पोळ्या ही आपल्या जेवणातली एक अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. रोज किमान दुपारच्या जेवणासाठी आणि घाईच्या वेळी नाश्त्यालाही आपण गरमागरम पोळीच खातो. कधी चहा पोळी कधी पोळीचा रोल हे अगदी ठरलेले असते. पोळी पौष्टीक तर असतेच पण ती पोटभरीचीही असल्याने पोळी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातात. पण या पोळ्या कधी वातड होतात तर कधी कोरड्या. पोळी मऊ लुसलुशीत होण्यासाठी कणीक मळण्याची, पोळी भाजण्याची कला योग्य पद्धतीने जमायला हवी. नाहीतर पोळ्यांची वाट लागते आणि मग जेवण अजिबात जात नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आधीच पाणी पिऊन पोट भरते. त्यात पोळ्या नीट नसतील तर जेवणच नको वाटते. पाहूया घडीच्या पोळ्या मऊ-लुसलुशीत होण्यासाठी त्या करताना कोणती काळजी घ्यायची (How To Make Perfect Soft Roties)...
१. पोळ्यांची कणीक मळताना आणि मळून झाल्यावर त्यामध्ये १ चमचा तेल आवर्जून घालायला हवे. त्यामुळे कणीक चांगली मळली जाते आणि पोळ्या मऊ होण्यास मदत होते.
२. परातीत किंवा वाडग्यात कणीक मळल्यानंतर आपण त्यावर एकतर पोळपाट पालथे घालतो किंवा सरळ एक ताटली ठेवतो. पण असे करण्यापेक्षा एखादा सुती कपडा थोडासा ओलसर करुन तो त्यावर घातल्यास कणीक छान मुरली जाते आणि पोळ्या लुसलुशीत होतात.
३. तसेच आपण घडीची पोळी करताना आधी पुरीइतकी पोळी लाटून घेतो आणि मग त्याच्या २ वेळा घड्या घालून त्रिकोण तयार करतो आणि मग पूर्ण पोळी लाटतो. पण असे करण्यापेक्षा एकसलग दंडगोलाकार पोळी लाटली आणि मग मध्यभागी चिमटीने ती गोळा करु मग त्या २ गोलांची एकमेकांवर घडी घातली तर पोळीला जास्त चांगले पदर सुटतात.
४. तसेच पोळी दुमडल्यानंतरही सगळ्या बाजूने एकसारखी लाटली गेल्यास ती छान टम्म फुगण्यास मदत होते. अशी पोळी फुगल्यावर दिसतेही छान, मनालाही समाधान देते आणि खायला तर मस्त लागतेच.