श्रावण महिना म्हटलं की सणवार आणि नैवेद्य ओघानेच आले. त्यात यंदा अधिक महिना आल्याने जावयाला जेवणासाठी घरी बोलवणे, श्रावणातली सत्यनारायणाची पूजा, मंगळागौरीची पूजा अशा विविध प्रकारची धार्मिक कार्ये असतात. या प्रसंगी आवर्जून पुरीचा बेत केला जातो. पण या पुऱ्या कधी एकदम कडक होतात तर कधी वातड होतात. टम्म फुगल्याच नाहीत तर पुऱ्यांची काही मजाच राहत नाही. पण याच पुऱ्या जर छान टम्म फुगलेल्या असतील तर खायला जी मजा येते ती शब्दांत सांगताच येणार नाही (How To Make Perfect Poori Tips for Puffing Poori Easily).
गरम पुरी आणि श्रीखंड किंवा गरम पुरी आणि बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन दिल खुश करणारे. मग सगळेच जेवून तृप्त होतात आणि आपल्यालाही सगळी मंडळी पोटभर जेवल्याचं समाधान मिळतं. आता या पुऱ्या छान टम्म फुगाव्यात म्हणून नेमकं काय करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उमा रघुरामन यांनी आपल्या मास्टर शेफ मॉम या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याविषयी काही भन्नाट टिप्स शेअर केल्या आहेत. त्या कोणत्या आणि कशा फॉलो करायच्या याविषयी...
१. आपण पुऱ्या साधारणपणे पोळपाटावर लाटतो. तर या पोळपाटाला आणि लाटण्याला सगळीकडून चांगले तेल लावून घ्या. साधारण ३ ते ४ पुऱ्या झाल्यावर पुन्हा पुन्हा अशाप्रकारे दोन्हीला तेल लावा. त्यामुळे पुऱ्या चांगल्या लाटल्या जातील.
२. पुऱ्या झटपट व्हाव्यात आणि खाल्ल्यासारख्या वाटाव्यात यासाठी आपण त्या थोडया मोठ्या आकाराच्या करायला जातो. पण त्यामुळे पुऱ्या फुगण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होते. पुऱ्या लहान आकाराच्या आणि एकसारख्या लाटायला हव्यात.
३. पुऱ्या लाटताना खूप जास्त जोर न लावता हळूवारपणे लाटायला हव्यात. खूप हळुवारपणेही न लाटता योग्य तितका जोर द्यायला हवा. एकदा पुऱ्या जमल्या की मग नकळत आपला आत्मविश्वास वाढतो आणि पुऱ्या छान व्हायला लागतात.
४. पुरी लाटून झाल्यावर तेलात सोडण्याआधी तेल कितपत तापले आहे याचा अंदाज घ्यायला हवा. पहिली पुरी ही ट्रायल असते त्यामुळे तेल चांगले तापलेले असेल तर ही पुरी पटकन फुगते. मग गॅस बारीक करावा आणि मग बाकीच्या पुऱ्या तळाव्यात. थोडा वेळाने कढईतून धूर यायला लागतो आणि पुऱ्या ब्राऊन व्हायला लागतात, अशावेळी गॅश बंद करावा.
५. पुरी छान फुगण्यासाठी तेलात घातल्यावर ती हळूवारपणे झाऱ्याने दाबत राहावी. तसेच त्याच्या वरच्या बाजूवर एकसारखे तेल उडवत राहावे. त्यामुळे पुरी फुगण्यास मदत होते.
६. पुऱ्या तळायच्या आधी ५ ते ६ लाटून ठेवा. दुसरीकडे तेल चांगले तापू द्या. तसेच पुरी खूप पातळ आणि खूप जाड नको, मध्यम जाडीची हवी. तुम्हाला छान गोल आकार हवा असेल आणि तसा जमत नसेल तर सरळ वाटीने किंवा एखाद्या झाकणाने पुरी गोलाकार करुन घ्यावी.