Join us  

लिंबू न पिळता घरच्याघरी करा विकतसारखे परफेक्ट मऊ पनीर; घ्या सोपी-झटपट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 11:26 AM

How To Make Paneer at Home Without Lemon Easy Recipe : आपण आपल्या हाताने पनीर तयार केल्याने त्यामध्ये कोणत्याही पदार्थाची भेसळ असण्याचे कारण नसते.

पनीर हा अनेकांच्या अतिशय आवडीचा पदार्थ. तसेच दूधापासून तयार होणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने प्रोटीन खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. ज्या पद्धतीने आपण भाज्या आणि फळं खातो त्याचप्रमाणे दूध आणि दुग्धजन्य पदार्थही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. शाकाहारी लोक कुठेही बाहेर गेले की बहुतांशवेळा पनीर खाण्यालाच पसंती देतात. पनीरपासून भाजी, पराठा, भात, पकोडे असे अनेक पदार्थ तयार करता येत असल्याने आपण आहारात आवर्जून पनीर घेतो. घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे पनीर जितके सॉफ्ट तितके ते खायला जास्त चांगले लागते (How To Make Paneer at Home Without Lemon Easy Recipe).

(Image : Google)

गेल्या काही दिवसांत सगळ्याच गोष्टींचे दर वाढत असल्याने पनीरचेही दर वाढले आहेत. अशावेळी पनीर विकत आणण्यापेक्षा घरी करणे केव्हाही सोयीचे आणि जास्त चांगले. विकतच्या पनीरमध्ये भेसळ असण्याची शक्यता असते. आपण आपल्या हाताने पनीर तयार केल्याने त्यामध्ये कोणत्याही पदार्थाची भेसळ असण्याचे कारण नसते. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी आणि एकूणच तब्येत चांगली राहण्यासाठी घरी तयार केलेल्या पनीरचा वापर जरुर करा. मात्र हे पनीर फारकाळ टिकत नाही. त्यामुळे विकतच्या पनीरपेक्षा घरच्या घरीच छान लुसलुशीत पनीर तयार केले तर? आता पनीर तयार करायचं म्हटल्यावर दूध नासवणे आले. त्यासाठी आपण गरम दुधात लिंबू पिळतो. लिंबू पिळल्यानंतर दुधातील घट्टसर भाग वेगळा होतो आणि त्यातील पाणी वेगळे होते. मात्र यापेक्षा थोडी वेगळी पद्धत आज आपण पाहणार आहोत. 

पनीर कसे तयार करायचे? 

(Image : Google)

लिंबाचा रस दुधात घातल्याने दूध फाटते आणि पनीर तयार होते. मात्र या पद्धतीने मिळणारे पनीर तुलनेने कमी असते. त्यामुळे लिंबाच्या रसाऐवजी तुरटीचा वापर करणे फायद्याचे ठरते. गरम दुधात तुरटी फिरवल्याने आहे त्याच दुधातून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात पनीर निघेल. यासाठी सगळ्यात आधी दूध चांगले उकळून घ्यायचे. त्यानंतर ते कोमट करायचे. १ लिटर कोमट दुधासाठी साधारण १० ग्रॅम तुरटी पुरेशी आहे. या कोमट झालेल्या दुधात तुरटी घालून ते काही वेळ तसेच ठेवायचे. काही वेळातच दूधातून पनीर वेगळे निघेल. मग एका सुती कापडाने हे गाळून घेतल्यानंतर दूध आणि पनीर वेगळे होते. कापडात पनीरचा घट्टसर भाग राहील तो चांगला दाबून पिळून घ्यायचा. त्यानंतर हे घट्टसर पनीर फ्रिजमध्ये एका डब्यात ठेवायचे म्हणजे ते चांगले सेट होईल. ताजे असतानाच १-२ दिवसांत हे पनीर वापरायचे. 

पनीर खाण्याचे फायदे

१. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रोटिन्स मिळविण्याचा चांगला स्त्रोत आहे.

(Image : Google)

२. पनीरमध्ये कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पनीर दात व हाडांच्या मजबूतीसाठी फायदेशीर ठरते.

३. पनीरमध्ये असलेल्या फॅटी ॲसिडमुळे शरीरातील फॅट्स कमी होऊन वजन घटण्यास मदत होते.

४. पनीरमध्ये खूप जास्त कॅलरीज असतात. त्यामुळे एखाद्या अशक्त व्यक्तीला पनीर खायला दिल्यास अधिक फायदा होऊ शकतो.

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.