Join us  

विकतसारखं मुलायम पनीर घरी करण्यासाठी ५ युक्त्या, पनीर होईल मस्त आणि अगदी झटपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2022 10:15 AM

घरी तयार केलेल्या पनीर बाबत अनेकांची तक्रार असते. घरी केलेलं पनीर कडक किंवा वातड होतं. पनीर तळून भाजीत वापरताना ते कडक होतं. पण काही युक्त्या वापरल्यास घरी तयार केलेलं पनीर ( how to make soft paneer at home) मऊ मुलायम होतं.

ठळक मुद्देदूध फाडताना दही वापरावं.गरम दुधात दही/ व्हिनेगर/ लिंबू घातल्यानंतर ते आणखी गरम करु नये.पनीर फ्रिजमध्ये जास्त दिवस ठेवल्यास कडक/ वातड होतं. 

पनीर सहज बाहेर विकत मिळतं. पण विकतचं पनीर महाग तर असतंच शिवाय त्यात भेसळ असण्याचीही शक्यता असते. आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक असलेलं पनीर आपल्या आहारात नियमित असायला हवं. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे पनीर घरी तयार (homemade paneer)  करणं. पण घरी तयार केलेल्या पनीर बाबत अनेकांची तक्रार असते. घरी केलेलं पनीर कडक किंवा वातड होतं. पनीर तळून भाजीत वापरताना ते कडक होतं. पण काही युक्त्या वापरल्यास घरी तयार केलेलं पनीर मऊ मुलायम (how to make soft paneer at home)  होतं. 

Image: Google

घरी पनीर तयार करताना..

1. मऊ मुलायम पनीर करण्यासाठी दूध फाडण्यासाठी दही वापरावं. दूध उकळल्यानंतर  गॅस बंद करावा.  1 लिटर दूध असल्यास दोन मिनिटानंतर त्यात दीड कप दही घालावं. दही घालून दूध दोन मिनिटं हलवून घ्यावं. दही घालून फाडलेल्या दुधाचं पनीर मऊ होतं शिवाय त्यात दह्यातले पोषक घटकही उतरतात.  दही टाकल्यानंतरही दूध उकळलं किंवा गरम करत ठेवलं तर पनीर कडक होतं. 

2. फाटलेलं दूध गाळून घेतल्यानंतर त्यावर एक ग्लास थंड पाणी घालावं. यामुळे पनीर जास्त कडक होत नाही. 

3. दूध फाटल्यानंतर गॅस लगेच बंद करावा. त्यात बर्फाचे तुकडे घालवेत. यामुळेही पनीर मुलायम होतं. 

4. पनीर तयार करण्यासाठी फुल क्रीम दूध घ्यावं. यामुळे पनीर चविष्ट, पौष्टिक आणि मऊ होतं. पनीरसाठी टोण्ड दूध वापरलं तरी चालतं. 

5. पनीर मऊ करण्यासाठी दुधात एक कप साय घालावी. 

Image: Google

तळल्यानंतर पनीर कडक होवू नये म्हणून...

1. भाजीसाठी पनीर तळताना गॅसची आच मध्यम ठेवावी. पनीर तळताना एका भांड्यात थंड पाणी घ्यावं. पनीर तळताना थोडे सोनेरी झाले की ते कढईतून काढून वाटीतल्या पाण्यात 5 ते 10 मिनिटं भिजवावेत. नंतर ते एका डिशमध्ये काढून मग भाजीत घालावेत. 

2. पनीर तळताना गॅसवर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात एकच चमचा मीठ घालून ते गरम करावं. पाणी गरम झाल्यावर त्यात तळलेले पनीर घालावं.     गॅस बंद करुन पनीर पाण्यात 5 मिनिटं ठेवावं. 5 मिनिटानंतर पनीर एका डिशमध्ये काढून घ्यावं. 

3. पनीर तळल्यानंतर कडक होवू नये यासाठी कच्चं पनीर 10 मिनिट पाण्यात भिजत घालावं.

4. पनीर तयार करुन फ्रिजमध्ये ठेवताना ते कधीही उघडं ठेवू नये. एका डब्यात झाकून ते फ्रिजमध्ये ठेवल्यास पनीर कडक होत नाही. 

5. घरी तयार केलेलं पनीर फ्रिजमध्ये 1 ते 2 दिवस मऊ राहातं. ते जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवल्यास कडक होतं. 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.