Join us  

कच्च्या कैरीचं झटपट होणारं रायतं, आंबट गोड रायत्याने जेवण जाईल २ घास जास्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2023 1:38 PM

How To Make Raw Mango Rita At Home : Recipe : घरच्या घरी कच्च्या कैरीचं झटपट रायतं कसे करायचे याची सोपी कृती व साहित्य लक्षात घेऊ.

धगधगत्या उन्हांत मनाला सुख: व आनंद देणारे फळ म्हणजे कैरी. उन्हाळ्याचा ऋतू म्हटलं की, या मोसमात कैरीच्या अनेक पाककृती घरोघरी बनवल्या जातात. उन्हाळा सुरु झाला की, कैरी आणि आंब्याच्या सिझनला सुरुवात होते. या दिवसांत बाजारात सगळीकडेच हिरव्या चटकदार, रसरशीत कैऱ्या विकायला ठेवलेल्या असतात. मे महिना हा साधारणतः पिकलेल्या आंब्याचा आणि एप्रिल महिना हा कच्ची कैरी खाण्याचा महिना समजला जातो. बाजारांतून कच्च्या कैऱ्या विकत आणून आपण त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून त्याचा आस्वाद घेतो. 

कैरीचे लोणचे, कैरीचा मोरावळा, कैरीची चटणी, कैरीचा चुंदा, साठवणीची आंबट - गोड कैरी असे कैरीचे असंख्य पदार्थ आपण घरीच बनवतो. या कैरीचे  बनवलेले पदार्थ आपण केवळ उन्हाळ्यातच खात नाही तर वर्षभरासाठी हे पदार्थ साठवून त्याचा आस्वाद लुटतो. काहीवेळा उन्हाळ्यात उष्णतेमुळे फारसे काही खायची इच्छा होत नाही. मग रोज तेच ते जेवण कंटाळवाणे वाटते. तसेच उन्हाळ्यात भाज्या फारशा चांगल्या येत नाहीत तसेच उन्हाळ्यात भाज्या फारच महाग मिळतात. अशावेळी आपण कच्च्या कैरीचं झटपट होणार रायतं घरच्या घरी बनवून पोळी सोबत खाऊ शकतो. घरच्या घरी कच्च्या कैरीचं झटपट रायतं कसं बनवायचं याची सोपी कृती व साहित्य लक्षात घेऊ(How To Make Raw Mango Rita At Home : Recipe).

साहित्य :- 

१. कच्च्या कैरी - ३ ते ४२. तेल - २ ते ३ टेबलस्पून ३. मोहरी - १ टेबलस्पून ४. हिंग - चिमूटभर ५. हळद - १/२ टेबलस्पून ६. लाल तिखट मसाला -  १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. गूळ - १ कप (बारीक किसलेला) ९. पाणी - ३ ते ४ कप 

कैरी-कोथिंबीर-आणि पुदिन्याची चटकदार आंबट-गोड चटणी खाऊन तर पाहा, सोपी रेसिपी-तोंडाला सुटेल पाणी...

कृती :- 

१. सर्वप्रथम, कच्च्या कैऱ्या स्वच्छ धुवून मग कुकरमध्ये पाणी आणि मीठ घालून त्यात या कैऱ्या घालून कुकरच्या २ ते ३ शिट्ट्या काढून कैऱ्या उकडवून घ्याव्यात. २. उकडवून घेतलेल्या कैरीच्या साली काढून आतील गर चमच्याने एका बाऊलमध्ये काढून घ्यावा. ३. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात मोहरी, हिंग, हळद, लाल तिखट मसाला घालून फोडणी द्यावी. 

४. त्यानंतर या फोडणीत कच्च्या कैरीचा उकडवून घेतलेला गर घालावा. ५. मंद आचेवर हे मिश्रण शिजत ठेवावे. ६. मिश्रण १० ते १५ मिनिटे शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व एक कप किसलेला गूळ घालावा. ७. आता या मिश्रणात गूळ संपूर्णपणे विरघळेपर्यंत चमच्याने ढवळत राहावे. 

कच्च्या कैरीची आईस कँडी आता सहज करा घरच्याघरी, शेफ तारला दलाल रेसिपी...

कच्च्या कैरीचे रायते खाण्यासाठी तयार आहे. हे रायते खाण्यासाठी सर्व्ह करताना त्यावर थोडासा लाल तिखट मसाला भुरभुरवून घ्यावा.

टॅग्स :अन्नपाककृती