How to make non oily bread pakora: ब्रेड उरलाच तर ब्रेडची भजी खाण्याचा मोह होतोच. पण ब्रेडची भजी चवीला कितीही छान लागत असली तरी आरोग्याच्यादृष्टीने ती खाणं चुकीचं ठरतं. कारण एकच ब्रेडची भजी तेल खूप पितात. ही तेलकट भजी खाल्ल्यानंतर छातीत, पोटात जळजळ होणं, अपचन होणं यासारखे त्रास उद्भवतात. तसेच ब्रेडची तेलकट भजी खाऊन वजन वाढण्याचा धोका असतोच. फक्त चवीचा सोस म्हणून एवढा त्रास सहन करण्याची इच्छा नसते आणि ब्रेडची भजी खायला नकोशी वाटतात. पण ब्रेडची भजी करण्याची पध्दत बदलली तर मात्र भजी तेलकट होत नाही. उलट ती चविष्ट आणि खुसखुशीत होतात. न तळता ब्रेडची भजी करता येतात! भजी आणि तीही न तळता कसं शक्य आहे? असा प्रश्न पडला असेल ना, पण हे शक्य आहे. ब्रेडची भजी तळण्यापेक्षा तव्यावर थोडं तेल वापरुन भाजली तर ती चविष्ट आणि कुरकुरीत तर होतातच पण सोबत ही भजी खाऊन न पचनाचे त्रास उद्भवतात ना वजन वाढण्याचा धोका असतो. भाजून ब्रेडची भजी करणं ही अवघड गोष्ट नाही.
Image: Google
ब्रेडची भजी भाजून कशी करतात?
ब्रेडची भजी भाजून करण्यासाठी उकडलेले बटाटे, बेसन पीठ, तेल, उकडलेले मटार, कसूरी मेथी, हळद, गरम मसाला, लाल तिखट, सैंधव मीठ, साधं मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मोहरी, बडिशेप, आमचूर पावडर/ चाट मसाला, जिरे पूड आणि चिरलेली कोथिंबीर घ्यावी.
आधी बटाटे उकडून , सालं काढून कुस्करुन घ्यावेत, कढईत थोडं तेल तापवावं. ते तापलं की त्यात मोहरी घालावी. ती तडतडली की बडिशेप, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला आणि हळद घालून मसाला हलवून घ्यावा. त्यात कुस्करलेला बटाटा आणि मटार घालावेत, ते मिसळून घेतले की मग मीठ, सैंधव मीठ आणि आमचूर पावडर किंवा चाट मसाला घालावा. मध्यम आचेवर बटाट्याचं मिश्रण सतत परतत राहावं, मिश्रण छान खरपूस परतलं गेलं की गॅस बंद करावा. मिश्रणात कोथिंबीर घालावी आणि ते गार होण्यासाठी बाजूला ठेवावं.
Image: Google
भजी करण्यासाठीचं पीठ तयार करताना आधी एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ घ्यावं. बेसनात चवीपुरतं मीठ, चिमूटभर हळद, थोडं लाल तिखट आणि थोडं तांदळाचं पीठ घालावं. त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ सरबरीत होईल असं कालवून घ्यावं. मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. हे मिश्रण खूप पातळ करु नये. नाहीतर ब्रेडवर पिठाचं आवरण फारच पातळ होतं आणि मिश्रण घट्ट केल्यास ते भजींचं आवरण प्रमाणापेक्षा जाड होतं आणि ते नीट भाजले जात नाही. म्हणून पिठाचं मिश्रण हे सरबरीत असावं.
ब्रेडच्या दोन स्लाइस घ्याव्यात. एका स्लाइसला बटाट्याचं मिश्रण पसरुन लावावं. त्यावर दुसरा ब्रेड हलक्या हातानं दाबून ठेवावा. आता हा सारण भरलेला ब्रेड त्रिकोणी आकारात कापून घ्यावा. नाॅन स्टिक तव्याला थोडं तेल लावून तवा गरम होवू द्यावा. सारण भरुन त्रिकोणी आकारात कापलेला ब्रेड पिठाच्या मिश्रणात ब्रेडच्या दोन्ही बाजूंनी पीठ लागेल असा बुडवून गरम तव्यावर भाजण्यास ठेवावा.
Image: Google
ब्रेडची भजी भाजताना गॅस मध्यम आचेवर ठेवावा. ब्रेडची एक बाजू भाजली गेली की ब्रेड उलटवून दुसऱ्या बाजूने भाजून घ्यावा. दोन्ही बाजुंनी ब्रेड भाजला केला की तो तव्याला पुन्हा थोडं तेल लावून ब्रेड तव्यावर उभा ठेवावा. ब्रेडच्या तिन्ही कडा अशा पध्दतीने भाजून घ्याव्यात. ब्रेडची भजी भाजून करताना कडा कच्च्या ठेवू नये. ब्रेडची भाजून केलेली ही भजी चवीला छान लागतात. तेल न पिता कुरकुरीत आणि खमंग लागतात. सोबत पुदिना कोथिंबीरची हिरवी चटणी किंवा टमाट्याचा चटकदार साॅस छान लागतो.