Join us  

कच्च्या कैरीची आईस कँडी आता सहज करा घरच्याघरी, शेफ तारला दलाल रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2023 1:19 PM

Raw Mango Popsicles At Home : एकदा कच्च्या कैरीची आइसकँडी बनवून तर पाहा, घरातील प्रत्येकजण नक्कीच खाईल आवडीने...

उन्हाळा म्हटलं की कैरी आणि आंबा प्रेमींसाठी ती एक पर्वणीच असते. उन्हाळ्यात आपण शरीराला थंडावा मिळवून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकराची सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, शीतपेय पिणे पसंत करतो. उन्हाळा आला की सगळे लोक थंडावा मिळावा म्हणून काय खायला पाहिजे याचा विचार करतात. भारतीय उन्हाळ्यात, पारा सामान्यतः अशा बिंदूपर्यंत वाढतो जिथे लोकांना ते जवळजवळ असह्य होते,यामुळे आपल्याला वारंवार थकवा जाणवतो. तीव्र उष्णतेमुळे  एखाद्याला डिहायड्रेटेड आणि उर्जेची कमतरता जाणवते. उन्हाळ्यात उष्णतेमुळे येणारा थकवा घालवण्यासाठीच आपण वेगवेगळ्या थंडगार पदार्थांचे वारंवार सेवन करत असतो. 

उन्हाळा आणि कैरीचे एक अजबच नाते आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सगळ्यांनाच आंबट - गोड कैरी खाण्याचे वेध लागतात. आपल्या भारतीय घरात उन्हाळ्यांत हमखास बाजारांतून कैरी विकत आणली जाते. मग या कैरीचे - लोणचे, चटणी, चुंदा, साठवणीची मसाला कैरी, कैरी कँडी असे अनेक पदार्थ बनवून ते घराघरांत आवडीने मिटक्या मारत खाल्ले जातात. सुप्रसिद्ध शेफ तारला दलाल (Tarla Dalal) यांनी देखील कच्च्या कैरीची आइसकँडी हा उन्हाळ्यांत शरीराला थंडावा देणारा एक अनोखा प्रकार कसा झटपट बनवायचा ते शेअर केले आहे(How To Make Raw Mango Popsicles At Home).   

साहित्य :- 

१. कच्च्या कैऱ्या - २ (साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करुन घ्याव्यात). २. साखर - ३/४ कप ३. पाणी - १/२ कप ४. पुदिन्याची पाने - १/२ कप ५. काळीमिरी पूड - १/४ टेबलस्पून ६. जिरे पावडर - १/२ टेबलस्पून ७. काळं मीठ - १/२ टेबलस्पून ८. साधं मीठ - १/२ टेबलस्पून ९. पाणी - १ + १/२ कप १०. लाल तिखट मसाला - चिमूटभर ११. चाट मसाला - आवडीनुसार (पर्यायी) 

कृती :- 

१. सर्वप्रथम एका पॅनमध्ये साल काढून मध्यम आकाराच्या फोडी करुन घेतलेल्या कच्च्या कैऱ्या घालाव्यात. २.  त्यानंतर त्यात साखर व १/२ कप पाणी घालावे. साखर विरघळून त्याचा पाक (पाक एकदम घट्टसर किंवा कडक नको) तयार होईपर्यंत हे मिश्रण १० मिनिटे मंद आचेवर ठेवून चमच्याने ढवळत रहावे.   ३. आता हे मिश्रण थोडे गार होऊ द्यावे, त्यानंतर एका मिक्सरमध्ये हे तयार मिश्रण ओतावे. 

घरात कैरी असो नसो २ मिनिटांत बनवा थंडगार पन्हं ! पाहा ही जादू कशी करायची...

कच्च्या कैरीची घरीच पटकन बनवा आंबटगोड कॅण्डी, तोंडाला पाणीच सुटेल असा मस्त पदार्थ...

४. साखरेच्या पाकातील कैरी मिक्सरमध्ये घेऊन आता त्यात पुदिन्याची पाने, काळीमिरी पूड, जिरे पावडर, काळं मीठ, चवीनुसार साधं मीठ व १ + १/२ कप पाणी घालून घ्यावे. आता हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये पातळ पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावे. ५. मिक्सरमध्ये तयार झालेले हे कच्च्या कैरीच्या आइसकँडीचे मिश्रण आईस्क्रीमच्या साच्यात भरुन घ्यावे, आता त्यात एक आईस्क्रीम स्टिक घालावी. ६. त्यानंतर या कच्च्या कैरीच्या आइसकँडी फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ७ ते ८ तास ठेवाव्यात. ७. कच्च्या कैरीची आइसकँडी सर्व्ह करताना त्यावर थोडा लाल तिखट मसाला, काळं मीठ व चाट मसाला भुरभुरवून खाण्यासाठी सर्व्ह करावी. 

चटपटीत आंबट, गोड, तिखट कच्च्या कैरीची आइसकँडी खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती