Join us  

गौरीसाठी परफेक्ट गोविंद विडा हवाय? विडा बांधायची नेमकी पद्धत, पाहा व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2022 10:06 AM

How To Make Perfect Govind Vida For Gauri Ganpati Naivedya : गोविंद विडा स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते पाहूया

ठळक मुद्देपानामध्ये सगळे घालून तयार झाले की त्याचे फोल्डींग सगळ्यात महत्त्वाचे आहे. नेवेद्याच्या पानातील प्रत्येक गोष्ट ज्याप्रमाणे महत्त्वाची असते त्याचप्रमाणे विडाही अतिशय महत्त्वाचा असतो.

गौरी म्हणजे माहेरवाशीणी. या माहेरवाशीणी माहेरी आल्या की जेवण करुन तृप्त होऊन पुन्हा आपल्या सासरी जाव्यात अशी धारणा असते. पुरणा-वरणाचे जेवण झाल्यावर हे खाल्लेले सगळे नीट पचावे यासाठी आपण विडा खातो. एरवी हा विडा आपण साध्या पद्धतीने बनवत असलो तरी गौरीसाठी किंवा नैवेद्याचे ताट ठेवताना त्यासोबत आपण गोविंद विडा ठेवतो. हा गोविंद विडा दिसायला आकर्षक दिसत असला तरी तो बांधण्याची काही खास पद्धत असते. एखादा पदार्थ करण्याची ज्याप्रमाणे कला असते, त्याचप्रमाणे विडा बांधण्याची पण कला असते. आता एरवी आपल्याला विडा बांधण्याची फारशी सवय नसल्याने ऐन गौरी-गणपतीत हा विडा बांधायची वेळ आली की आपली तारांबळ होण्याची शक्यता असते. मात्र आपली गडबड होऊ नये म्हणून आधीच आपण थोडी तयारी करुन ठेवली तर आपले ऐनवेळेचे काम सोपे होऊ शकते. आता हा गोविंद विडा स्टेप बाय स्टेप कसा बनवायचा ते पाहूया (How To Make Perfect Govind Vida For Gauri Ganpati Naivedya)...

(Image : Google)

१. गोविंद विडा म्हणजे ५ पानांचा मिळून केलेला विडा. लहान मोठ्या आकाराची पानं घेऊन ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावीत. 

२. या पानांची देठं काढून त्यातील मध्यम आकाराच्या एका पानाला मागून अगदी हलका चुना लावून घ्यायचा. खूप जास्त चुना लावला तर पान तिखट लागतं. तसंच सगळ्या पानांना चुना न लावता एकाच पानाला चुना लावला तरी चालतो. 

३. या चुना लावलेल्या पानावर अर्धा चमचा गुलकंद आणि फ्रेश सुके खोबरे घाला. त्यावर कातलेली सुपारी किंवा तुम्हाला आवडेल ती सुपारी घातली तरी चालते. नंतर यामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरची एकत्र असलेली रंगबिरंगी बडिशेप घाला. तुम्ही आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार धणाडाळ, साधी बडीशेप असे काहीही घालू शकता. 

४. यामध्ये चमन बहार घाला, त्यामुळे पानाला छान स्वाद येईल. यावर अगदी थोडा कात घाला. यामुळे विडा रंगायला मदत होते. यानंतर वेलदोड्याचे २-३ दाणे घालायचे. 

५. पानामध्ये सगळे घालून तयार झाले की त्याचे फोल्डींग सगळ्यात महत्त्वाचे आहे. पान आडवे ठेवून त्याचा परफेक्ट त्रिकोण होईन असे दोन फोल्ड करायचे. पान कोनासारखे हातात घ्यायचे आणि पानावर ठेवलेल्या सगळ्या गोष्टी आतमध्ये दाबून घ्यायच्या. यामध्ये तुम्हाला आणखी काही घालायचे राहिले असल्यास घालू शकता. यावर २ काड्य़ा केशर घालावे. वरच्या बाजुने ३ पोल्ड देऊन हा विडा बंद करावा.

६. हा विडा टोक वरच्या बाजूला घेऊन एका पानावर ठेवायचा. पाने दोन्ही बाजुने दोन दोन घड्या घालून दुमडून मग खालच्या बाजूला दुमडायचे. उरलेल्या तिन्ही पानांचे असेच करुन घ्यायचे. याला खालच्या बाजुने लवंग लावून विडा बंद करायचा. 

टॅग्स :अन्नपाककृतीगणेशोत्सवगणपती