Join us  

कणिक मळण्यात फार वेळ जातो? १ झटपट सोपी ट्रिक, २ मिनिटांत कणिक भिजवून होईल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2023 1:58 PM

How To Make Dough For Roti/Chapati : एक सोपी पद्धत लक्षात ठेवून कणिक मळली तर कणिक मळायला वेळही कमी लागतो, तसेच कणिकही मऊसूत मळून होते.

सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वात कठीण काम बऱ्याच जणांना जर कोणतं वाटत असेल तर ते म्हणजे कणिक मळणे. कणिक मळण्यासाठी सकाळचा बराच वेळ घालवावा लागतो. काही महिला या वर्किंग वुमन असल्यामुळे सकाळी कामाच्या गडबडीच्या वेळी कणिक व्यवस्थित मळली जात नाही. परिणामी चपात्या कडक होणे वातड होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. मऊ, लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी आपण कणिक कोणत्या पद्धतीने मळतो हे देखील तितकेच महत्वाचे असते. काहीजणींच्या पोळ्या चिवट होतात तर कधी कधी तव्यालाच चिकटतात. कितीही वर्ष कणीक भिजवली तरीही नक्की त्याचं प्रमाण किती आणि कसं हे बऱ्याच जणींच्या लक्षात येत नाही.

चपात्या हा तर आपल्या दैनंदिन आहाराचा अविभाज्य भाग आहे. मऊ, लुसलुशीत टम्म फुगलेली चपाती कशी बनवावी यासाठी काही खास गोष्टी करणे आवश्यक आहे. सर्वात पहिल्यांदा आवश्यक आहे ते म्हणजे चपातीसाठी कणीक भिजवणे. ही कणीक जर नीट भिजली नाही तर चपाती नीट बनवता येत नाही. काहीवेळा कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला हवी तशी मनासारखी कणिक मळून होत नाही. असं पहायला गेलं तर कणिक मळणे हे काही फारसे अवघड काम नाही. परंतु त्याची एक विशिष्ट्य पद्धत आहे. ही पद्धत लक्षात ठेवून जर आपण कणिक मळली तर कणिक मळायला वेळही कमी लागतो. तसेच कणिकही मऊसूत मळून होते. यामुळे चपात्या दिवसभर आहे तशाच नरम रहातात. झटपट कणिक मळण्याची ही नेमकी कोणती ट्रिक आहे ते समजून घेऊयात(How To Make Perfect Soft Wheat Dough Tips & Tricks For Making Soft Dough).

कणिक नेमके कसे भिजवावे? 

१. कणिक भिजवण्यासाठी सर्वप्रथम पसरट परात किंवा डिशचा वापर न करता खोलगट मोठ्या भांड्यांचा वापर करावा. पसरट डिशपेक्षा खोलगट भांड्यांमध्ये कणिक लगेच भिजवून होते. त्यामुळे कणिक भिजवताना नेहमी खोलगट भांडे वापरावे. 

२. खोलगट भांड्यात अंदाजे ३ कप कणिक घेतल्यास त्यात एक कप पाणी घालावे. कोरड कणिक खोलगट भांड्यात घेऊन त्यात योग्य त्या प्रमाणात पाणी घालून कणिक न मळता फक्त ओली करुन घ्यावी. ओली केलेली कणिक चमच्याने ढवळून घ्यावी. 

रोज पोळ्या करताना पहिली पोळी वाफेनं सादळते, ओली राहते? १ सोपा उपाय, झटपट सुटेल प्रश्न...

३. कणिक न मळता केवळ पाणी घालून ओलसर करुन भिजवून घ्यावी. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून कणिक २० मिनिटांकरता झाकून ठेवावी.

४. २० मिनिटानंतर गरज असेल तर किंचित पाणी घालावे तसेच तेल घालून कणिक केवळ मिनिटभरासाठी मळून घ्यावी. 

५. आपण कणिक २० मिनिटांकरिता भिजवून ठेवली असताना, कणिक पाणी शोषून घेऊन आपोआप मऊ होते. अशी पाणी शोषून घेतलेली कणिक मळण्यासाठी सोपे जाते. त्यामुळे भिजत ठेवलेली कणिक लगेच २ ते ३ मिनिटांत मळून होते. तसेच पाणी शोषून घेतल्याने कणिक मऊ राहते व यामुळे पोळ्या मऊसूत होतात.   

चपात्यांसाठी कणिक मळताना इतर काही टिप्स देखील लक्षात ठेवा :- 

१. कणीक मळताना पीठ घ्याल त्याच्या मध्ये खड्डा करून पाणी घाला. एक वाटी पीठ असेल तर अर्ध्यापेक्षा अगदी थोडं कमी वाटीत पाणी घ्या आणि पीठ भिजवा. या पिठाच्या पोळ्या अगदी मऊ आणि फुगणाऱ्या होतील. 

२. पीठ कोणत्याही गिरणीतील असो वा रेडीमेड असो कणीक भिजवत असताना पीठ आधी चाळून घ्या. कारण कितीही ब्रँडेड असलं तरीही त्यामध्ये काही प्रमाणात चर असते.

३. तुम्ही कणीक भिजवल्यानंतर किमान १० ते २० मिनिटे तरी त्यावर कपडा किंवा झाकण ठेवून कणिक तिंबत ठेवा. कणीक थोडा वेळ तिंबत ठेवल्यास, तुमच्या पोळ्या अधिक मऊ होतात. त्यामुळे आधी पोळ्यांची कणीक भिजवा आणि मग भाजी करायला घ्या. तोपर्यंत कणीक व्यवस्थित भिजेल आणि मगच पोळ्या करायला घ्या. यामुळे तुमचा स्वयंपाकघरातील वेळही वाचेल आणि कणीकही व्यवस्थित भिजून पोळ्या मऊ आणि मुलायम होतील.     

४. चपाती करायला घेताना पीठ पुन्हा एकदा नीट मळून घ्यावे. 

५. पोळी अगदीच मऊ हवी असेल तर तुम्ही कणीक भिजवताना त्यात थोडं तूप किंवा तेल घाला. यामुळे चपात्या मऊ होण्यास मदत होते.

टॅग्स :अन्नपाककृती