घरातील छोटेखानी फंक्शन, लग्न समारंभ, पार्टी यांसारख्या खास क्षणांसाठी मेन्युलिस्टमध्ये 'बिर्याणी' हे नाव असतंच. गरमागरम बिर्याणी सोबत पापड, रायतं हे तोंडी लावणारे पदार्थ बिर्याणीची चव आणखीनच वाढवतात. बिर्याणीमधील भात व बिर्याणी ग्रेव्ही या प्रमुख दोन गोष्टींमुळे बिर्याणीला चव येते. बिर्याणीची ग्रेव्ही जितकी मसालेदार असेल तितकी बिर्याणी खायला मजा येते. प्रामुख्याने, टोपात बिर्याणी रचताना, बिर्याणी ग्रेव्हीचा थर, भाताचा थर, त्यातील भाज्यांचा थर असे करुन बिर्याणीचे थर रचले जातात. असे केल्याने बिर्याणी जेव्हा या मसालेदार ग्रेव्हीमध्ये मुरते तेव्हा तिची चव अतिशय सुंदर लागते.
बिर्याणी घरी बनवावी आणि मनसोक्त खावी असे अनेकांना वाटते. पण खूप वेळा रेडिमेड परफेक्ट बिर्याणी सारखी चव घरच्या बनवलेल्या बिर्याणीला येत नाही. तसेच बिर्याणी करायची म्हटली की त्याचा खूप मोठा घाट घालावा लागतो, एवढे परिश्रम करुन ती आपल्या मनासारखी झाली तर उत्तम नाहीतर हिरमोड होतो. बिर्याणीची ग्रेव्ही उत्तम बनली तर बिर्याणी देखील अतिशय चविष्टय लागते. बिर्याणी बनविण्यासाठी, इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्स तयार असेल तर अगदी झटपट बिर्याणी बनून तयार होते. इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्स तयार करून आपण स्टोअर करुन ठेवू शकता. तसेच बिर्याणी बनवताना याचा वापर करून झटपट बिर्याणी तयार करु शकता(How To Make Restaurant Style Biryani Gravy At Home : Recipe).
साहित्य :-
१. तेल - अर्धा कप
२. कांदा - ५०० ग्रॅम (उभा चिरुन घेतलेला)
३. तमालपत्र - ५ ते ६ पाने
४. काळीमिरी - १ टेबलस्पून
५. वेलची - ६ ते ७
६. दालचिनी - ४ ते ५ काड्या
७. दगडफूल - १ ते २
८. जिरे - १ टेबलस्पून
९. लवंग - १ टेबलस्पून
१०. मोठी काळी वेलची - २
११. आलं - लसूण पेस्ट - २ टेबलस्पून
१२. हिरव्या मिरच्या - २ (उभ्या, लांब कापून घेतलेल्या)
१३. हळद - १ टेबलस्पून
१४. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
१५. बिर्याणी मसाला - २ टेबलस्पून
१६. टोमॅटो प्युरी - १/२ कप
१७. दही - १/२ कप
१८. पुदिना - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेला)
१९. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरुन घेतलेली)
२०. मीठ - चवीनुसार
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात कांदा गोल्डन ब्राऊन रंगांचा होईपर्यंत मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावा.
२. त्याच भांड्यात कांदा बाजूला ठेवून तमालपत्र, काळीमिरी, वेलची, दालचिनी, दगडफूल, जिरे, लवंग, मोठी काळी वेलची असे सगळे खडा मसाले भाजून घ्यावेत.
२. खडे मसाले भाजून झाल्यावर त्यात आलं - लसूण पेस्ट व उभ्या चिरुन घेतलेल्या २ हिरव्या मिरच्या घालाव्यात.
३. त्यानंतर यात मीठ, हळद, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला व टोमॉटोची प्युरी घालावी.
४. थोडा वेळ हा तयार झालेला मसाला शिजवून घ्यावा. मसाला शिजून त्याला तेल सुटल्यानंतर, गॅस मंद आचेवर ठेवून त्यात दही घालावे.
५. या मसाल्यात दही घातल्यानंतर, दही मसाल्यात एकजीव होईपर्यंत चमच्याने हळुहळु ढवळत रहावे.
६. मसाल्याला अधिकचे तेल सुटल्यानंतर त्यात बारीक चिरलेला पुदिना व कोथिंबीर घालावी. आता बिर्याणीचा मसाला चमच्याने व्यवस्थित ढवळून एकजीव करुन घ्यावा.
झटपट बिर्याणी बनविण्यासाठी, इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्स तयार आहे. हे इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्स एका काचेच्या हवाबंद डब्यांत भरुन रेफ्रिजरेट करुन ठेवावे. इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्स किमान १ महिनाभर रेफ्रिजरेट करुन ठेवल्यास चांगले टिकते. झटपट बिर्याणी तयार करायची असल्यास आपण या इन्स्टंट बिर्याणी ग्रेव्ही मिक्सचा वापर करु शकता.