आपल्या आवडीनुसार त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरवून घालावी.