Join us  

हॉटेलस्टाइल एकदम मोकळा जीरा राईस घरी करायचा आहे? ५ टिप्स, जीरा राईस बिघडणारच नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2023 6:55 PM

How To Make Perfect Jeera Rice : Easy Restaurant Style Jeera Rice Recipe : जीरा राईस कधी गचका होतो तर कधी कचरट राहतो, परफेक्ट जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी

रोजच्या जेवणाचा कंटाळा आला किंवा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा झाली की आपण हॉटेलमध्ये जातो. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण शक्यतो मसालेदार घट्टसर ग्रेव्ही असणाऱ्या भाज्याच ऑर्डर करतो. या भाज्यांसोबत रोटी, नान, गार्लिक नान, कुलचा असे रोटीचे प्रकार खातो. रोटी खाल्ल्यानंतर भात खाण्याची इच्छा झाली की आपण हमखास जिरा राईस ऑर्डर करतोच. हॉटेलमध्ये मिळणाऱ्या मसालेदार, घट्टसर ग्रेव्हीसोबत साध्या भाताऐवजी जिरा राईसच खूप छान लागतो.

आपल्या रोजच्या भाताला खमंग तूप आणि जिऱ्याची फोडणी देऊन, साध्या भाताला थोडे मॉर्डन स्वरुप दिले आहे. पार्ट्या, लग्न, घरातील छोटेखानी समारंभ असला की मेन्यू लिस्टमध्ये जिरा राईसचे नाव आवर्जून असतेच. जिरा राईस आपण दाल फ्राय, दाल तडका, सांबर सोबत खाल्ला तर अधिकच चविष्टय लागतो. हॉटेलमधील जिरा राईस खाल्ल्यानंतर, असाच जिरा राईस आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही केल्या हॉटेलसारखा जिरा राईस घरी बनत नाही.अशावेळी हॉटेलसारखा परफेक्ट मोकळा जिरा राईस करण्यासाठीच्या काही खास टीप्स फायदेशीर ठरतील(How To Make Perfect Jeera Rice : Easy Restaurant Style Jeera Rice Recipe).    

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप २. पाणी - गरजेनुसार ३. मीठ - चवीनुसार ४. व्हिनेगर - १ टेबलस्पून ५. जिरे - २ टेबलस्पून ६. कोथिंबीर - २ टेबलस्पून७. तूप - २ टेबलस्पून८. तमालपत्र - १ पान   

कृती :- 

१. जिरा राईस करण्याआधी किमान १ तास तांदूळ पाण्यात भिजत घालावेत.  २. त्यानंतर एका मोठ्या टोपात पाणी घेऊन ते गरम करुन घ्यावे. ३. पाणी हलके गरम झाल्यावर त्यात प्रत्येकी १ टेबलस्पून मीठ, व्हिनेगर व तमालपत्र घालावे. त्यानंतर मीठ आणि व्हिनेगर पाण्यांत मिक्स होईपर्यंत चमच्याने ढवळून घ्यावे.४. पाण्याला उकळी फुटल्यानंतर त्यात भिजवून घेतलेले तांदूळ घालावेत. ५. तांदूळ घातल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवावा. 

६. आता ६ ते ८ मिनिटे भात मोठ्या आचेवर व्यवस्थित शिजू द्यावा.  ७. भात शिजल्यानंतर तो लगेच एका चाळणीत काढून घ्यावा. आता २ मिनिटे थांबून त्यातील सर्व पाणी निथळून जाऊ द्यावे. ८. आता एका मोठ्या भांड्यात २ टेबलस्पून तूप घ्यावे, तूप संपूर्ण वितळल्यानंतर त्यात २ टेबलस्पून जिरे घालावे. ९. त्यानंतर शिजवून घेतलेला भात यात घालावा. १०. २ ते ५ मिनिटे शिजवून झाल्यानंतर त्यावरून बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. ११. तयार झालेला जिरा राईस चमच्याच्या मदतीने ढवळून एकजीव करून घ्यावा. 

परफेक्ट हॉटेल्स्टाईल जिरा राईस खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम दाल फ्राय, दाल तडका किंवा घट्टसर भाज्यांच्या ग्रेव्हीसोबत जिरा राईस खाण्यासाठी सर्व्ह करावा.  

जिरा राईस अधिक टेस्टी करण्यासाठी काही उपयुक्त टिप्स :- 

१. जिरा राईस अधिक टेस्टी करण्यासाठी योग्य तांदळाची निवड करा. शक्यतो जिरा राईस बनविण्यासाठी उत्तम प्रतीच्या सुगंधी लांब बासमती तांदळाची निवड करावी. 

२. भातामध्ये जिऱ्याचा फ्लेवर उतरण्यासाठी पुरेशा प्रमाणात जिरे घालावे. 

३. जिरा राईस बनवताना जर आपल्याला तो थोडा तिखट हवा असेल तर जिरा राईस परतून घेताना त्यात तूप, जिऱ्यासोबत, बारीक चिरुन घेतलेली हिरवी मिरची घालावी. 

४. जर आपल्याला शाही जिरा राईस हवा असेल तर जिरा राईस परतून घेताना त्यात काजूचे बारीक तुकडे करून घालावेत. 

५. जिरा राईस करताना पाणी योग्य प्रमाणांत घ्यावे. अधिक पाणी घेतल्यास भात गचका होईल.

टॅग्स :पाककृतीअन्न