दिवसभर काम केल्यानंतर आलेला थकवा घालवण्याचा सोपा उपाय म्हणजे आपल्या आवडीचा पदार्थ करुन खाणं. अर्थातच थकवा आलेला असल्यानं स्वयंपाकात जास्त वेळ घालवण्याची आणि श्रम करण्याची इच्छा नसते. असा एखादाच पदार्थ करण्याची आणि खाण्याची इच्छा असते ज्याने पोटही भरेल आणि वेगळं काही खाल्ल्याची इच्छाही पूर्ण होईल. असा पदार्थ जो करताना आणि खाताना मस्त वाटेल. अशा पदार्थाच्या शोधात असल्यास उत्तर सोपं आहे. मटका पुलाव (mataka pulav) . नेहेमीच्या पुलाव बिर्याणीपेक्षा वेगळा असणारा. मातीच्या भांड्यात करायचा असल्यानं खास चवीचा होणारा (how to make mataka pulav) हा मटका पुलाव अर्ध्या तासात होतो आणि खाणाऱ्याची तबियत एकदम खूष करुन टाकतो.
Image: Google
मटका पुलावाची पाककृती ही थोडी बिर्याणी सारखी असली तरी बिर्याणीप्रमाणे मटका पुलावाला मॅरिनेशनची गरज नसते. हा पुलाव पुदिन्याची हिरवी चटणी आणि रायत्यासोबत छान लागतो. मटका पुलाव करण्यासाठी 1 कप बासमती तांदूळ, अर्धा चमचा गरम मसाला, 2-3 लवंगा, 2 छोटी वेलची, 1 मोठी वेलची, 1 तमालपत्रं, 1 चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा मिरे पूड, चवीप्रमाणे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, 1 मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, पाव कप गाजर, मूठ भर मटार, बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप फ्लाॅवर, 1 मोठा कांदा उभा चिरलेला, 2 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा पुदिना , बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यावी आणि गरजेप्रमाणे मोहरीचं तेल घ्यावं.
Image: Google
मटका पुलाव करताना आधी बासमती तांदूळ धुवून अर्धा तास भिजत घालावेत. नंतर तांदूळ पाण्यातून उपसून 10-12 मिनिटं निथळत ठेवावेत. तांदूळ मोकळा किंवा प्रेशर कुकरमधून 70 टक्के शिजवून घ्यावा. कांदा उभा पातळ चिरुन घेऊन तो तेलात तळून बाजूला ठेवावा. पुलावासाठी मातीचा मटका गॅसवर ठेवावा. त्यात मोहरीचं तेल घालावं. तेल तापल्यावर आधी अख्खे मसाले घालून परतून घ्यावेत. नंतर कापलेल्या भाज्या घालून त्या 2-3 मिनिटं परतून घ्याव्यात. भाज्या परतल्या गेल्या की आलं लसणाची पेस्ट घालून सर्व जिन्नस पुन्हा परतून घ्यावं. नंतर त्यात दही घालून ते फोडणीत एकजीव करावं. यात तांदूळ घालण्याआधी अर्धी ग्रेव्ही एका भांड्यात काढून घ्यावी. मटक्यात उरलेल्या ग्रेव्हीवर उकडून घेतलेल्या भाताचा एक थर पसरुन घालावा. भांड्यात काढून घेतलेली ग्रेव्ही भाताच्या थरावर घालवी. या ग्रेव्हीवर पुन्हा भाताचा थर द्यावा. वरुन बारीक चिरलेला पुदिना, कोथिंबीर आणि तळून घेतलेला कांदा पसरवून घालावा. मटक्यावर एक ताटली झाकावी. ताटलीत फट राहून वाफ निघून जाऊ नये म्हणून ताटलीच्या भोवती कणिक लिंपावी. मंद आचेवर पुलाव शिजू द्यावा. 15 मिनिटात पुलाव चांगला शिजतो. गरम गरम पुलाव पुदिन्याची चटणी आणि रायत्यासोबत छान लागतो.