Join us  

साबुदाणा खिचडी कधी चिकट होते, तर कधी कडक- परफेक्ट मोकळी खिचडी करण्याची १ सोपी ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2023 9:45 AM

How To Make Perfect Sabudana Khichadi Recipe : खिचडी चिकट न होता मोकळी व्हावी यासाठी काही सोप्या टिप्स...

साबुदाणा खिचडी ही अनेकांच्या आवडीचा विषय. उपवासाला खाल्ला जाणारा हा पदार्थ आपण काही वेळा सहज म्हणून नाश्त्यालाही करतो. पण ही खिचडी छान मोकळी झाली तर चांगली लागते. इतकंच नाही तर गरम असतानाच खिचडी खाण्यात मजा आहे. एकदा का ती गार झाली की मग त्याचा गिच्च गोळा होतो. जास्तच गिचका झाली तर ही खिचडी नंतर रबरासारखी लागते. मग सगळे जिन्नस घालूनही घरातील कोणीच त्याकडे अजिबात पाहतही नाहीत (How To Make Perfect Sabudana Khichadi Recipe). 

एरवी पुन्हा पुन्हा खिचडी मागून घेणारेही अशावेळी ही खिचडी खाणं टाळतात. पण खिचडी कायम छान मोकळी व्हावी यासाठी काय करता येईल याबाबत आज आपण एक सोपी ट्रिक पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर सरीता किचन या पेजच्या माध्यमातून सरीता पद्मन यांनी ही ट्रीक आपल्यासोबत शेअर केली आहे. त्यामुळे तुम्हीही खिचडी प्रेमी असाल आणि तुमचीही खिचडी चिकट होत असेल तर हा प्रयोग तुम्ही नक्की ट्राय करुन पाहा.  

(Image : Google)

१. साबुदाणा चिकट असतो हे आपल्याला माहित आहे, त्यामुळे काही वेळा खिचडी चिकट होते. पण शेंगदाण्याचा कूटही चिकट असतो त्यामुळे हे दोन्ही एकत्र आले की खिचडी थंड झाल्यावर तिचा गोळा होतो. 

२. आपण साधारणपणे भिजलेल्या साबुदाण्यामध्ये कूट, साखर, मीठ घालतो आणि मग हे सगळे फोडणीत घालतो. पण असे करुन नये, कारण यामुळेच खिचडी जास्त चिकट होण्याची शक्यता असते. 

३. त्याऐवजी तेलामध्ये जीरे, मिरची, बटाटा घातल्यानंतर तो ३ ते ४ मिनीटे परतून घ्यावा आणि त्यानंतर यामध्येच दाण्याचा कूट घालावा. मग पुन्हा हे सगळे चांगले परतून घ्यावे.

४. या मिश्रणात लिंबाचा रस पिळून घ्यावा. आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस पिळावा आणि त्यानंतर साबुदाणा यामध्ये घालून मीठ, साखर घालून सगळे चांगले परतून घ्यावे. 

५. लिंबाच्या रसामुळे खिचडी मोकळी आणि मऊसर होते. ही खिचडी बराच वेळ अशी राहते. विशेष म्हणजे ती पुन्हा गरम केली तरीही चिकट न होता आहे तशीच मोकळी राहते. म्हणूनच लिंबू वरुन पिळून घेण्यापेक्षा अशाप्रकारे खिचडी करताना पिळल्यास खिचडी चांगली व्हायला मदत होते. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.