रोजच्या जेवणात चपाती, भाजी खाऊन कंटाळा आला की काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. नॉनव्हेज किंवा इतर भाज्यांबरोबर कधीतरी भाकरी खाण्याची इच्छा होते. (Rice Flour Bhakri Recipe Maharashtrian Tandalachi Bhakri) पण भाकरी बनवणं सर्वांनाच जमतं असं नाही. मऊ, लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिक सोपं होऊ शकतं.(How to make rice Bhakri )
तांदळाच्या भाकरीचं पीठ दळण्यापासून ते शेकण्यापर्यंत सगळी कामं काळजीपूर्वक करावी लागतात. अशात जर भाकरी व्यवस्थित बनली नाही तर जेवणाची मजा येत नाही. म्हणूनच भाकरी करण्याच्या ट्रिक्स माहित करून घेऊया. (How to make soft rice bhakri)
1) तांदळाची भाकरी करण्यासाठी सगळ्यात आधी दीड कप पाणी गरम करून घ्या. त्यात चिमुटभर मीठ घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर अतिरिक्त अर्धा कप पाणी काढून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस कमी करा आणि पाण्यात तांदळाचं पीठ घाला.
2) पीठ लाटण्यानं किंवा चमच्यांच्या साहाय्यानं हलवून घ्या. जर पाणी पाणी कमी वाटत असेल तर बाजूला काढून ठेवलेलं अर्धा कप पाणी पुन्हा घालून एकजीव करा. तुम्ही कोणत्या तांदळाचं पीठ वापरता, पीठ जाडसर दळलंय की बारीक हे सुद्धा महत्वाचं असतं. १ कप पीठासाठी सव्वा ते दीड कप पाणी लागतं.
3) व्यवस्थित उकड आल्यानंतर झाकण ठेवून वाफ काढून घ्या. नंतर गॅस बंद करून एका ताटात काढा आणि गरम गरम पीठ असताना मळून घ्या. पीठ थंड झालं तर व्यवस्थित मळलं जात नाही. हाताला पाणी लावून पीठ मऊ मळून घ्या. पीठ व्यवस्थित मळल्यानंतर एक गोळा हातात घ्या आणि त्याला चपटा करा. जर कुठेही भेगा नसतील तर समजा पीठ व्यवस्थित मळून झालं आहे. गोळ्याला कोरडं तांदळाचं पीठ लावून थापून घ्या किंवा लाटून घ्या.
4) भाकरी लाटताना नेहमी कडेकडे लाटावी. पोळपाट फिरवून भाकरी लाटा, जर लाटताना भाकरीच्या कडा तुटत असतील तर तव्याला तेल लावून लाटलेली भाकरी घाला आणि भाकरीला वरच्या बाजूनं पाणी लावून घ्या. कोणतीही बाजू कोरडी राहता कामा नये.
5) जर तुम्हाला हातानं पाणी लावायला जमत नसेल तर कापसाचा बोळा ओला करून त्याने भाकरीला लावू शकता. भाकरी अर्धवट शिजल्यानंतर उलटी करून घ्या आणि भाकरीच्या कडा दाबून पाहा. सर्व बाजूंनी भाकरी भाजल्यानंतर पटलून घ्या. सर्व बाजूंनी भाकरी टम्म फुगलेली दिसेल.