Join us  

गुढी पाडवा स्पेशल : बुंदी न पाडता, तूप न घालता झटपट करा मोतीचूराचे लाडू, खास रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 2:40 PM

How To Make Motichur Ladoo At Home : Recipe : बुंदी पाडण्याचा घाट न घालता चटकन होणारा आणि तोंडात टाकताच विरघळणारा मस्त मोतीचूर लाडू

सणासुदीचे दिवस म्हटले की घरात गोडधोड पदार्थांची रेलचेल असतेच. पूर्वी केवळ सण असेल तरच घरात लाडू बनवले जायचे परंतु आता आपण वर्षाचे बाराही महिने वेगवेगळ्या प्रकारचे लाडू खात असतो. खाऊच्या डब्यात नेण्यासाठी, मधल्या वेळच्या भुकेसाठी, अरबटचरबट खाण्याला आळा बसावा यासाठी  आपण लाडूचे विविध प्रकार खातो. प्रामुख्याने महाराष्ट्रांत दिवाळीच्या सणाला बेसनाचे, रव्याचे, मोतीचूर असे अनेक प्रकारांतील लाडू बनतात. 

यंदाच्या गुढीपाडव्याला घरात काय काय गोडधोड बनवले जाणार याची तयार नुकतीच सुरु झाली असेल. गुढीपाडव्याला आपण श्रीखंड - पुरी, पुरणपोळी, खीर, बासुंदी यांसारखे अनेक गोड पदार्थ तयार करुन हिंदू नववर्षाचे स्वागत करतो. गुढीपाडव्याला आपण साखरेच्या गाठींपासून ते कडुनिंबाच्या चटणीपर्यंत कडू, गोड अशा दोन्ही पदार्थांची चव चाखून गुढीपाडवा साजरा करतो. या गुढीपाडव्याला घरात काय गोड बनवायचं याचा बेत अजूनही ठरला नसल्यास झटपट बनून खाण्यासाठी तयार असणारे मोतीचूर लाडू आपण घरच्या घरी बनवू शकता(How To Make Motichur Ladoo At Home).    

साहित्य :- 

१. बेसन - १ कप २. साखर - १ कप ३. खायचा केशरी रंग - चिमूटभर ४. वेलची - २ ते ३ ५. पाणी - १ कप६. ड्रायफ्रूट्सचे बारीक काप - ३ ते ४ टेबलस्पून७. तेल - ५ ते ६ टेबलस्पून  

कृती :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन घेऊन त्यात थोडे पाणी घालून घट्टसर कंन्सिस्टंन्सीचे बॅटर बनवून घ्यावे.

२. आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. आता या तेलात बेसनाचे तयार केलेले बॅटर चमच्याच्या मदतीने सोडावे. 

३. हे बेसनाचे बॅटर भाजीप्रमाणे कुरकुरीत होईपर्यंत आणि सोनेरी रंग येईपर्यंत तेलात तळून घ्यावे. 

४. आता बेसनाचे बॅटर भाजीप्रमाणे कुरकुरीत झाल्यावर बाहेर काढून थोडे गार झाल्यावर मिक्सरला बारीक वाटून त्याचा थोडा जाडसर भुगा करुन घ्यावा. 

५. त्यानंतर एका पॅनमध्ये साखर व पाणी घेऊन त्याचा पाक बनवून घ्यावा. या पाकात चिमूटभर खायचा केशरी रंग आणि २ ते ३ वेलची किंवा वेलची पूड घालावी. 

६. आता या तयार झालेल्या पाकात, बेसनाचा मिक्सरला बारीक वाटून घेतलेला जाडसर भुगा घालावा. सगळे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. सगळ्यांत शेवटी यात आपल्या आवडीच्या ड्रायफ्रूट्सचे बारीक काप घालून घ्यावे. 

७. मोतीचूर लाडूचे तयार झालेले हे मिश्रण गॅसवरून खाली उतरवून घेऊन, हाताला किंचित तेल किंवा तूप लावून थोडे गरम असतानाच लाडू वळून घ्यावेत. 

८. आपल्या आवडीनुसार मोतीचूर लाडू बनवून झाल्यानंतर त्यावर ड्रायफ्रूट्सचे बारीक काप चिकटवून घ्यावेत.      

मोतीचूर लाडू खाण्यासाठी तयार आहेत.

 

टॅग्स :अन्नपाककृती