Join us  

नागपूरची गरमागरम सांबारवडी, भरपूर कोथिंबीर घालून केलेला अप्रितम पदार्थ! आईच्या हातची खमंग चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2023 5:50 PM

नागपूरी सांबार वडी करणं म्हणजे सोहळा असतो. मायेनं करावा आणि खावा असा पदार्थ

ठळक मुद्दे विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात आणि विदर्भातला एक अतिशय लोकप्रिय आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे सांबरवडी अर्थात कोथिंबीर वडी.

वैष्णवी कुलकर्णी

कुंडीत पेरले धणे अन् त्यातून आली त्याची बेटी, स्वयंपाक होता पूर्ण ही येई आपसूक त्याच्या भेटी !आता तुम्ही म्हणाल ही धण्याची बेटी कोण? तर धण्याची ही बेटी म्हणजे आपली हिरवीगार, लज्जतदार, बहारदार अशी कोथिंबीर. हो, कुंडीत थोडे धणे पेरले आणि थोड्याथोड्या जलाचे सिंचन त्यावर करत राहिले म्हणजे ही हिरवीगार कोथिंबीर जन्म घेते. मला नेहमी निसर्गाच्या या चमत्काराचं खूप आश्चर्य वाटतं. म्हणजे बघा ना , धणे आकाराने किती छोटेसे असतात आणि हाताला काहीसे ओबडधोबड लागतात पण ह्याच धण्याच्या पोटी ही मऊशार , हिरवीगार आणि कोवळी कोथिंबीर जन्माला येते.

    ही कोथिंबीर म्हणजे आपल्या स्वयंपाकाचा एक अविभाज्य भाग असते. हिच्याशिवाय आपल्या पुढ्यात आलेला स्वयंपाक म्हणजे जणू एखाद्या गृहिणीशिवाय असलेलं घर. साध्या कोशिंबिरीपासून ते वाटल्या डाळीपर्यंत आणि कोरड्या भाजीपासून ते पातळ भाजीपर्यंत हिचं असलेलं अस्तित्व केवळ जेवणाची लज्जतच वाढवत नाही, तर जेवणाऱ्या व्यक्तीच्या मनाला आणि डोळ्यांना देखील आनंद प्रदान करत असते. अतिशय गुणी असलेली कोथिंबीर नानाविध प्रकारांनी आपल्या उपयोगात येत असते. म्हणजे बघा आपण प्रेमाने रांधलेल्या व्यंजनांवर जेव्हा आपण छान बारीक चिरलेली कोथिंबीर पेरतो ना, तेव्हा त्या पदार्थाला आणखीनच शोभा येते. कोथिंबीर ही इतर हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, शेपू, अंबाडी, पोकळा, तांदुळजा, चिवळ याप्रमाणेच औषधी गुण असणारी असते. यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात. माझ्यासारखी काही खवय्यी मंडळी असतील ज्यांना अन्नपदार्थांच्या बरोबरीने पूर्णपणे शिजलेली कोथिंबीर आवडत नाही , ती लोकं सलाड म्हणून देखील कच्ची कोथिंबीर सेवन करू शकतात. शिवाय हिच्या काड्यांपासून तयार केलेलं कोथिंबीरीचं सूप देखील अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असते.

      इथे मला कोथिंबीरी संदर्भातली एक गोड आठवण सांगावीशी वाटते. माझी आई ही विदर्भातली होती. विदर्भात कोथिंबिरीला सांबर म्हणतात आणि विदर्भातला एक अतिशय लोकप्रिय आणि खुसखुशीत पदार्थ म्हणजे सांबरवडी अर्थात कोथिंबीर वडी. तर , माझी आई ही सांबरवडी खूप छान बनवायची. अतिशय स्वर्गीय चव आणि खरपुस तळलेली ही गरमगरम सांबरवडी आणि तीही आईच्या हातची बनलेली म्हणजे माझ्यासाठी तर स्वर्ग दोन बोटेच असायचा.    आम्ही धुळ्यात राहत असताना डिसेंबर महिन्यात एकदा आईबाबा आमच्याकडे मुक्कामी आले होते. थंडीचे दिवस असल्याने त्यावेळी बाजारात कोथिंबीर मुबलक प्रमाणात आणि अगदी स्वस्त दरात मिळत होती. घरात आम्ही सगळेजण असेच गप्पा मारत बसलो असताना आमच्या आजी, म्हणजे माझ्या आजेसासूबाई माझ्या आईला म्हणाल्या ,     " अगं नंदा ( माझ्या आईचे नाव सुनंदा होते ), तुमच्या विदर्भात ती सांबरवडी करतात ना, मागे एकदा मी नागपूरला माझ्या जावेकडे गेले होते तेव्हा खाल्ली होती. कसली अप्रतिम चव असते ग ! तुलाही येत असेल ना ती बनवता ?आई : हो तर , येते ना मला.आज्जी : हो ना ? मग असं कर , उद्या रविवार आहे, तुझ्या जावयाला पण सुट्टी आहे. तेव्हा उद्या तू सांबरवडी करशील का ? मला खायची खूप इच्छा आहे.माझ्या आईचं एक वैशिष्टय होतं. तिच्याजवळ कोणी विशिष्ट पदार्थ खायचा आहे, अशी फर्माईश केली की ती क्षणाचाही विलंब न लावता पदर खोचून सरळ स्वयंपाकघरात जायची आणि कितीतरी वेळ खपून सुग्रास असा तो पदार्थ बनवून समोरच्या व्यक्तीला पोटभर खाऊ घालून तृप्त करायची. मग ते उकडीचे गरमगरम मोदक असोत वा खमंग अशा मटारच्या करंज्या. सगळंच ती प्रेमाने आणि अप्रतिम बनवायची. आताही आज्जींनी सांबरवडीची ईच्छा तिच्याजवळ व्यक्त केली आणि तिनेही अतिशय प्रेमाने सांबरवडी करण्याची तयारी दाखवली.

