उन्हाळा सुरु झाला की हिरव्यागार कैरी आणि पिवळ्या धम्मक आंब्यांचे सगळ्यांना वेध लागतात. हिरवीगार आंबट - गोड चवीची कैरी म्हटलं की आपल्या तोंडाला लगेच पाणी सुटत. आपल्याकडे मे महिना हा साधारणतः पिकलेल्या आंब्याचा आणि एप्रिल महिना हा कच्ची कैरी खाण्याचा सिजन समजला जातो. कैरी बाजारांत दिसताच आपण ती विकत आणतो. या कैरी पासून आपण कैरीचं पन्हं, कैरीचं लोणचं, कैरीचा मुरांबा असे अनेक पदार्थ तर बनवतो आणि अगदीच काही नाही तर कैरीच्या फोडीला मीठ, मसाला लावून खातो.
आपल्या बालपणी प्रत्येकाने कँडी खाल्लीच असेल. सामान विकत घेतल्यानंतर दुकानदाराकडे सुट्टे पैसे नसल्यावर तो आपल्या हातावर एखादी कँडी ठेवतो. ही कँडी आपण आवडीने खातो. देशात अधिकांश लोक आंब्याच्या व कैरीच्या फ्लेवरची कँडी खाणे पसंत करतात. आपल्यापैकी बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये उन्हाळ्यात वाळवण करताना त्यात पापड, मसाले, कुरडया, फेण्या तयार केल्या जातात. या वाळवणासोबतच काही घरांमध्ये कच्च्या कैरीची कँडी देखील बनविली जाते. ही कँडी खाल्यानंतर बाहेरून कच्च्या कैरीची चव लागेल आणि या कँडीच्या आतल्या भागात काही स्पेशल मसाल्यांचा स्वाद येतो. अशी ही आगळेवेगळे कॉम्बिनेशन असणारी कँडी घरच्या घरी कशी बनवायची त्याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Raw Mango Candy At Home).
साहित्य :-
१. कच्च्या कैऱ्या - २ (कैऱ्यांची साल सोलून त्यांच्या लहान फोडी करुन घ्याव्यात)२. तूप - १ ते २ टेबलस्पून ३. हिंग - चिमूटभर ४. किसून घेतलेला गूळ - ३ ते ४ टेबलस्पून ५. काळं मीठ - १ टेबलस्पून ६. जिरे पावडर - १ टेबलस्पून ७. गरम मसाला - १ टेबलस्पून ८. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ९. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून १०. पिठी साखर - ३ ते ४ टेबलस्पून
घरात कैरी असो नसो २ मिनिटांत बनवा थंडगार पन्हं ! पाहा ही जादू कशी करायची...
कृती :-
१. सर्वप्रथम कच्च्या कैऱ्यांची साल सोलून त्यांच्या लहान फोडी करुन घ्याव्यात. २. या लहान फोडी मिक्सरला व्यवस्थित पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्याव्यात. ३. आता एका पॅनमध्ये, तूप घेऊन त्यात चिमूटभर हिंग घालूंन घ्यावे त्यानंतर त्यात कच्च्या कैऱ्यांची मिक्सरला वाटून घेतलेली पेस्ट घालावी. हे मिश्रण मंद आचेवर शिजवून घ्यावे. ४. मिश्रण थोडे शिजत आल्यावर त्यात किसून बारीक केलेला गूळ घालावा. आता या मिश्रणाचा रंग डार्क ब्राऊन होईपर्यंत मंद आचेवर शिजवून घ्यावे.
५. मिश्रण शिजत आल्यावर त्यात काळं मीठ, जिरे पावडर, गरम मसाला, काळीमिरी पूड, आमचूर पावडर घालून सगळे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. ६. आता हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात काढून थोडे गार होऊ द्यावे. ७. मिश्रण थोडे थंड झाल्यानंतर या मिश्रणाचे आपल्या आवडीनुसार किंवा लहान, मध्यम आकाराचे गोळे करुन घ्यावेत. ८. ही तयार झालेली कच्च्या कैरीच्या कँडी पिठी साखरेत घोळवून घ्यावी.
आता या कच्च्या कैरीच्या कँडी एका काचेच्या बाटलीत स्टोअर करुन ठेवाव्यात.