Lokmat Sakhi >Food > ओल्या नारळाचे पाकातले लाडू का बिघडतात? लाडू जमून येण्यासाठी पाकाचं गणित कसं जमवावं?

ओल्या नारळाचे पाकातले लाडू का बिघडतात? लाडू जमून येण्यासाठी पाकाचं गणित कसं जमवावं?

रवा आणि ओल्या नारळाचे पाकातले लाडू (rava coconut ladoo) फक्कड जमून येण्यासाठी लाडूच्या सामग्रीचं प्रमाण आणि त्यानुसार पाकाचं गणित योग्य असणं गरजेचं आहे. हे गणित जमून येण्यासाठी या लाडूचे थोडे बारकावे माहित (tips for perfect rava coconut ladoo) असायला हवेत. लाडू चुकले तरी ते दुरुस्तही करता येतात, हे माहिती आहे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2022 07:17 PM2022-09-01T19:17:45+5:302022-09-01T19:25:36+5:30

रवा आणि ओल्या नारळाचे पाकातले लाडू (rava coconut ladoo) फक्कड जमून येण्यासाठी लाडूच्या सामग्रीचं प्रमाण आणि त्यानुसार पाकाचं गणित योग्य असणं गरजेचं आहे. हे गणित जमून येण्यासाठी या लाडूचे थोडे बारकावे माहित (tips for perfect rava coconut ladoo) असायला हवेत. लाडू चुकले तरी ते दुरुस्तही करता येतात, हे माहिती आहे का?

How to make perfect rava coconut ladoo | ओल्या नारळाचे पाकातले लाडू का बिघडतात? लाडू जमून येण्यासाठी पाकाचं गणित कसं जमवावं?

ओल्या नारळाचे पाकातले लाडू का बिघडतात? लाडू जमून येण्यासाठी पाकाचं गणित कसं जमवावं?

Highlights रवा भाजताना तूप कमी वापरलं असेल, रवा जास्त आणि खोबऱ्याचं प्रमाण कमी असेल तर अशा मिश्रणाचे लाडू नीट वळले जाण्यासाठी पाक जास्त घट्ट असून चालत नाही. तुपाचं आणि नारळाचं प्रमाण जास्त असेल तर लाडूच्या मिश्रणाला पाक जास्त चिकट लागतो.

 गणपतीला प्रसाद म्हणून ओलं नारळ आणि रव्याचे पाकातले लाडू ( rava coconut ladoo)  आवडीने केले जातात. पण लाडुच्या सामग्रीचं प्रमाण आणि पाकाचं गणित यात कुठेतरी चुका होतात आणि हौशीनं केलेले लाडू बिघडतात. कधी लाडूचं मिश्रण इतकं फडफडीत होतं की लाडू वळलेच जात नाही तर कधी लाडूचं मिश्रण फारच पातळ होतं. रवा आणि ओल्या नारळाचे पाकातले लाडू फक्कड जमून येण्यासाठी (tips for perfect rava coconut ladoo)  लाडूच्या सामग्रीचं प्रमाण आणि त्यानुसार पाकाचं गणित योग्य असणं गरजेचं आहे. हे गणित जमून येण्यासाठी या लाडूचे थोडे बारकावे माहित   असायला हवेत.  तसेच लाडू जर बिघडले तर ते सुधरवण्यासाठीच्या स्मार्ट टिप्सही माहिती असायला हव्यात. 

