उन्हाळा म्हटलं की आपण शरीराला थंडावा देणारे पदार्थ आवर्जून करतो. थंडीच्या दिवसांत ज्याप्रमाणे आपण गरम पदार्थ खातो, त्याप्रमाणे उन्हाळ्यात आपण गार, आणि तोंडाला चव आणणारे पदार्थ करतो. उन्हाळ्याच्या दिवसांत हमखास केले जाणारे पदार्थ म्हणजे दही भात, दही चाट आणि दही वडे. उडदाचे वडे आणि त्यावर आंबट-गोड चवीचे दही हा अनेकांना आवडणारा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार (How To Make Soft Dahi Wada or Dahi Bhalle Recipe).
मात्र कधी वड्यांचं गणित चुकतं तर कधी दही मनासारखं होत नाही. मग हा बेत आपल्याला हवा तसा होत नाही. म्हणूनच दही वडे करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर अतिशय सोप्या पण महत्त्वाच्या टिप्स आपल्याशी शेअर करतात. तेव्हा तुम्हीही दही वडे करण्याचा प्लॅन करत असाल तर या टिप्स नक्की लक्षात ठेवा.
१. दही वडे करताना त्याचं पीठ ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. आपण उडदाची डाळ भिजवतो आणि मग ती मिक्सरमधून काढतो. त्यानंतर आपण हे पीठ एका भांड्यात काढून ठेवतो. पण त्यानंतर ते हातानी चांगलं फेटायला हवं. त्यामुळे त्यात हवा जाते आणि पीठ चांगलं एकजीव होऊन वडे हलके व्हायला मदत होते. ही स्टेप आपण केली नाही तर आपले वडे मऊ न होता ते कोरडे आणि कडक होतात. मग त्यामध्ये दही योग्य पद्धतीने मुरत नाही.
२. वडे तळल्यानंतर आपण ते पाण्यातून काढतो आणि मग दह्यामध्ये घालतो. पण हे पाणी कोमट असायला हवं. ते जास्त गरम किंवा जास्त गार असेल तर वडे नीट मऊ होत नाहीत.
३. तसंच जास्त प्रमाणात वडे करायचे असतील आणि आधीच करुन ठेवणार असाल तर ते तळल्यानंतर पाण्यात न घालता डीप फ्रिज करुन ठेवायचे. असे केल्यास आपण हे वडे एक महिन्यापर्यंत केव्हाही खाऊ शकतो. फ्रिजमध्ये ठेवलेले वडे काढायचे, कोमट पाण्यात घालायचे आणि मग दह्यात घालायचे.