 

सांबरवडी करण्यासाठी साहित्य२ वाट्या डाळीचे पीठ , १ वाटी कणिक/ मैदा , १/४ वाटी तांदळाचे पीठ , ओवा , जिरे , चवीला मीठ , तिखट ,तेलसारणाचे साहित्य ३ जुड्या कोथिंबीर, २ कांदे ,१/२ वाटी दाण्याचा कूट, १/२ वाटी सुका नारळाचा कीस, १ चमचा खसखस ,१ चमचा चारोळी , १ वाटी हिरवे वाटाणे , १ चमचा धणे , तिखट , लिंबाचा रसआईने प्रथम बेसनात मैदा , तांदळाचे पीठ , ओवा , जिरे , मीठ , तिखट , कडक तेलाचे मोहन घालून घट्ट असे पीठ भिजवून घेतले आणि मग वडीचे सारण करण्यास ती सरसावली. इतक्या पटापट आणि सफाईदारपणे ती हात चालवत होती की आम्हा सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक आणि आश्चर्य वाटत होतं. सडपातळ बांधा तरीही अतिशय काटक शरीर प्रकृती असलेली माझी आई तिच्या सगळ्या माणसांसाठी आज आनंदाने आणि उत्साहात सगळं करत होती.तेलात एकदाची मोहरी तडतडली आणि मग आईने कांदा, दाण्याचा कूट, वाटाणे, खसखस , नारळाचा कोरडा चव, हळद, धणे वगैरे घालून आज्जींसाठी बिना तिखटाचे सारण बाजूला काढून ठेवले आणि मग इतर सारणामध्ये तिखट , गरम मसाला वगैरे घालून त्यात कोथिंबीर खमंग भाजून घेतली.चोहीकडे काय दरवळ पसरला होता सांगू! असं वाटत होतं की कधी एकदा वडी तयार होते आणि ती गरमगरम वडी आमच्या सगळ्यांच्या उदरात जाते.अखेर एकदाचं सारण तयार झालं. ते झाल्यावर आईने बेसनाच्या पिठाची पोळी लाटली आणि त्यावर तयार झालेले कोथिंबिरीचे सारण उभे भरून दोन्ही कडा एकमेकांवर आणून बंद केल्या. मग सुरीने त्या आयताकार रोलच्या आईने चौकोनी वड्या कापून घेतल्या आणि कडक तापलेल्या तेलात हळूहळू करून तिने वड्या तळण्यासाठी सोडल्या. त्या वड्या तेलात छान विहार करत होत्या. आईने सगळ्या वड्या छान खमंग अशा तळून घेतल्या आणि चाळणीत काढून ठेवल्या.      हे होईस्तोवर माझाही इतर सगळा स्वयंपाक तयार झाला होता. आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसलो. सगळे पदार्थ सगळ्यांच्या पानांत वाढून झाले आणि सगळ्यांनी सगळ्यांत आधी सांबरवडीच खायला घेतली. ती गरमगरम वडी तोंडात टाकली आणि.....अहाहा ....काय अप्रतिम झाली होती वडी ! गरमगरम वडी , सोबत चिंचेची गोड चटणी , टोमॅटो सॉस आणि दही. मी तर सगळ्यात आधी ती वडी खाऊन माझ्या आईच्या हातांचं चुंबनच घेतलं. तो रविवार आमच्या सगळ्यांना एक अतिशय सुग्रास अशी सांबरवड्यांची मेजवानी देऊन गेला होता.      त्यानंतरही अनेक वर्षे जेव्हा आम्ही आईकडे थंडीच्या दिवसांत जायचो, तेव्हा माझी आईकडे पहिली फर्माईश तर सांबरवडीचीच असायची आणि आई देखील आमच्यासाठी भरपूर सांबरवड्या बनवायची आणि अतिशय प्रेमाने आम्हाला खाऊ घालायची.आज आई तर आमच्या सोबत नाही परंतु लहानपणापासून तिने बनवलेल्या आणि प्रेमाने पोटभर खाऊ घातलेल्या सांबरवडीची सुरेख चव माझ्या जिभेवर अजूनही रेंगाळते आहे. मी अधूनमधून बनवते आईच्या पद्धतीची सांबार वडी. पण त्यात माझ्या आईच्या हातचा मायेचा ओलावा नाही. पण माझ्या मायेचा ओलावा माझ्या लेकासाठी नक्कीच असतो.

 

टॅग्स :पाककृती 2023अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.नागपूर