Image: Google

रवा नारळाचे लाडू करताना

 साधारणपणे रवा नारळाचे पाकातले लाडू करताना रवा तुपावर भाजला जातो. रवा भाजत आला की त्यात खोबरं घालून मिश्रण आणखी थोडं भाजून घेतलं जातं. या मिश्रणात पाक घालून थोडा वेळ ठेवलं जातं आणि मग लाडू वळायला आले की लाडू केले जातात.  भाजलेल्या रव्या नारळाच्या मिश्रणात पाक घातला की जे दिसतं त्यानं जीवच घाबरतो. कारण मिश्रण एकदम पात्ळ दिसतं. पण हीच या लाडूची गंमत आहे. आधी पातळ दिसणारं मिश्रण पाक पिऊन मस्त फुलतं, कोरडं होतं आणि लाडू वळायला येतात. इथे लाडूच्या सामग्रीचं प्रमाण आणि त्यानुसार पाकाच्या तारेचं गणित जमवलं नाही तर मात्र गडबड होते. जर तूप आणि नारळाचं प्रेमाण जास्त असेल तर अशा लाडुंना एकतारी पाक लागतो. म्हणजे पाक जास्त घट्ट असू  चालत नाही. अशा मिश्रणाला पाक जास्त घट्ट झाला तर मिश्रण फडफडीत होतं आणि लाडूच वळता येत नाही. रवा आणि नारळाचं प्रमाण जास्त असेल आणि भाजताना तूपही कमी वापरलं असेल तर मिश्रणात कोरडेपणा असतो. अशा कोरड्या मिश्रणाला पाक एकतारी लागतो. कारण हे मिश्रण पाकातील आर्द्रता शोषून मग मऊसर होतं.  पण जर रवा भाजताना तूप जास्त घातलं असेल  तर मिश्रणाची स्निग्धता वाढते. आणि त्यातच ओल्या नारळाचं प्रमाणही जास्त असेल तर त्यामुळे रव्यामधली स्निग्धता आणखी वाढते. अशा परिस्थितीत रव्याचे कण पाकातली आर्द्रता म्हणजे ओलावा शोषून घेऊ शकत नाही असं मिश्रण थंड झाल्यावरही त्याचा पातळपणा राहातो आणि लाडू नीट वळले जात नाही. तूप जास्त , ओलं नारळ जास्त  असं प्रमाण असेल तर पाक एकतारी करुन चालत नाही अशा मिश्रणाला पाक दिडतारी लागतो. अनेक जण रव्या नारळाच्या लाडूत थोडा खवाही टाकतात. खव्यातही स्निग्धांश असतात. त्यामुळे अशा मिश्रणाला पाक दीड तारी पेक्षा जास्त घट्ट म्हणजे दोन तारी लागतो. 

Image: Google

पाकाचं गणित चुकलं तर

समजा लाडुची सामग्री आणि पाकाचं गणित समजा बिघडलंच तर आता सर्व वाया गेलं म्हणून हताश होण्याची गरज नसते. बिघडलेलं मिश्रण दुरुस्त करुन लाडू करता येतात. 

1. समजा  लाडूचं मिश्रण फारच पातळ झाल्यासारखं वाटलं तर या मिश्रणाल चटका द्यावा. म्हणजे लाडूचं मिश्रण कढईत काढून ते गॅसवर ठेवावं. थोडं गरम करावं.  मिश्रण गरम झालं की अर्थातच मिश्रणातली आर्द्रता कमी होते. मिश्रण थोडं घट्ट झाल्यासारखं झालं की गॅस बंद करावा आणि मिश्रण गार झाले की लाडू वळावेत.

2. लाडूचं मिश्रण खूपच फडफडीत झालं तर दोन गोष्टी करता येतात. एकतर मिश्रणात थोडं तूप गरम करुन घालावं. तुपामुळे लाडू वळायला येतात. पण जर तूप घालायचं नसेल तर थोडं दूध गरम करुन ते घालावं. किंवा थोडं पाणी उकळून मिश्रणात घातलं तरी लाडू वळायला येतात आणि मऊ होतात. 

3. लाडूचं मिश्रण भाजून गार झालं की मग त्यात गरम पाक घालावा. लाडूचं मिश्रण गरम असतानाच गरम पाक घातला तर मिश्रण कडक होतं.  

Image: Google

परफेक्ट लाडू जमण्यासाठी

रवा नारळाचे लाडू परफेक्ट जमण्यासाठी 2 वाट्या बारीक रवा, पाऊण वाटी तूप, 2 वाट्या खोवलेलं ओलं नारळ, दीड वाटी साखर, वेलची पावडर  आणि आवडत असल्यास थोडा खवा एवढं जिन्नस घ्यावं. 
रव्याचे लाडू करताना कढईत तूप गरम करावं. तूप गरम झालं की त्यात रवा घालावा. रवा भाजताना गॅसची आच मंद असावी. रवा सतत परतत राहावा. रवा सोनेरी रंगावर भाजला गेला की मग त्यात खोवलेलं नारळ घालून मिश्रण पुन्हा भाजून घ्यावं. नंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्यावं. मिश्रण थंड होवू द्यावं. तोपर्यंत पाक तयार करावा. पाक करताना साखर बुडेल इतकं पाणी घालावं. सर्व मिश्रण बेताचं असल्यानं दोन तारी पाक करावा.  पाक झाला त्यातच वेलची पूड मिसळून घ्यावी. पाक झाला की तो थंड झालेल्या रव्याच्या मिश्रणात घालावा. मिश्रण तास- दीड तास तसंच ठेवावं आणि मग लाडू वळावेत. असे लाडू चवीला खमंग लागतात आणि लाडुचा पोत एकदम मऊ असतो. 

Web Title: How to make perfect rava coconut ladoo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.