Join us  

टम्म फुगलेली रवा - मसाला पुरी आणि आल्याचा चहा ! नाश्ता असा भारी, खा खमंग मसाला पुरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2023 8:31 PM

Masala Puri Recipe : नाश्त्याला काय करायचे हा रोजचा प्रश्न, ही घ्या खमंग रवा मसाला पुरीची रेसिपी...

कोणताही सण असल्यावर किंवा कधी कधी नाश्त्यासाठीदेखील आपल्याकडे पुरी करून खाण्याची पद्धत आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांच्या घरी सकाळच्या नाश्त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या केल्या जातात. सकाळच्या नाश्त्याला जर पुऱ्या असतील तर पुऱ्या आणि चहाचा बेत फक्कड जमलाच म्हणून समजा. कधी चपाती करायचा कंटाळा आला असेल तर पटकन होणारा पदार्थ म्हणजे पुरी. पुरीने जेवणाचा स्वाद अधिक वाढतो आणि करण्यासाठीही या सोप्या आहेत. पण नुसती गव्हाच्या पिठाची पुरी करण्यापेक्षा आपण वेगवेगळ्या पद्धतीची आणि चवीची स्वादिष्ट पुरी बनवू शकतो. 

सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्याला, मुलांच्या टिफिनसाठी काहीतरी झटपट पण चटपटीत खाता येईल असे बनवायचे झाले तर 'मसाला पुरी' हा उत्तम पर्याय आहे. नेहमीच्या पुरीलाच थोडा हलकासा वेगळा टच दिल्यास या मसाला पुऱ्या आपण चटकन बनवू शकतो. ज्या गव्हाच्या पीठाच्या चपात्या आपण रोजच्या जेवणात खातो. त्याच पिठापासून भारताच्या वेगवगळ्या भागात विविध पुऱ्या बनवल्या जातात. रोज चपात्या खाऊन कंटाळा आला की गव्हाच्या पीठात मैदा, रवा मिसळून पुऱ्या बनवल्या जातात. अशाच घरच्या घरी झटपट होणाऱ्या मसाला पुऱ्यांची सोपी कृती पाहूयात. 

साहित्य :- 

१. बारीक रवा - १/२ कप २. गरम पाणी - गरजेनुसार ३. बेसन - १/२ कप ४. गव्हाचे पीठ - २ कप ५. आले - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून ६. हळद - १/४ टेबलस्पून ७. जिरे पावडर - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. धणे पूड - १ टेबलस्पून १०. चिली फ्लेक्स - १ टेबलस्पून ११. गरम मसाला - १ टेबलस्पून १२. कसुरी मेथी - १ टेबलस्पून १३. ओवा - १ टेबलस्पून १४. जिरे - १ टेबलस्पून १५. हिंग - १/२ टेबलस्पून १६. बारीक चिरलेली कोथिंबीर - १ टेबलस्पून १७. तेल - २ टेबलस्पून 

रोज चपात्या करायचा कंटाळा येतो? १ सोपी इन्स्टंट ट्रिक... चपात्या होतील झटपट...

 कृती :-

१. सर्वप्रथम एका मोठ्या पसरट बाऊलमध्ये, बारीक रवा घेऊन तो रवा संपूर्ण भिजेल एवढे पाणी त्यात घालावे. त्यानंतर तो रवा १० मिनिटे तसाच ठेवून भिजवून घ्यावा. २. आता या भिजलेल्या रव्यात बेसन, गव्हाचे पीठ, आले - हिरव्या मिरचीची पेस्ट, हळद, जिरे पावडर, मीठ, धणे पूड, चिली फ्लेक्स, गरम मसाला, कसुरी मेथी, ओवा, जिरे, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल घालून सगळ्यात शेवटी पाणी ओतून पीठ मळून घ्यावे. ३. पीठ मळून घेतल्यानंतर या पिठावर चमचाभर तेल घालावे. 

घरच्याघरी १० मिनिटांत चहा मसाला करण्याची सोपी कृती, पावसाळ्यात ‘मसाला चाय’ प्या मनसोक्त...

घरच्याघरी करा परफेक्ट ढोकळा प्रिमिक्स, १० मिनिटांत लुसलुशीत ढोकळा तयार ! पीठ टिकते ६ महिने...

४. हे पीठ आता किमान १५ ते २० मिनिटे तसेच झाकून ठेवावे.५. आता या पिठाचे छोटे - छोटे गोळे करून त्याच्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. ६. एका कढईत तेल तापवून लाटलेल्या पुऱ्या तळून घ्याव्यात. या मसाला पुऱ्या दोन्ही बाजुंनी खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. 

मसाला पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. या गरमागरम पुऱ्या चहासोबत किंवा सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.

टॅग्स :अन्नपाककृती