भात हा असा प्रकार आहे कितीही कमी करा उरतोच. उरलेल भात संपवण्याचं मोठं टेन्शन येतं. खूप काळ भात फ्रिजमधे ठेवून खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असतं. म्हणूनच सकाळी केलेला भात फ्रिजमधे न ठेवता तो लगेच संध्याकाळी संपवावा. हे म्हणायला सोपं पण सकाळचा भात रात्री खाणं फारच कंटाळवाणं काम असतं.
Image: Google
कपाळावर आठ्या पाडून भात संपवण्यापेक्षा उरलेला भात चवीन संपवण्याचा पर्याय स्टार आणि लोकप्रिय शेफ संजीव कपूर यांनी सांगितला. उरलेल्या भाताचे मुटके करावेत आणि चवीचवीने खावेत. संजीव कपूर यांनी मुटक्यांचा पर्याय देऊन कित्येकजणींची उरलेल्या भाताचं करायचं काय? या प्रश्नानं होणारी डोकेदुखी सोडवली आहे. आपल्या इन्स्टाग्रामवरुन त्यांनी उरलेल्या भाताची ही समस्या चविष्ट पध्दतीने कशी सोडवायची हे सांगितलं आहे. उरलेल्या भाताचे मुटके करणं कोथिंबीरीच्या वड्या करण्याइतकं सोपं काम आहे. कसे करायचे उरलेल्या भाताचे मुटके
Image: Google
उरलेल्या भाताचे मुटके करण्यासाठी 2 वाट्या उरलेला भात असेल तर त्याप्रमाणात इतर जिन्नस घ्यावं. यासाठी 2 कप उरलेला भात, अर्धा कप बेसन, आलं-मिरची पेस्ट, धने पावडर, मीठ ( मीठ घालताना भातात घातलेल्या मीठाचाही विचार करावा, नाहीतर चवीने खारट मुटके चव देत नाही.), हळद, तिखट, भाजलेल्या जिऱ्यांची पावडर, साखर, दही , चिमूटभर बेकिंग सोडा, कणिक, तेल, मोहरी, जिरे, कोथिंबीर, तीळ आवडत असल्यास लिंबाचा रस एवढं जिन्नस घ्यावं.
Image: Google
आधी एका मोठ्या ताटात उरलेला भात घ्यावा. त्यात बेसनपीठ, आलं मिरची पेस्ट, धने पावडर , तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर आणि दही घालावं. हे सर्व नीट एकत्र करावं. नंतर त्यात चिमूटभर सोडा आणि थोडं तेल घ्यावं. पुन्हा सर्व मिश्रण नीट एकत्र करावं. त्याचं प्रमाण बघून त्यात थोडी कणिक घालावी. मिश्रण नीट मऊसर मळून घ्यावं. मिश्रणात कणिक बेतानं घालावी. नाहीतर मुटके पिठूळ लागतात, कडक होतात. मिश्रण मळताना पाणी अजिबात घालू नये.
मिश्रणाचा मऊ गोळा मळून झाला की थोडं थांबावं. नंतर मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. हे गोळे हातावर उभे हलकेसे फिरवून लांबट करावेत. मग रोळीला तेल लावून ते वाफवून घ्यावेत. वाफवलेले गोळे थंडं होवू द्यावेत. मग त्याचे छोटे तुकडे करावेत.
Image: Google
एका कढईत तेल तापवावं. तेल तापलं की त्यात मोहरी, जिरे घालावेत. ते तडतडले की थोडा हिंग घालावा. तीळ घालावी. कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची फोडणीत घालावी. हे परतून घ्यावं. मग तुकडे केलेले मुटके फोडणीत घालून चांगले परतावेत. आवडत असल्यास थोडा लिंबाचा रस घालाव. साखर घालावी. पुन्हा मुटके परतावेत. गॅस बंद केला वरुन कोथिंबीर भुरभुरावी आणि फटाफट मुटके संपवावेत. संजीव कपूर म्हणतात, अशा पध्दतीने उरलेल्या भाताचे मुटके केल्यास संपवा हे सांगण्याची वेळच येणार नाही. कदाचित केलेल्याच मिळणार नाही इतके चविष्ट लागतात हे मुटके.