How to make Matar Halwa: ताज्या मटारची ऊसळ , आमटी, कचोरी, करंजी, पॅटिस, सॅण्डविच अशी खमंग आणि चमचमीत पदार्थांची मोठी यादी आहे. पण या यादीत ताज्या मटारच्या गोडाच्या पदार्थांची मात्र उणिव जाणवते. पण ही उणिव भरुन काढण्यासाठी मटारचा हलवा हा एक पदार्थ पुरेसा आहे. ताज्या मटारच्या चवीचं सेलिब्रेशन करण्यासाठी मटारचा हा गोडाचा पदार्थ करुन पाहायलाच हवा असा आहे. कोणताही पदार्थ करताना त्या पदार्थाच्या चवीसोबतच पदार्थाचे गुणदेखील आवर्जून बघितले जातात. मटारचा हलवा हा गुणांच्या बाबतीतही तितकाच आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे.
Image: Google
मटारचा हलवा का खावा?
1. हिवाळ्यात आहारात ताज्या मटारचे पदार्थ खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर समजले जातात. ताज्या मटारचा हलवा खाल्ल्याने शरीरातील कोलेस्टेराॅलचं प्रमाण नियंत्रित राहातं. शरीरातील रक्ताचा प्रवाह सुरळीत राहातो. कमी साखर/ गूळ घातलेला मटार हलवा आरोग्यास म्हणूनच फायदेशीर समजला जातो.
2. मटार हलव्यातून ताज्या मटारच्या पौष्टिक गुणांचा शरीरास फायदा होतो. ताज्या मटारमधून शरीरास लोह मिळते. तसेच मटारचा हलवा हा जर साखरेऐवजी गूळ घालून केल्यास रक्त वाढीसाठी त्याचा फायदा होतो.
Image: Google
3. हलवा करताना मिश्र सुक्या मेव्याचा भरपूर वापर करावा. सुका मेवा तसेच साजूक तुपामुळेही मटार हलव्याची पौष्टिकता वाढते. शरीर गरम रहाण्यास या हलव्यामुळे मदत होते. शरीरास ऊब आणि ऊर्जा मिळण्याचा फायदा मटार हलवा खाऊन होतो.
4. वारंवार सर्दी खोकला होण्याचा त्रास असेल तर मटारचे तळलेले पदार्थ करण्यापेक्षा मटार हलवा केल्यास या त्रासावर आराम मिळतो. हलव्यातील साजूक तूप, सुका मेवा, गूळ यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. याचा फायदा म्हणजे वारंवार होणाऱ्या सर्दी खोकल्यावर नियंत्रण मटारचा हलवा खाऊन मिळवता येतं.
5. मटारमध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असतं . मटार हलवा खाल्याने गोड खाण्याची इच्छा पूर्ण होतेच सोबतच पुरेसं फायबर मिळाल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. हिवाळ्यात सतत भूक लागत असते. या भुकेवर नियंत्रण मटार हलवा खाऊन मिळवता येतं असं तज्ज्ञ म्हणतात.
Image: Google
मटार हलवा कसा कराल?
मटार हलवा करण्यासाठी 2 कप ताजे मटार, चिमूटभर मीठ आणि चिमूटभर सोडा, 3 मोठे चमचे तूप, 3 मोठे चमचे मिक्स सुका मेवा, 1 मोठा चमचा मगज बिया ( खरबूज बिया), चारोळी, बेदाणे, थोडी जायफळ आणि वेलची पावडर, 2-3 मोठे चमचे किसलेल्ला खवा , 2 कप मटारसाठी अर्धा कप किसलेला गूळ घ्यावा.
Image: Google
सर्वात आधी ताजे मटारचे दाणे भांड्यात पाणी आणि त्यात चिमूटभर मीठ आणि सोडा घालून उकळून घ्यावे. यामुळे मटारमधील कच्चेपणा निघून जातो. मटारचा रंग गडद होतो आणि दाणे आणखी गोडसर होतात. 5- 10 मिनिटं दाणे उकडले की ते निथळून् घ्यावेत. कढईत थोडं तूप घालून त्यात गुळ आणि 1-2 चमचे पाणी घालून गूळ विरघळून घ्यावा. मटारचे दाणे मिक्सरमधून जाडसर वाटावेत. वाटताना त्यात थोडंसं पाणी घालावं. कढईत तूप घालून ते तापवावं. त्यात आधी सुकामेवा परतून घेऊन तो बाजूला ठेवावा. कढईत थोडं तूप घालून त्यात मटारचं वाटलेलं मिश्रण घालावं. 10-12 मिनिटं मंद आचेवर हे मिश्रण परतून घ्यावं.
Image: Google
मिश्रण परतताना त्यातलं सर्व पाणी निघून जाऊन त्याचा घट्ट गोळा बनू लागला की त्यात विरघळलेला गूळ घालावा. गूळ घातल्यानंतर मिश्रण 10-12 मिनिटं पुन्हा परतावं. नंतर यात किसलेला खवा खालावा. खवा चांगला मिसळून घेतला की परतलेला सुकामेवा घालावा. गुळाऐवजी साखर घातली तरी चालते. पण गूळ घातल्याने मटार हलव्याची पौष्टिकता वाढते आणि हलवा आणखी खमंग लागतो.
सर्वात शेवटी चारोळी, जायफळ आणि वेलची पूड घालावी. वरुन थोडं साजूक तूप सोडून गॅस बंद करावा. अशा पध्दतीचा मटार हलवा गुणांनी पौष्टिक आणि चवीन खमंग होतो.