Join us  

पोळ्या पुरीसारख्या फुगाव्यात, रात्रीपर्यंत मऊ-लुसलुशीत राहाव्यात तर...पंकज भदौरीया सांगतात ४ खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2023 10:12 PM

How To Make Soft Roti's Tips by Pankaj Bhadauria : पोळी बराच काळ मऊ-लुसलुशीत राहावी यासाठी पीठ मळण्यापासून ते पोळ्या भाजण्यापर्यंत सगळ्या स्टेप्स परफेक्ट पद्धतीने जमायला हव्यात.

ठळक मुद्देपोळ्या मऊ असतील तरच जेवण चांगले होते, पाहूयात त्यासाठीच खास टिप्स...पण कधी पोळ्या वातड होतात तर कधी कडक

पोळ्या करणे हे स्वयंपाकातील एक सगळ्यात महत्त्वाचे आणि वेळखाऊ काम असते. भाजी, भात-आमटी, कोशिंबीर किंवा इतर पदार्थ करणे तुलनेने सोपे असते. पण पोळ्यांना बऱ्याच स्टेप्स असतात आणि त्यामध्ये बराच वेळही जाण्याची शक्यता असते. पोळी किंवा भाकरी हे आपल्याकडचे मुख्य अन्न असल्याने पोळ्यांना पर्यायही नसतो. पोटभरीच्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या असल्याने दुपारच्या जेवणात तरी आपण पोळी-भाजी आवर्जून खातोच. पोळ्या मऊ-लुसलुशीत व्हाव्यात यासाठी एकतर गहू चांगला असावा लागतोच पण पोळ्या करायची सरावही असावा लागतो (How To Make Soft Roti's Tips by Pankaj Bhadauria). 

अनेकदा थंडीमुळे किंवा पोळ्या करण्याची पद्धत चुकल्याने पोळ्या कधी वातड होतात तर कधी कडक होतात. पोळ्या हे मुख्य अन्न असल्याने पोळ्या चांगल्या नसतील तर जेवणातली सगळी मजाच जाते. पोळी बराच काळ मऊ-लुसलुशीत राहावी यासाठी पीठ मळण्यापासून ते पोळ्या भाजण्यापर्यंत सगळ्या स्टेप्स परफेक्ट पद्धतीने जमायला हव्यात. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया पोळ्या चांगल्या व्हाव्यात यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. पंकज के नुसकेमध्ये त्या पोळ्या पुरीसारख्या फुगण्यासाठी काय टिप्स देतात पाहूया...

१. पोळ्यांची कणीक भिजवताना साधे पाणी न वापरता थोडे कोमट पाणी वापरावे त्यामुळे कणीक जास्त मऊ भिजली जाते. 

२. कणीक खूप घट्ट न मळता मऊ मळावी. कणीक हाताने दाबल्यास बोट पुन्हा वर यायला हवे, त्यामुळे पोळ्या लुसलुशीत होतात. यासाठी कणीक थोडी जास्त वेळ मळावी. 

३. कणीक मळल्यानंतर लगेच पोळ्या न करता ती १५ ते २० मिनीटे झाकून ठेवावी. त्यानंतरच पोळ्या कराव्यात. यामुळे कणकेतील ग्लुटेनची क्रिया होते आणि पोळ्या मऊ होण्यास मदत होते. मधल्या वेळात आपण नाश्ता किंवा भाजी अशी इतर कामे करु शकतो. 

४. १५ ते २० मिनीटांनी कणीक पुन्हा एकदा हाताने मळावी आणि एकसारख्या पोळ्या लाटाव्यात. यामुळे पोळ्या मऊ-लुसलुशीत होण्यास मदत होते. 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती