गणपती बसल्यावर नैवेद्य म्हणून 21 भाज्यांची एकत्रित भाजी केली जाते. ही भाजी गणपतीच्या नैवेद्याला जितकी आवश्यक तितकीच ती आरोग्यासाठीही महत्वाची असते. नैवेद्यासाठीच्या या मिश्र भाज्यातील 21 भाज्या (21 vegetables) आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. कारण यात श्रावण भाद्रपदात उगवलेल्या रानभाज्या खूप असतात. आपल्या परसात सहज उगवतील अशा या भाज्या असतात. एरवी वर्षभर खात नाही त्या भाज्या यावेळी मिळतात. शहरात कमीच मिळतात. पण ग्रामीण भागात यांची विपुलता असते. रानभाज्या पावसाळ्यात आपोआप उगवलेल्या असतात. या भाज्यांचे तुरट आणि कडू रस पोटात जाणं महत्त्वाचं असतं. या भाज्या पूर्णत: नैसर्गिक असतात. त्यांना खत किटकनाशकांची गरज नसते. या भाज्या याकाळात खाल्ल्या (health benefits of mix veg with 21 vegetables ) तर आपलं आरोग्य उत्तम राहातं. नाशिक येथील आयुर्वेद तज्ज्ञ वैद्य राजश्री कुलकर्णी यांनी 21 भाज्या खाण्याचं महत्व सविस्तर सांगितलं आहे. शिवाय ही भाजी आरोग्यदायी पध्दतीनं (how to make mix veg with 21 vegetables) कशी करायची याचंही मार्गदर्शन केलं आहे.
Image: Google
21 भाज्या का खाव्यात?
21 भाज्यांमधे सर्व प्रकारच्या आणि गुणधर्मांच्या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमधे वेलवर्गीय लाल भोपळा, दुधी भोपळा, काकडी, दोडकी, गिलके, झाडांना येतात आणि फळभाज्या म्हणून ओळखल्या जातात अशा वांगी, भेंडी शेंगभाज्या गवार, घेवडा, वालाच्या शेंगा , जमिनीखाली वाढणाऱ्या बीट, सुरण, मुळा, गाजर, अरबी , मेथी सारख्या पालेभाज्या या भाज्यांना 21 भाज्यात महत्त्वाचं स्थान आहे. या सर्व प्रकारच्या भाज्या 21 भाज्यांच्या निमित्ताने एकत्रित पोटात जातात. यातल्या प्रत्येक भाजीचा गुणधर्म वेगळा आणि विशेष असतो कारण ती वेगवेगळ्या ठिकाणी उगवलेली असते. जमिनीखालच्या भाज्यांमधे क्षार जास्त असतात. क्षार हे शरीरासाठी महत्वाचे असतात. या भाज्यांचं आहारातलं महत्त्व कळण्यासाठी म्हणून हा 21 भाज्यांचा नैवेद्य असतो. खरंतर हे एका दिवसापुरती मर्यादित न राहाता अशा भाज्या खाण्याची सवय लागणं आवश्यक आहे. वरचेवर अशा वेगेवेगळ्या भाज्या आहारात असतील शरीरात पोषक घटकांचे कमतरता निर्माण होत नाही. शरीराला आवश्यक असणारे बारीक सारिक खनिजं, सर्व प्रकारची जीवनसत्त्वं, क्षार या भाज्यांमधून शरीराला मिळतात. या 21 भाज्या करताना आरोग्यदायी पध्दतीने करणं अपेक्षित आहे. कमीत कमी मसाले वापरुन केली जाणारी ही भाजी चवीला अतिशय चविष्ट लागते.
Image: Google
कशी करायची 21 भाज्यांची मिश्र भाजी?
21 भाज्यांची मिश्र भाजी करण्यासाठी पापडी वाल, दोडके, घेवडा, गिलकं, राजमा, हिरवे वाटाणे, मका, पावटा, लाल भोपळा, कारलं, फ्लाॅवर, गाजर, सिमला मिरची, तोंडले, परवल,सुरण, गवार, कर्टुले, दुधी भोपळा, मेथी, दाभोळी आणि बीट या 21 भाज्या, फोडणीसाठी मोहरी, आलं, मिरची, हळद, हिंग, ओलं खोबरं तेल आणि चवीपुरतं मीठ घ्यावं. 21 भाज्यांची मिश्र भाजी करताना सर्व भाज्या व्यवस्थित धुवून, निवडून आणि बारीक चिरुन घ्याव्यात. आलं आणि मिरचीची पेस्ट करुन घ्यावी. ओलं नारळ खोवून घ्यावं. भाजीसाठी आधी तेल तापण्यास ठेवावं. तेल तापलं की मोहरी आणि जिरे फोडणीस घालावे. ते तडतडले की मग आलं मिरचीचं वाटण घालून ते परतून घ्यावं. सर्व भाज्या फोडणीस घालून नीट परतून घ्याव्यात. भाजीत चवीपुरतं मीठ घालून भाजी पुन्हा चांगली हलवून घ्यावी. भाजी शिजण्यासाठी झाकण्याआधी भाजीवर ओलं खोबरं पेरावं. कढईवर ताट ठेवून वरुन आधणाला पाणी ठेवावं. भाजी 15 मिनिटं शिजू द्यावी. भाजी शिजली की गॅस बंद करावा. ही कमीत कमी मसाले वापरुन केलेली भाजी भाज्यांच्या अंगभूत गुणांमुळे पौष्टिक आणि चविष्ट होते.