पनीर म्हणजे शाकाहारी करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा पदार्थ. दूधापासून तयार होणाऱ्या पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्याने आपण कुठे बाहेर गेलो की किंवा घरातही भाजीला पर्याय म्हणून आवर्जून पनीरचा वापर केला जातो. पनीरपासून भाजी, पराठा, भात, पकोडे असे अनेक पदार्थ तयार करता येत असल्याने आपण तब्येत चांगली राहावी यासाठी आवर्जून पनीर खातोच. पण बाजारात मिळणाऱ्या पनीरची किंमत इतकी जास्त असते की आपल्याला पनीर खरेदी करताना खूपदा विचार करावा लागतो. (How To Make Paneer From Curd At Home) घरात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारे हे पनीर जितके सॉफ्ट तितके ते खायला जास्त चांगले लागते. असे असले तरी पनीर फारकाळ टिकत नाही. ते ताजे असताना जितके चांगले लागते तितके ते फ्रिजमध्ये फारकाळ टिकत नाही. अशावेळी विकतच्या पनीरपेक्षा आपण घरच्या घरीच छान लुसलुशीत पनीर तयार केले तर?
आतापर्यंत आपण दूधापासून तयार केलेले पनीर खाल्ले असेल, पण दह्यापासून तयार होणारे पनीर घरच्या घरी ट्राय तर करुन बघा. आता हे पनीर कसे तयार करायचे असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. तर घरात राहीलेल्या दह्यापासून हे पनीर सोप्या पद्धतीने तयार होते. पावसाळ्याच्या दिवसांत आपण उन्हाळ्याइतके दही खात नाही. अशावेळी घरात जास्तीचे दही असेल तर त्यापासून सोप्या पद्धतीने पनीर तयार करता येते. इतकेच नाही तर आपण आपल्या हाताने पनीर तयार केल्याने त्यामध्ये कोणत्याही पदार्थाची भेसळ असण्याचे कारण नसते. त्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी आणि एकूणच तब्येत चांगली राहण्यासाठी आहारात पनीरचा वापर जरुर करा आणि हे पनीर घरच्या घरी तयार करा. पाहूयात पनीर तयार करण्याची सोपी पद्धत...
साहित्य -
१. दही - १ किलो
२. दूध - अर्धा लीटर
३. लिंबाचा रस - ४ चमचे
कृती -
१. चक्का तयार करण्यासाठी आपण ज्याप्रमाणे दही एका सुती कापडात बांधून ठेवतो, त्याचप्रमाणे दही बांधून ठेवा.
२. दुसरीकडे एका नॉन स्टीक पॅनमध्ये दूध घालून ते उकळा
३. दूध चांगले उकळले की त्यामध्ये लिंबाचा रस घालून ते पुन्हा चांगले उकळून घ्या.
४. गॅस बंद करुन लिंबाचा रस दुधात चांगला मिसळून घ्या आणि दूध फाटण्याची वाट बघा.
५. दूध फाटल्यानंतर त्यातील पाणी वेगळे होईल आणि घट्ट भाग वेगळा होईल. हे गाळून घ्या आणि घट्टसर भाग एका बाऊलमध्ये ठेवा.
६. दही घेऊन त्यात हे फाटलेल्या दुधाचे मिश्रण घाला आणि हे सगळे पुन्हा एका सुती कपड्यात बांधून ठेवा.
७. दह्याचा आंबटपणा जाण्यासाठी या मिश्रणावर आणखी एक सुती कपडा गार पाण्याने धुवून यावर ठेवा आणि त्यावर जड असे वजन ठेवा.
८. जवळपास अर्धा ते एक तासात हे पनीर सेट होते. याचे बारीक तुकडे करा आणि भाजी किंवा पराठा, पनीर राईस यासाठी हे पनीर वापरा. यापासून जवळपास अर्धा किलो पनीर नक्की तयार होते. मुख्य म्हणजे आपण घरात तयार केल्याने यामध्ये कोणताही रासायनिक घटक नसतो.