डोसा, इडली, उत्तपा, रस्सम, सांबार यांसारखे दाक्षिणात्य पदार्थ आपल्या घरी बहुतेकवेळा बनविले जातात. काही घरांमध्ये हे पदार्थ सकाळच्या नाश्त्याला आवडीने खाल्ले जातात. या दाक्षिणात्य पदार्थांना चटणी आणि सांबार सोबत खाण्याची मजा काही औरच असते. काही भारतीय खाद्यपदार्थ केवळ भारतातच नाही तर जगातील बहुतांश देशात लोकप्रिय आहेत. दाक्षिणात्य खाद्यपदार्थ हे त्याचेच एक उत्तम उदाहरण आहे. भारतात अनेक पदार्थ पारंपरिक पदार्थ म्हणून ओळखले जातात, मैसूर बोंडा हा त्यापैकीच एक पदार्थ आहे. दाक्षिणात्य पदार्थांच्या यादीतील मैसूर बोंडा हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे.
कुरकुरीत फुललेला मैसूर बोंडा हा म्हैसुरचा सुप्रसिद्ध पदार्थ दिसायला जेवढा सुंदर तेवढाच खायला चविष्ट आणि बनवायला तर अगदी सोपा आहे. आपल्याला संध्याकाळच्या नाश्त्याला जर काही गरमागरम चटपटीत खायची इच्छा होत असेल तर आपण मैसूर बोंडा घरच्या घरी बनवू शकता. जेव्हा दक्षिण भारतीय पाककृती आणि स्वादिष्ट पदार्थांचा विचार केला जातो तेव्हा म्हैसूरचे स्वतःचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. म्हैसूर हे कर्नाटकातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांचे माहेरघर आहे. मैसूर बोंड्यांला मैसूर भजी असे देखील म्हटले जाते. मैसूर बोंडा हे एक आरोग्यदायी स्नॅक असून, बाहेरील बाजूने कुरकुरीत आणि आतील बाजूस मऊ स्पंजसारखे असतात. मैसूर बोंडा नारळाच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह केल्यावर छान लागतात(How To Make Perfect Fluffy Mysore Bonda At Home).
साहित्य :-
१. दही - १ कप २. तांदळाचे पीठ - १/२ कप ३. मैदा - १ कप ४. आलं - १ टेबलस्पून (किसून घेतलेलं)५. जिरे - १ टेबलस्पून ६. हिरव्या मिरच्या - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेल्या)७. कोथिंबीर - १/२ कप ८. खायचा सोडा - १/२ टेबलस्पून ९. मीठ - चवीनुसार १०. कढीपत्ता - १ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेला)११. पाणी - गरजेनुसार १२. तेल - गरजेनुसार
कृती :-
१. एका मोठ्या बाऊलमध्ये दही घेऊन त्यात तांदळाचे पीठ, मैदा, किसून घेतलेलं आलं, जिरे, बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, खायचा सोडा, बारीक चिरलेला कढीपत्ता व चवीनुसार मीठ घालून घ्यावे. २. आता हे सर्व जिन्नस चमच्याच्या मदतीने एकजीव करुन घ्यावे. ३. हे पीठ चमच्याच्या मदतीने ढवळत असताना त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून ढवळावे. ४. हे पीठ ढवळत असताना ते एकाच दिशेत ५ ते ७ मिनिटे ढवळून घ्यावे.
कच्छी दाबेली घरी करण्याची पारंपरिक रेसिपी, कच्छच्या रणात करतात तशी दाबेली, खाऊन तर पाहा...
५. मैसूर बोंड्यांचे पीठ तयार करताना ते एकदम पातळ करु नये थोडे घट्टसरच ठेवावे. ६. आता एका मोठ्या कढईमध्ये तेल घेऊन या पिठाचे भज्यांसारखे छोटे छोटे गोळे गरम तेलात सोडावे.७. त्यानंतर हे मैसूर बोंडा दोन्ही बाजूंनी हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यावेत.
आता हे मैसूर बोंडा खाण्यासाठी तयार आहेत. गरमागरम मैसूर बोंडा खोबऱ्याच्या चटणी किंवा सांबरसोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.