How to make Rumali Roti at home: रोज भाजी पोळी खाऊन इतका कंटाळा आलेला असतो की काहीतरी वेगळं खावंसं , बाहेरुन ऑर्डर करावंसं वाटतं. ताटातल्या नेहमीच्या पदार्थांमुळे आलेला तोच तोचपणा घालवण्यासाठी एखादा वेगळा पदार्थही पुरेसा असतो. अशा वेळेस पोळी भाकरी ऐवजी वेगळा प्रकार करुन पाहावा. भाज्यांचे वेगळे प्रकार करुन जेवणात नाविन्य आणता येतं आता पोळी भाकरीत बदल करायचा म्हटला तर पुऱ्यांहून वेगळं काही सूचत नाही. पण त्यामुळे पोळी भाकरीतला तोचतोचपणा कमी होईल असं नाही. त्यासाठी हाॅटेल- ढाब्याच्याच तोडीचं काही हवं असतं. यासाठी रुमाली रोटी करणं हा उत्तम उपाय आहे. हाॅटेल ढाब्यावर मिळते तशी रुमालाच्या पातळ पोताची रुमाली रोटी कढईचा वापर करुन करणं सहज शक्य आहे. घरात उपलब्ध सामग्रीतून उत्तम रुमाली रोटी करता येते.
Image: Google
रुमाली रोटी करणं म्हणजे अवघड प्रकार. हातावर पातळ पोळी करुन, हातावर फिरवत तिला ताणून रुमाली रोटी करतात, हे आपल्याला माहित असतं. पाहिला छान वाटणारा प्रकार ज्याच्याकडे हे कौशल्य आहे, त्यालाच तो जमेल याची आपल्याला खात्री असते. त्यामुळे रुमाली रोटी घरी तयार करण्याच्या कोणी भानगडीत पडत नाही. पण हातावर न करता लाटून रुमाली रोटी करणं सहज शक्य आहे. घरच्याघरी रुमाली रोटी करताना ती हातावर करु नये. यामुळे पोळीचा पोत बिघडतो. पोळपाटावर लाटून रुमाली रोटी केल्यास ती सर्व बाजूंनी पातळ लाटता येते. रुमाली रोटी एवढी पातळ असावी की आपला तळहात आरपार पोळीतून दिसायला हवा. हातावर पोळी तीन चार वेळा उलटपुलट करुन हातावर् ठेवून ती थोडी ताणून कढई उलटी करुन तिच्यावर भाजून घेतल्या की हाॅटेलसारखी रुमाली रोटी तयार होते.
Image: Google
रुमाली रोटी हा लगेच करुन गरम खाण्याचा प्रकार आहे. केल्यानंतर पुष्कळ वेळानं ती खाल्ली तर कडक किंवा वातड लागते. तसेच रुमाली रोटी भाजताना ती एका बाजूने जास्त भाजू नये. खूप शेकल्यास ही पोळी कडक होते. पोळी कढईवर टाकल्यावर तिला सर्व बाजूंनी फोड आले की पोळी कढईवर उलटावी. दुसऱ्या बाजूने पोळी शेकली की तिच्या पहिली बाजू पुन्हा कड्हईवर टाकून रुमालासारखी पोळीची घडी करुन मसालेदार भाजीसोबत खाल्ल्यास आपण घरी नाही हाॅटेल ढाब्यावरच बसलो आहोत याचा भास होतो.
Image: Google
घरच्याघरी रुमाली रोटी
घरच्याघरी रुमाली रोटी करण्यासाठी 2 कप मैदा. पाव कप गव्हाचं पीठ, 1 छोटा चमचा मीठ, 2 मोठे चमचे तेल, 3 कप दूध घ्यावं.
Image: Google
सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात मैदा, कणीक आणि मीठ एकत्र करुन घ्यावं. मग दूध घालून पीठ मळून घ्यावं. आवश्यकतेनुसार दूध कमी जास्त करावं. रुमाली रोटीसाठीचं पीठ एरवीपेक्षा जास्त मऊ मळावं लागतं. ते गुळगुळीत होण्यासाठी पीठ मळलं की त्यात दोन मोठे चमचे तेल घालून कणीक पुन्हा चांगली मळावी. सर्वात शेवटी कणकेला वरुन तेल लावून कणीक किमान 4 तास मुरु द्यावी.
Image: Google
रुमाली रोटी करताना पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावं. त्याच्या लाट्या करुन त्या कोरड्या मैद्याचा वापर करत पातळ लाटाव्यात. कढई आधी सुलट ठेवून चांगली तापवावी. कढई तापली की ती उलटी ठेवावी. कढईवर आधी मीठाचं पाणी शिंपडावं. यामुळे कढईला पोळी चिटकत नाही. गॅस हायवर असावा.
पोळीला एका बाजूने फोड आलेत की पोळी दुसऱ्या बाजूला उलटून शेकावी. पुन्हा पहिली शेललेली बाजू कढईवर येईल अशी ठेवून पोळीची रुमालासारखी घडी घालावी. ही पोळी गरम असतानाच खावी.