Join us  

थालीपीठ करायचं पण भाजणीचं पीठच नाही? झटपट करा मिक्स पिठांचे खमंग मेथी थालीपीठ, पौष्टिक आणि पोटभर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2023 2:12 PM

How To Make Methiche Thalipith : Fenugreek Thalipith : Homemade Recipe : थालीपीठ म्हणजे गरमागरम नाश्ता, रविवारी निवांत नाश्त्यासाठी करुन पाहा हे खमंग थालीपीठ

आपल्यापैकी बऱ्याच महाराष्ट्रीयन घरांत सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ आवर्जून केलं जात. गरमागरम थालीपीठासोबत तोंडी लावण्यासाठी घरी बनवलेलं  घट्ट दही हे कॉम्बिनेशनच खूप भारी आहे. शक्यतो आपल्याकडे थालीपीठ म्हटलं की भाजणीचं थालीपीठ आपल्याला आठवते. खमंग, खुशखुशीत थालीपीठ खाणं हा आपल्या मराठमोळ्या खाद्यसंस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे. बदलत्या काळानुसार आजकाल थालीपीठाचे असंख्य प्रकार आपल्याला पहायला मिळतात. असे असले तरीही थालीपिठाच्या प्रकारात भाजणीच्या थालीपिठाला सर्वात जास्त मान आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. धान्य, कडधान्य, धने जिरे कढईत योग्य प्रमाणात स्वतंत्रपणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे मिश्रण दळून आणलं की भाजणी तयार. या जादुई पिठात अक्षरशः कोणतीही भाजी एकजीव होते. मिळतील ती धान्ये आणि कडधान्ये घेऊन भाजणी होत असली तरी, तब्बल १८ धान्ये आणि कडधान्ये मिसळून जी होते ती खरी भाजणी, असा अट्टल थालीपीठप्रेमींचा ठाम विश्वास आहे. एरवी बीट, लाल भोपळा, दुधी अशा न आवडणाऱ्या भाज्या दिल्या तर खाण्यासाठी नाक मुरडतात. परंतु हेच पदार्थ जेव्हा थालीपिठात एकरूप होतात तेव्हा अतिशय चवीने थालीपीठ आवडीने फस्त केले जाते. 

भाजणीचं किंवा इतर पौष्टिक धान्यांची पीठ घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लाल तिखट, जिरे, तीळ, वाटलेलं आलं-लसूण चांगलं मिसळायचं, थोडं थोडं पाणी मिसळत घट्ट मळायचं. त्याचे छोटे गोळे करायचे. तव्यावर तेल टाकून तो गोळा थापायचा. मध्ये छिद्र पाडलं की ते छान भाजलं जातं. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजायचं. लोणचं, चटणी, सॉस, दही असं काहीही सोबत असलं की फक्कड बेत जमतोच. कधी कांद्याऐवजी कोबी घालून, कधी पालक मिक्सरवर वाटून, कधी काकडी किसून त्यात घालून वेगवेगळे स्वादही ट्राय करता येतात. असेच मेथीचे थालीपीठ घरच्या घरी कसे बनवायचे त्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Methiche Thalipith : Fenugreek Thalipith : Homemade Recipe).

साहित्य :- 

१. कणिक - १/२ कप २. ज्वारीचे पीठ - १/२ कप ३. तांदुळाचे पीठ - १/२ कप ४. बेसन - १/२ कप ५. हिरवी मिरची, आलं, लसूण यांची पेस्ट - २ टेबलस्पून ६. कांदा बारीक चिरलेला - १ कप ६. मेथीची पाने बारीक चिरुन घेतलेली - १ कप ७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून ८. धणेपूड - १/२ टेबलस्पून ९. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १०. गरम मसाला - १/२ टेबलस्पून ११. ओवा - १/२ टेबलस्पून १२. हळद - १/२ टेबलस्पून १३. बडीशेप - १/२ टेबलस्पून १४. कश्मिरी लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १५. पांढरे तीळ - १/२ टेबलस्पून १६. तेल - २ ते ३ टेबलस्पून 

उन्हाळ्यात घरातल्या चिल्ल्यापिल्ल्यांसाठी खास पदार्थ - ‘काकडीची बोट’! पौष्टिक आणि चमचमीत चव नक्की आवडेल...

फक्त ५ मिनिटात होणारे बटाट्याचे क्रिस्पी काप, पदार्थ सोपा पण रोजच्या जेवणाला देतो नवा चमचमीतपणा... 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका मोठा परातीमध्ये कणिक, ज्वारीचे पीठ, तांदुळाचे पीठ, बेसन, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं, लसूण यांची पेस्ट घालून घ्यावी. २. त्यानंतर या पिठात जिरेपूड, धणेपूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, ओवा, हळद, बडीशेप, कश्मिरी लाल तिखट मसाला, पांढरे तीळ घालावेत. ३. सर्वात शेवटी या मिश्रणात बारीक चिरुन घेतलेली मेथीची पाने घालावीत. ४. आता या सर्व पदार्थांत गरजेनुसार पाणी घालूंन चपातीसारखेच घट्ट पीठ मळून घ्यावे.

भाजणीचे थालीपीठ तर आपण खातोच पण मंचूरियन थालीपीठ? हे थालीपीठ नक्की भारतीय म्हणायचे की चिनी...

५. पीठ मळून झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करुन घ्यावेत. ६. आता केळीच्या पानांवर किंवा बटर पेपरवर थोडेसे तेल लावून या छोट्या गोळ्यांचे गोलाकार थालीपीठ थापून घ्यावे. ७. गॅसवर पॅन ठेवून पॅनमध्ये चमचाभर तेल सोडून त्यावर हे थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे. ८. थालीपिठाचा रंग दोन्ही बाजुंनी हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे. 

थालीपीठ भाजून झाल्यानंतर दही किंवा टोमॅटो सॉस सोबत खाण्यासाठी गरमागरम सर्व्ह करावे.

टॅग्स :अन्नपाककृती