फिरनी हा एक भारतीय पारंपरिक मिठाईचा अतिशय लोकप्रिय प्रकार आहे. भारतामध्ये मुख्यतः फिरनी विशेष प्रसंगी आणि खास सणांना घराघरांत बनवली जाते. सणासुदीला किंवा जेवणानंतरचा गोड पदार्थ म्हणून फिरनी प्रसिद्ध आहे. भारतातील कोणताही सण किंवा खास प्रसंग असो तो गोड पदार्थ खाऊनच साजरा केला जातो. आपल्याकडे गोडाधोडाच्या मिठाईचे असे असंख्य प्रकार आहेत. आपण वेगवेगळ्या फळांचा वापर करुन वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या फिरनी अतिशय सहजरित्या घरी बनवू शकतो.
जर आपल्या घरात गोड पदार्थ आवडणाऱ्यांची संख्या जास्त असेल तर आपल्याला सतत काहीनाकाही गोडधोड घरात बनवून ठेवावे लागते. या उन्हाळ्याच्या दिवसांत वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीराला भरपूर पाणी आणि ऊर्जेची गरज असते. उन्हाळ्यात आपण बऱ्याचदा शरीराला थंडावा देणारे अनेक थंडगार पदार्थ खातो. यंदाच्या उन्हाळ्यात तेच ते आईस्क्रीम, कुल्फी, शीतपेय असे पदार्थ बनवण्यापेक्षा घरच्या घरी पारंपरिक शाही गुलकंद फिरनी नक्की ट्राय करुन पाहा(How To Make Shahi Gulkand Phirni At Home : Homemade Recipe).
साहित्य :-
१. बासमती तांदूळ - १/४ कप (५० ग्रॅम)
२. फुल्ल फॅट दूध - अर्धा लिटर
३. पाणी - अर्धा कप
४. साखर - १/४ कप
५. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
६. गुलकंद - १ टेबलस्पून
७. रोज सिरप - १ टेबलस्पून
८. ड्रायफ्रुटसचे बारीक काप - १ ते २ टेबलस्पून
शहाळ्याचं पाणी आणि मलईचं गारेगार मिल्कशेक पिऊन तर पाहा, उन्हाळा आवडायला लागेल...
कृती :-
१. एका बाऊलमध्ये बासमती तांदूळ घेऊन ३ ते ४ वेळा हे तांदूळ धुवून घ्यावेत. तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ४५ मिनिटे हे तांदूळ पाण्यात भिजत ठेवावे.
२. तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर एका गाळणीतून गाळून सर्व पाणी निथळून जाऊ द्यावे.
३. तांदळातील सर्व पाणी निथळून गेल्यानंतर तांदूळ थोडे सुकवून घ्यावेत. (तांदूळ संपूर्णपणे सुकवून घ्यावा नाहीतर ते मिक्सरमध्ये फिरवून घेताना त्याच्या गुठळ्या तयार होऊ शकतात.)
४. तांदूळ संपूर्णपणे सुकल्यानंतर ते मिक्सरला थोडे जाडसर वाटून घ्यावेत.
५. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात फुल्ल फॅट दूध आणि त्यात थोडेसे पाणी घालून दूध व्यवस्थित गरम करुन घ्यावे.
६. दूध गरम झाल्यानंतर त्यात तांदळाची जाडसर वाटून घेतलेली भरड घालावी. दूध व तांदळाचे हे मिश्रण चमच्याने हलकेच ढवळत राहावे.
कच्च्या कैरीची आईस कँडी आता सहज करा घरच्याघरी, शेफ तारला दलाल रेसिपी...
७. दुध व तांदळाचे हे मिश्रण थोडे घट्ट होत आल्यावर त्यात साखर व वेलचीपूड घालावी.
८. फिरनीच्या या मिश्रणात साखर व वेलचीपूड व्यवस्थित मिसळून घ्यावी.
९. फिरनीचे हे मिश्रण मध्यम कंन्सिस्टंसीचे होईपर्यंत मंद आचेवर हळुहळु ढवळत राहावे. (फिरनीचे हे मिश्रण एकदम घट्ट किंवा एकदम पातळ न करता ते मध्यम कंन्सिस्टंसीचे करावे.)
१०. फिरनी तयार झाल्यावर गॅस बंद करुन त्यात गुलकंद व रोज सिरप घालावे. हे सगळे मिश्रण चमच्याने एकजीव होईपर्यंत ढवळून घ्यावे.
११. आता ही फिरनी छोट्या छोट्या मातीच्या किंवा उपलब्ध असलेल्या बाऊलमध्ये काढून ७ ते ८ तासांसाठी रेफ्रिजरेट करुन घ्यावी.
१२. ७ ते ८ तासानंतर फिरनी संपूर्णपणे सेट झाल्यानंतर खाण्यासाठी सर्व्ह करताना त्यावर थोडेसे ड्रायफ्रुटसचे बारीक काप व रोज सिरप घालून फिरनी खाण्यासाठी सर्व्ह करावी.
रणरणत्या उन्हाळ्यांत थंडगार शाही गुलकंद फिरनी खाण्यासाठी सर्व्ह करावी.