Join us  

पराठा चमचमीत करण्यासाठी ही घ्या ‘पराठा मसाला मिक्स’ची खास रेसिपी, ‘असा’ पराठा तुम्ही खाल्लाच नसेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2024 7:36 PM

Tips To Make Masala Mix For Tasty Paratha : काहीवेळा भरपूर मेहनत करुन पराठे केले तरीही त्याला हवी तशी चव येत नाही, अशावेळी त्यात मिक्स करा होममेड सिक्रेट मसाला...

पराठा हा असा पदार्थ आहे जो आपण जेवण किंवा नाश्ता म्हणून कधीही खाऊ शकतो. रोजच्या चपातीचा कंटाळा आला की आपण काहीतरी वेगळं म्हणून पराठा करतो. पराठ्यांचे अनेक प्रकार असतात. काहीवेळा आपण भाज्या चिरुन त्या कणकेत मिक्स करुन पराठे करतो तर कधी स्टफिंग बनवून ते कणकेत भरुन त्याचे पराठे करतो. अशा अनेक पद्धतींनी पराठे तयार करता येतात.

वेगवेगळ्या पद्धतींनी पराठ्यांचे अनेक प्रकार तयार करता येत असले तरीही, ते चवीला स्वादिष्ट असणे गरजेचे असते. पराठे हा अगदी झटपट होणारा पदार्थ असला तरीही काहीवेळा पराठ्यांची चव पाहिजे तशी लागत नाही. अशावेळी ते पराठे आवडीने खाल्ले जात नाही. यासाठीच आपण घरच्याघरी पटकन तयार होणारा आणि दीर्घकाळ टिकणारा पराठ्यांसाठीचा मसाला तयार करुन ठेवू शकतो. हा चिमूटभर मसाला पराठ्यांच्या स्टफिंगमध्ये घातला तर पराठे टेस्टी लागतात. पराठे अधिक स्वादिष्ट होण्यासाठी हा मसाला कसा तयार करायचा त्याची रेसिपी पाहूयात(Tips To Make Masala Mix For Tasty Paratha).

साहित्य :- 

१. जिरे - १ टेबलस्पून २. हळद - १ टेबलस्पून ३. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून ४. गरम मसाला - १ टेबलस्पून ५. आमचूर पावडर - १ टेबलस्पून ६. लसूण पावडर - १ टेबलस्पून ७. हिंग - १/२ टेबलस्पून ८. कसूरी मेथी - १ टेबलस्पून ९. ओरेगेनो - १ टेबलस्पून १०. मीठ - १ टेबलस्पून 

मसाला एक भाज्या अनेक ! फक्त ३ पदार्थ वापरुन करा मल्टीपर्पज मसाला, ग्रेव्ही होईल चविष्ट... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी पॅन गरम करुन त्यात जिरे कोरडे भाजून घ्यावे. जिरे भाजून ते थोडे थंड करावे. हे थंड केलेले जिरे मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पूड करुन घ्यावी. २. आता एक बाऊल घेऊन त्या बाऊलमध्ये जिरे पूड, हळद,लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर, लसूण पावडर, हिंग, कसूरी मेथी,ओरेगेनो व चवीनुसार मीठ घालून हे सगळे जिन्नस एकत्रित चमच्याने हलवून मिक्स करुन घ्यावेत. ३. आता या तयार मिश्रणाची पूड मिक्सर जारमध्ये घालून पुन्हा एकदा ही पूड मिक्सरमध्ये वाटून बारीक करुन घ्यावी. 

पराठ्यांसाठीचा मसाला मिक्स तयार आहे. हा मसाला आपण एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करुन ठेवू शकता. कोणत्याही प्रकारचा पराठा करत असताना त्याच्या स्टँफिंगमध्ये हा मसाला घातल्याने त्याचे स्टफिंग चवीला उत्तम होते. शिवाय पराठ्याची चव देखील अप्रतिम लागते.

पावसाळ्यात दही आंबट होऊ नये म्हणून काय करायचं? ही घ्या एक खास युक्ती...

हा मसाला तयार करताना लक्षात ठेवा काही गोष्टी... 

१. हा मसाला पराठ्यांची चव वाढवणारा असल्याने, तो तयार करताना त्यात चांगल्या दर्जाचे मसाले वापरावेत. २. मसाला तयार केल्यावर त्याची चव घेऊन बघा. जर त्यात कोणत्या मसाल्याची चव कमी लागत असेल तर तो मसाला त्यात घालावा. याशिवाय या मसाल्यातील सगळे जिन्नस बॅलेन्स करायचे असतील तर त्यात थोडीशी साखर घालावी. ३. हा मसाला तयार झाल्यावर तो स्टोअर करण्याआधी किमान तासाभरासाठी असाच ठेवावा. यामुळे त्यातील मसाल्यांची चव एकत्रित मिळून येत. त्यानंतरच तो स्टोअर करावा. ४. जर तुम्हाला या मसाल्यात खडे मसाले वापरायचे असतील तर ते आधी कोरडे भाजून घ्यावेत. यामुळे त्या मसाल्यांची चव अधिक चांगली लागते.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सपाककृती