Join us  

होळी स्पेशल : होळीचे रंग खेळताना ‘मालपुआ’ तर खायलाच हवा, पारंपरिक परफेक्ट मालपुआची मस्त रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2023 12:50 PM

How To Make Malpua At Home : Malpua Recipe Crisp & Fluffy : मालपुआ घरी करणं अवघड असं अनेकांना वाटतं पण ते खरं नाही.

'मालपुआ' हा उत्तर भारतीय गोड पदार्थ जरी असला तरी हा पदार्थ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बनवला जातो. महाराष्ट्रात जसे वेगवेगळ्या सणांना खीर, पुरणपोळी, मोदक केले जातात, तसेच उत्तर भारतात 'मालपुआ' हा विशेष सण, समारंभासाठी बनवला जातो. 'मालपुआ' हा पदार्थ दिसताना पॅन केक सारखा दिसतो. काही विशेष सणांना नैवेद्य म्हणून, जेवणातील गोड पदार्थ किंवा जेवणांनंतर डेझर्ट म्हणून आपण 'मालपुआ' आवडीने खातो.

कोणताही सण आला की, गोडधोड पदार्थांची रेलचेल प्रत्येकाच्याच घरांत असते. महाराष्ट्रांत होळीच्या सणाला पुरणपोळीचे जसे महत्व असते तसेच उत्तर भारतात होळीच्या सणाला 'मालपुआ' बनवला जातोच. भारतांतील वेगवेगळ्या शहरात वेगवेगळ्या नावाने मालपुआला ओळखले जाते. विशेषत: सणांच्या दिवशी हा पदार्थ भारतीय घरांमध्ये सर्वात जास्त तयार केला जातो. सगळ्यांच भारतीयांच्या आवडत्या फूडलिस्टमध्ये पहिले स्थान असलेला 'मालपुआ', घरच्या घरी झटपट कसा बनवावा याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Malpua At Home : Malpua Recipe Crisp & Fluffy).  

साहित्य :- 

१. गव्हाचे पीठ - ३/४ कप २. रवा - १/४ कप ३. मावा - १/४ कप४. वेलची पावडर - १/२ टेबलस्पून ५. बडीशेप पावडर - १/४ टेबलस्पून ६. फ्रेश क्रिम - २ टेबलस्पून ७. दूध - १, १/२ कप ८. तूप - ४ ते ५ टेबलस्पून ९. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या - १ टेबलस्पून १०. ड्रायफ्रूटचे काप - १ टेबलस्पून 

साखरेचा पाक बनविण्याचे साहित्य :- 

१. साखर - १ कप २. पाणी - १ कप ३. केसर - ५ ते ६ काड्या ४. वेलची पूड - १/४ टेबलस्पून 

कृती :- 

साखरेचा पाक बनविण्याची कृती:- 

१. साखरेचा पाक तयार करण्यासाठी एका भांड्यात, साखर, पाणी, केसर, वेलची पूड घालून ते किमान ५ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे. साखरेचा पाक तयार करत असताना, चमच्याने तो सतत ढवळत रहावा. हा पाक हाताला चिकट व त्याची एक तार तयार झाल्यावर गॅस बंद करून, हा पाक एका वेगळ्या भांड्यात काढून घ्यावा.    

मालपुआ बनविण्याची कृती:- 

१. एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात रवा, मावा, वेलची पावडर, बडीशेप पावडर, फ्रेश क्रिम, दूध घालून त्याचे मध्यम कन्सिस्टंन्सीचे बॅटर तयार करुन घ्यावे. २. मालपुआचे बॅटर तयार करताना त्यात पिठाच्या गुठळ्या राहणार नाही याची खात्री करुन घ्यावी. ३. आता एका कढईत तूप घेऊन ते व्यवस्थित वितळवून घ्यावे. 

४. गरम तूपात मालपुआचे बॅटर चमच्याने गोलाकार आकारात सोडावे. त्यानंतर हे मालपुआ दोन्ही बाजुंनी खमंग तूपात तळून घ्यावेत. ५. त्यानंतर तूपात खमंग तळून घेतलेले मालपुआ साखरेच्या पाकात २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून ठेवावेत. ६. मालपुआ साखरेच्या पाकात २ ते ३ मिनिटांसाठी बुडवून ठेवल्याने, मालपुआ साखरेचा पाक शोषून घेतो. 

मालपुआ खाण्यासाठी तयार आहे. मालपुआ खाण्यासाठी सर्व्ह करताना त्यावर थोडासा साखरेचा पाक व आवडीनुसार ड्रायफ्रुटसचे काप घालून सर्व्ह करावा.

टॅग्स :अन्नपाककृती