उन्हाळा सुरु झाला. या काळात महिलावर्ग पापड, कुरडई, फ्रायम्स, सांडगे असे पदार्थ बनवतात. हे पदार्थ आपण एकदा बनवतो, आणि महिनाभर खातो. महाराष्ट्रात सांडगे हा पदार्थ प्रचंड फेमस आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हा पदार्थ बनवला जातो. काही ठिकाणी याला वडी म्हणतात तर काही ठिकाणी सांडगे. वाळवून झाल्यानंतर सांडग्याची भाजी किंवा आमटी करता येते.
सांडगे बनवण्यासाठी विविध डाळींचा वापर केला जातो. सांडग्यांची भाजी चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते. घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा काहीतरी हटके खायची इच्छा असेल तर, आपण सांडग्याची भाजी झटपट बनवू शकता. छोट्या - छोट्या सांडग्यांमधून शरीराला डाळींमधील पौष्टीक घटक मिळतात. हा पदार्थ कमी साहित्यात तयार होते. चला तर मग या चमचमीत पारंपारिक पदार्थाची कृती पाहूयात(Traditional Way to make Sandge at Home).
सांडगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
पाव किलो मटकीची डाळ
पाव कप चणा डाळ
पाव कप मुग डाळ
लसूण
जिरं
मीठ
लाल तिखट
हळद
हिंग
कृती
सर्वप्रथम, तिन्ही डाळी स्वच्छ धुवून घ्या. आता त्यात पाणी घालून रात्रभर डाळी भिजत ठेवा. डाळी भिजल्यानंतर त्यातील अतिरिक्त पाणी काढून घ्या. पुन्हा एकदा पाण्याने डाळी स्वच्छ धुवून घ्या, यामुळे डाळीतील आंबूसपणा निघून जाईल. आता एका बाऊलमध्ये तिन्ही डाळी एकत्र मिक्स करा. त्यात ६ - ७ लसणाच्या पाकळ्या, व जिरं घाला. आता संपूर्ण साहित्य एकत्र मिक्स करा.
मिक्सरच्या भांड्यात साहित्य घालून मिश्रणाची भरड तयार करा. डाळी जास्त बारीक करू नये. भरड तयार झाल्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्या. त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आणि हिंग घाला. आता हे संपूर्ण मिश्रण हाताने मिक्स करा.
पदार्थात चुकून तिखट जास्त झालं किंवा मीठ जास्त पडलं तर? ७ टिप्स- पदार्थ फेकू नका- करा झटपट उपाय
मिश्रण मिक्स झाल्यानंतर एक पाठ अथवा प्लास्टिक पेपर घ्या. त्याला तेलाने चांगले ग्रीस करून घ्या. आता त्यावर छोटे - छोटे सांडगे पाडून घ्या. व उन्हामध्ये हे सांडगे वाळवण्यासाठी ठेवा. निदान दोन दिवस तरी सांडगे उन्हामध्ये वाळवत ठेवा. सांडगे पूर्णपणे सुकल्यानंतर हवाबंद डब्यात सांडगे साठवून ठेवा. हे सांडगे साधारण ४ - ५ महिने आरामात टिकतात. याची भाजी व आमटी खूप चविष्ट लागते.