नाश्त्याला काहीतरी वेगळं खावसं वाटलं की लगेच बाहेरचं अन्नपदार्थ खाल्ले जातात. खासकरून साऊथ इंडियन पदार्थ नाश्त्याला खाण्यासाठी लोक प्राधान्य देतात. इडली, डोसा घरी बनवायचं म्हटलं की ते आंबवणं, दळणं यात बराचवेळ जातो. (Cooking Hacks & Tips) त्यामुळे पटकन खायला बनवण्यासाठी वेगळे पर्याय पाहावे लागतात. अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तुम्ही पोहे इडली बनवू शकता. वाटीभर पोह्यांमध्ये पोटभर नाश्ता तयार होईल. हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला तांदूळ भिजवण्याची किंवा दळण्याची आवश्यकता नाही. (How to make poha idli)
1) पोहा इडली बनवण्यासाठी सगळ्यात आधी २ वाटी पोहे भिजवून घ्या. पोहे व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्या. पोहे कुस्करून त्याचा गोळा बनवा आणि मिक्सरच्या भांड्यात घाला. मग त्यात १ कप रवा, १ कप दही घाला.
2) मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर हे मिश्रण एका ताटात काढून घ्या. मग एका फोडणी पात्रात तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मिरची, जीरं, चण्याची डाळ, मेथीचे दाणे, गारजाचा किस घाला आणि फोडणी तडतडल्यानंतर पोहे आणि रव्याच्या मिश्रणात घाला. त्यावर मीठ घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या.
3) त्यात इनो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण पुन्हा एकजीव करा. इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण घाला. १५ ते २० मिनिटं वाफवून घेतल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे गरमागरम पोह्याच्या इडल्या. या इडल्या तुम्ही नारळाची चटणी किंवा सांबारबरोबर खाऊ शकता.
इस्टंट रवा इडली कशी बनवायची
१) सगळ्यात आधी एका भांड्यात रवा घेऊन त्यात दही आणि अर्धा चमचा मीठ मिसळा. आवडीनुसार तुम्ही यात बीट किंवा गाजरही घालू शकता. त्यात पाणी घालून जाडसर पेस्ट बनवा.
२) रवा आणि दह्याचं मिश्रण तयार झाल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
३) तोपर्यंत इडलीच्या स्टॅण्डला तेल लावा. १५ मिनिटांनी रव्याच्या मिश्रणात इनो घालून एकजीव करा.
४) तयार बॅटर इडलीच्या साच्यात घाला. कुकरमधलं पाणी उकळल्यानंतर साचा त्यात घाला.
५) १० ते १५ मिनिटं शिजवल्यानंतर गॅस बंद करा आणि इडल्या एका भांड्यात काढून घ्या.