Join us  

बिर्याणी लज्जतदार करायची तर लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी; चव अशी भारी की.. लाजबाब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2022 1:48 PM

How To Make Perfect Biryani Cooking Tips by Chef : बिर्याणी परफेक्ट करायची तर कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे याविषयी

ठळक मुद्देवाफ व्यवस्थित बसण्यासाठी झाकण उघडण्याची घाई न करता काही वेळाने झाकण उघडायला हवे. बिर्याणीचा तांदूळ पूर्ण मोठा आहे तसा राहण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात.

थंडीच्या दिवसांत सारखं गरमागरम काहीतरी हवं असतं. त्यातही या काळात बाजारात बऱ्याच भाज्या उपलब्ध असल्याने आपण बिर्याणीचा बेत करतो. व्हेज बिर्याणीबरोबरच नॉनव्हेजमध्येही वेगवेगळ्या प्रकारची बिर्याणी केली जाते. बिर्याणी हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतो. गरमागरम बिर्याणी आणि त्यासोबत एखादे सलाड असेल की जेवायला आणखी काही नसेल तरी चालते. आता ही बिर्याणी सगळ्यांनाच परफेक्ट जमते असं नाही. कधी यातला मसाला गंडतो तर कधी तांदूळ हवा तसा फुलत नाही. कधी पाणी जास्त राहतं तर कधी आणखी काही. आता बिर्याणी परफेक्ट करायची तर कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे याविषयी प्रसिद्ध शेफ अजय चोप्रा काही महत्त्वाच्या टिप्स देतात. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ते आपल्याशी या टिप्स शेअर करातत, त्या कोणत्या पाहूया (How To Make Perfect Biryani Cooking Tips by Chef)...

(Image : Google)

१. तांदूळ पूर्ण मोठाच्या मोठा आहे तसाच राहावा यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. बिर्याणी करताना आपण तांदूळ धुवून घेतो आणि हाताने तो कुकरमध्ये किंवा कढईमध्ये घालतो. पण तसे न करता डायरेक्ट भांड्यातूनच ओतून हा तांदूळ कुकरमध्ये घालायला हवा, म्हणजे तो तुटत नाही. तसेच यामध्ये डाव घालून तो जोरजोरात न हलवता अगदी हलक्या हाताने हा भात हलवायला हवा, म्हणजे तांदूळ तुटत नाही. 

२. दम बिर्याणी म्हणजेच आपण कढईला किंवा भांड्याला कडेने कणीक लावून हे भांडे बंद करतो. अशावेळी बिर्याणी शिजली आहे की नाही हे आपल्याला कसे कळणार? असा प्रश्न अनेकांना असतो. तर दम लावून भांडे सगळीकडून बंद केल्यावर वरच्या झाकणाला हात लावल्यावर चटका बसत असेल आणि नकळत आपले बोट झटकन मागे येत असेल तर बिर्याणी झाली असे समजावे. 

३. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला अनेकदाा आपण केलेला पदार्थ बरोबर झाला आहे की नाही हे पाहण्याची बरीच घाई असते. त्यामुळे गॅस बंद केल्या केल्या आपण घाईने याचे झाकण उघडण्याचा प्रयत्न करतो. पण गॅस बंद केल्यानंतरही या भांड्यात बरीच वाफ असते. ज्या वाफेवर तांदूळ पूर्ण शिजण्यास मदत होते. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतर आतली वाफ व्यवस्थित बसण्यासाठी झाकण उघडण्याची घाई न करता काही वेळाने झाकण उघडायला हवे. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती