Join us  

काजू न घालताही शाही पनीरची ग्रेव्ही होईल घट्ट आणि चविष्ट, 3 युक्त्या शाही पनीर मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2022 10:11 AM

शाही पनीर (shahi paneer ) करायचं तर मनसोक्त काजू वापरता यायला हवेत. पण काजूच नसतील तर शाही पनीरचा बेत कसा होईल? अशा वेळेस काजूशिवाय शाही पनीरची ग्रेव्ही (how to make shahi paneer gravy thick without using cashew) करा. त्यासाठी सोप्या युक्त्या आहेत. 

ठळक मुद्देदही, साय आणि कांद्या टमाट्याच्या प्युरीनं शाही पनीर करता येतं तेही काजूशिवाय.

घरातल्या घरात छोटी पार्टी असेल किंवा कसलं तरी स्पेशल सेलिब्रेशन करायचं असेल तर जेवणात पनीरचा (paneer)  पदार्थ हवाच. पनीर मसाला, शाही पनीर ( shahi paneer) अशा पनीरच्या ग्रेव्ही असलेल्या भाज्या करायच्या असतील तर भरपूर मसाल्यांसोबत काजूही भरपूर् लागतात. पण दिवसेंदिवस सुकामेव्याचे भाव वाढतच आहे. त्यामुळे शाही पनीरसारख्या भाज्या करताना मनसोक्त काजू वापरायला जीव कचरतो. त्यापेक्षा एवढी महागाची डिशच नको म्हणून घरी शाही पनीर करण्याचा प्लॅन कॅन्सल केला जातो.

Image: Google

पण त्याची काही गरज नाही. काजूशिवायही शाही पनीर  (how to make shahi paneer gravy thick without using cashew) करता येतं आणि काजू न वापरताही काजूसारखी दाटसर ग्रेव्ही करता येते. काजूशिवाय शाही पनीरला घट्टपणा कसा येईल? असा प्रश्न पडला असेल तर त्याचं उत्तर म्हणजे दही, साय आणि कांद्या टमाट्याच्या प्युरीनं शाही पनीर करता येतं तेही काजूशिवाय. या युक्ता वाचून बघा आणि त्या वापरुन काजूशिवाय शाही पनीर एकदा करुन बघाच!

शाही पनीरची ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी..

Image: Google

1. घरात काजू नसतील आणि शाही पनीरचा बेत आखलेला असेल तर जरुर करा. त्यासाठी दह्याचा वापर करावा. शाही पनीर करताना जेव्हा टमाट्याची प्युरी टाकून परतून घेतली जाते तेव्हा त्यानंतर लगेचच दही फेटून हळूहळू घातल्यास दही फाटत नाही. दह्यामुळे ग्रेव्हीचा पोत चांगला जमून येतो. दही मिसळल्यानंतर त्यात क्रीम किंवा ताजे साय टाकावी. इतर सर्व मसाले घालून ग्रेव्ही तयार करावी. अशा पध्दतीनं शाही पनीर करताना ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी काजूची गरज पडत नाही. साय आणि दही एकत्र करुन फेटून ते टमाट्याची प्युरी परतून घेतल्यानंतर टाकलं तरी चालतं. 

Image: Google

2.  काजूच्या ऐवजी घरगुती साय वापरल्यास शाही पनीरची ग्रेव्ही मनासारखी दाटसर होते. जेव्हा कांदा न घालता भाजीसाठी ग्रेव्ही करता तेव्हा टमाट्याची प्युरी परतून झाल्यानंतर त्यात लगेच 3 ते 4 चमचे घरगुती साय घालावी. नंतर यात शाही पनीरसाठी लागणारे इतर मसाले घालावेत. मसाले घातल्यानंतर साय मिश्रणात चांगली एकजीव केल्यास ग्रेव्हीला छान सुगंधही येतो.  सायीसोबत कच्च्या शेंगदाण्याचा थोडा कूट घातला तरी शाही पनीरची ग्रेव्ही दाटसर होते. 

Image: Google

3. केवळ कांदा टमाट्याचा वापर करुनही शाही पनीरची ग्रेव्ही घट्ट करता येते. यासाठी कढईत थोडं तेल घालावं. त्यात खडे मसाले घालून ते परतून घ्यावेत. नंतर यात कांदा आणि टमाटा जाडसर चिरुन घालावा. 2-3 मिनीटं कांदा टमाटा परतून घ्यावा. ते थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावं. कांद्या टमाट्याचं हे मिश्रण मग बटरवर परतून घ्यावं. त्यात मसाले आणि ताजं क्रीम घालून 4-5 मिनिटं हे मिश्रण परतल्यावर काजू न वापरताही शाही पनीरची ग्रेव्ही दाटसर येते. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सपाककृती