'काजू' हा सुक्यामेव्यातील सर्वात महत्वाचा पदार्थ आहे. पांढऱ्याशुभ्र काजूंची चव कायम आपल्या तोंडात रेंगाळत रहाते. समोर काजू दिसले की ते कितीही खाल्ले तरीही पोटच भरत नाही. सध्या आंबा - कैरी मिळण्याच्या या ऋतूत बाजारांत ओले काजूगर सहज विकत मिळतात. आंबा, कैरी सोबतच आपण ओल्या काजूगरांपासून वेगवेगळे पदार्थ तयार करुन आवडीने खातो. एरव्ही वर्षभर सुके काजू भाजून, खारवून, तिखट-मीट लावून खाण्यात तर मजा असतेच, परंतु ऐन मोसमात ओल्या काजुची उसळ किंवा भाजी खाल्ली नाही तर आपण खवय्ये कसले?
सहसा गोड पदार्थांमध्ये किंवा पुलावभातामध्ये आपण काजू घालतो. विशिष्ट्य पदार्थांमध्ये काजू घातले तर त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते व पदार्थ खायला मजा येते. भाजीचे ओले काजू हे चवीला कोवळे असतात. म्हणूनच त्याची चव खूप छान लागते. साधारण उन्हाळा सुरु झाला की, बाजारात कैरी, आंबे, फणस, काजू दिसू लागतात. कोकणातील हा खास मेवा चाखण्याची हीच तर एक संधी असते. ओले काजू ही कोकणातील खासियत. या ओल्या काजूपासून बनवली जाणारी उसळ किंवा भाजी ही इतर सगळ्या भाज्यांना चवीमध्ये मागे टाकू शकते. ओल्या काजूगरांची ही झक्कास मालवणी स्टाईल रेसिपी नक्की ट्राय करा(How To Make Malvani Style Kajuchi Bhaji).
साहित्य :-
१. ओले काजू - १ कप २. सुक खोबर - १ कप (सुके भाजून घेतलेले)३. कांदा - १ कप (उभा चिरुन भाजून घेतलेला)४. आलं - १ टेबलस्पून (किसून घेतलेलं)५. कोथिंबीर - २ टेबलस्पून ६. लसूण पाकळ्या - १० ते १२ ७. कांदा - १ कप (बारीक चिरुन घेतलेला)८. टोमॅटो - १ कप (बारीक चिरुन घेतलेला) ९. हळद - १/२ टेबलस्पून १०. मीठ - चवीनुसार ११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून१२. धणेपूड - १ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम ओले काजू घेऊन ते स्वच्छ धुवून घ्यावेत, आता एका भांड्यात पाणी घेऊन हे काजू हलकेच उकळवून घ्यावे. २. आता या उकळवून घेतलेल्या काजूच्या साली काढून घ्याव्यात. साल काढून घेतल्यानंतर परत एकदा काजू स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावेत.३. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेलं सुक खोबर, आलं, कोथिंबीर, भाजून घेतलेला कांदा, भाजून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून त्याचे मिक्सरला थोडे पातळ वाटप काढून घ्यावे.
अस्सल सोलापुरी शेंगदाण्याची चटणी करा १० मिनिटांत, सोलापुरी चटणीची पारंपरिक रेसिपी...
४. त्यानंतर एका भांड्यात तेल घेऊन त्यात फोडणीसाठी लसूण पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा घालावा. ५. आता याच फोडणीत हळद, धणेपूड, लाल तिखट मसाला व बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. आता या फोडणीत मिक्सरला वाटून घेतलेले वाटप घालावे. सगळ्यात शेवटी या तयार झालेल्या ग्रेव्हीत सोललेले काजू घालावेत. ६. हे मिश्रण थोडे चमच्याच्या मदतीने हलवून घ्यावे. आता या ग्रेव्हीत आपल्या आवडीच्या कंन्सिस्टंसी नुसार पाणी घालावे. आता एक उकळी काढून घ्यावी.
आपली ओल्या काजूंची मस्त चमचमीत रस्सेदार भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी सर्व्ह करताना त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरावी व गरमागरम चपाती, तांदळाची भाकरी किंवा भातासोबत सर्व्ह करावी.