साबुदाणा खिचडी. सगळ्यांचा आवडता पदार्थ. छान मोकळी, मऊ, गरमगरम चविष्ट खिचडी म्हणजे उपवास असो नसो खायला मिळणं म्हणजे सुख. साबुदाणा खिचडीचा खमंग सुगंधच अतिशय मोहात पाडतो. त्यातही श्रावणी सोमवार म्हणजे तर घरोघर साबुदाणा खिचडीचा सोहळाच होतो. कढईभर खिचडी कधी कशी संपते कळत नाही इतकी ती अनेकांना प्रिय. मस्त कोथिंबीर-खोबरं घालून वरुन लिंबू पिळून खायलाही अनेकांना आवडतं. काहींना ती तिखटसर खिचडीच आवडते. जेवढी घरं तेवढ्या चवी. मात्र अनेकांना आणि अनेकींना असं वाटतंच की आपल्याला अजून परफेक्ट साबुदाणा खिचडी करता यायलाच हवी. (how to make perfect sabudana khichdi?मग त्यासाठी ते गुगल करतात परफेक्ट युक्ती. अनेकांना विचारतातही की कशी करायची परफेक्ट खिचडी.
(Image : Google)
आपण जेव्हा म्हणतो की परफेक्ट खिचडी जमत नाही तेव्हा नेमकं काय चुकतं, बिनसतं हे तसं सांगता येत नाही.काहीजण मग साबुदाण्यालाच दोष देतात की आजकाल साबुदाणा बरा येत नाही, नीट भिजत नाही. साबुदाणा व्यवस्थित भिजणे खरंच महत्त्वाचे असते. त्यात फोडणीत तूप मापात हवं. मग आच नेमकी हवी, फार कमी नाही-जास्त नाही.दाण्याचा कुट कंजूसपणा न करता पण अतीही व्हायला नको. हे सारं जमलं तर खिचडी छान होते.पण तरी एक-दोन युक्त्या माहिती हव्या म्हणजे मग उन्नीस बिस झालं तरी साबुदाणा खिचडी बिघडत म्हणून नाही.शंभरपैकी ९० मार्क तर हक्काचेच.
(Image : Google)
म्हणून लक्षात ठेवा या दोन टिप्स. एवढ्या दोन टिप्स लक्षात ठेवल्या तर साबुदाणा खिचडी गचकाही होणार नाही आणि कडकही.१. भिजत घालण्यापूर्वी साबुदाणा मंद आचेवर, थोडावेळ भाजून घ्या. अगदी थोडा ५ ते आठ मिनिटं. गार होवू द्या. १५ मिनिटांनी मग धुवून भिजत ठेवा. गरम असताना पाणी ओतायचं नाही, नाहीतर खिचडी गचका होणार. भाजून गार करुन साबुदाणा भिजवला तर खिचडी शंभर टक्के मोकळी पण मऊच होणार. पाणी साधारण साबुदाण्याच्या डोक्यावर आपल्या बोटाच्या एक पेर आकाराइतकं तरी हवं. शक्यतो किमान ४-५ तास तरी साबुदाणा भिजवाच. ही खिचडी खायचं काम असलं तरी घाईचं काम मात्र नाही.२. साबुदाणा दाटीवाटीत भिजत घालायचा नाही, म्हणजे भांडं लहान घ्यायचं नाही. पसरट भांडं घ्यायचं. साबुदाण्याचा फुलायला जागा ठेवायची. म्हणजे तो छान भिजतोही आणि फुलतोही.