आपल्याकडे नाश्त्याला बरेचदा इडली, डोसा, मेदू वडा, उत्तपा असे साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. कधी आपण हे पदार्थ कुठल्या उडप्याकडून आणतो तर कधी घरीच बनवून खातो. इडली दिसायला पांढऱ्या शुभ्र रंगाची खाण्यासाठी मऊ आणि पचण्यासाठी हलकी असते. उडीद डाळ, तांदूळ भिजवून, बारीक वाटून, आंबवून इडली बनविली जाते. इडली नारळाची चटणी किंवा सांबर यांसोबत सर्व्ह केली जाते. आरोग्यासाठी इडली (Soft & fluffy Poha Coconut Idli) उत्तम आहार आहे. इडली (Instant Poha Coconut Idli) हा एक असा एक पदार्थ आहे जो तुम्ही सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण अथवा संध्याकाळी आणि रात्रीदेखील खाऊ शकता. त्यामुळे आजकाल घरोघरी या साऊथ इंडियन पदार्थांची लोकप्रियता वाढतच जात आहे(How To Make Poha Coconut Idli At Home).
इडली, डोशाचे पीठ तयार करताना आपण डाळ व तांदूळ वापरुन इडली करतो. परंतु नेहमीची तीच ती डाळ व तांदूळ किंवा इडली रवा वापरुन केलेली इडली खाण्यापेक्षा याच नेहेमीच्या इडलीला थोडा ट्विस्ट देत आपण पोहे आणि ओलं - खोबऱ्याची झटपट तयार होणारी इडली घरच्या घरीच तयार करु शकतो. पोहे आणि ओलं - खोबरं वापरुन इडली तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. इडली करण्यासाठीचे तांदूळ - १ कप
२. पांढरी उडीद डाळ - १ कप
३. पोहे - १ कप
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. दही - १ कप
६. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
७. आलं - १ टेबलस्पून (बारीक तिकडे केलेल)
८. ओलं खोबरं - १/२ कप
९. कोथिंबीर - १/२ कप
१०. तेल - १ टेबलस्पून
११. जिरे - १/२ टेबलस्पून
१२. मोहरी - १/२ टेबलस्पून
१३. कडीपत्ता - ८ ते १० पान
१४. पाणी - गरजेनुसार
कोकणी पद्धतीने १० मिनिटांत करा मऊ - लुसलुशीत आंबोळी, सकाळचा नाश्ता होईल झक्कास...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये इडली करण्यासाठीचे तांदूळ, पांढरी उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे एकत्रित घेऊन ते ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२. आता या बाऊलमध्ये गरजेनुसार पाणी ओतून ४ ते ५ तासांसाठी भिजत ठेवा.
३. डाळ - तांदूळ व्यवस्थित भिजवून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे डाळ - तांदूळ ओतून दह्यासोबत एकत्रित वाटून घ्यावे.
४. आता हे तयार बॅटर एका बाऊलमध्ये काढून रात्रभरासाठी फर्मेंटेशन होण्यासाठी ठेवून द्यावे.
५. इडल्या तयार करताना या तयार बॅटरमध्ये किसलेलं ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
६. यासोबतच, एका छोट्या पॅनमध्ये थोडं तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता घालूंन फोडणी तयार करून घ्यावी. ही फोडणी बॅटरमध्ये घालावी. आता सगळे बॅटर एकत्रित मिसळून इडली पात्रात हे बॅटर घालून इडल्या वाफवून घ्याव्यात.
या गरमागरम पोहे - खोबऱ्याच्या तयार इडल्या चटणी सांबारसोबत खाण्यासाठी सर्व्ह कराव्यात.