हिवाळा म्हणजे हाडांचे आणि सांधेदुखीचे दुखणे वर काढणारे दिवस. या काळात शरीराचे पोषण होणे गरजेचे असते. अशावेळी आहारात काही बदल आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसांत शरीराला ऊर्जा देणारे, उष्णता देणारे पदार्थ आवर्जून खाल्ले जातात. ज्यांना जुने हाडांच्या दुखण्याचे आणि सांधेदुखीचे त्रास असतील त्यांचा हा त्रास या काळात वाढण्याचीच शक्यता जास्त असते. अशावेळी पारंपरिक पद्धतीने केले जाणारे मेथ्याचे लाडू अतिशय उपयुक्त ठरतात. मेथ्या डायबिटीससाठी ज्याप्रमाणे फायदेशीर असतात त्याचप्रमाणे हाडांचे कार्य सुरळीत राहवे आणि हाडांना वंगण मिळावे यासाठीही मेथ्या आवर्जून खाल्ल्या जातात. पूर्वी आपली आजी किंवा आई आवर्जून हे लाडू करायची. पण आता ते कसे करायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही घ्या सोपी रेसिपी (How to Make Methi ladoo Easy Recipe Winter Special)...
साहित्य -
१. मेथ्या - अर्धी वाटी
२. कणीक - २ वाटी
३. बदाम पावडर - अर्धी वाटी
४. काजू आणि पिस्ता पावडर - अर्धी वाटी
५. तूप - १ वाटी
६. पिठीसाखर किंवा गूळ - १ वाटी
कृती -
१. मेथ्या भाजून मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्यावी.
२. त्याच कढईमध्ये कणीक चांगली लाल रंगावर खरपूस भाजून घ्यावी.
३. बदाम, काजू आणि पिस्ते भाजून त्याचीही मिक्सरवर बारीक पूड करुन घ्यावी.
४. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तूप घालून भाजलेली कणीक, मेथ्यांची पावडर आणि सुकामेवा पावडर घालावी.
५. सगळे एकजीव झाल्यावर गॅस बंद करुन त्यामध्ये आपल्या आवडीनुसार पीठीसाखर किंवा गूळ घालावा.
६. हे मिश्रण कोरडे वाटत असल्यास त्यामध्ये अंदाजे थोडे थोडे दूध घालून लाडू वळून घ्यावेत.
७. यामध्ये खोबऱ्याचा कीस, खसखस, सुंठ पावडर असे आपल्या आवडीनुसार इतर गोष्टी घातल्या तरी छान लागतात.
मेथ्याचे लाडू खाण्याचे फायदे
१. मेथ्यामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंटस असल्याने पचनक्रिया सुरळीत राहण्यास याची मदत होते.
२. मेथ्या डायबिटीससाठी फायदेशीर असल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
३. सांधेदुखी, हाडांचे दुखणे असे त्रास असल्यास मेथ्या खाणे फायद्याचे आहे.
४. थंडीच्या दिवसांत होणारा सर्दी - कफ यांच्यावर मेथ्या उपयुक्त ठरतात.
५. वजन नियंत्रणात राहण्यासाठी आणि हार्मोन्सचे संतुलन होण्यासाठी मेथीचे दाणे फायदेशीर ठरतात.