साऊथ इंडीयन पदार्थ त्यातही इडली हा आपल्यापैकी अनेकांचा आवडीचा पदार्थ. झटपट होणारा आणि पोटभरीचा असल्याने बऱ्याचदा अनेक घरी इडली आवर्जून केली जाते. ब्रेकफास्टला किंवा अगदी रात्रीच्या जेवणालाही गरमागरम इडल्या मस्त वाटतात. अचानक कोणी पाहुणे येणार असले किंवा काही घाईगडबड असली की आपण इडली करतो. कधी चटणीसोबत तर कधी सांबारसोबत आपण इडली आवडीने खातो. पण ही इडली छान लुसलुशीत असेल तर ठिक. नाहीतर आपला सगळा मूडच जातो (How To Make Soft Spongy Idli Recipe).
इडलीचा रवा चांगला भिजला आणि आंबला की इडल्या मस्त फुगतात आणि मऊ होतात. अशी गरमागरम इडली नुसती खाल्ली तरी छान लागते. पण हे पीठ नीट भिजले नाही तर मात्र इडल्या भगऱ्या किंवा कोरड्या होतात, मग त्या घशाखालीही इतरत नाहीत. कधी त्या इतक्या कडक होतात की अजिबातच फुगत नाहीत. अशावेळी आपल्या इडलीचा बेत फसतो आणि मग त्याचे डोसे किंवा आणखी काही करुन आपल्याला वेळ मारुन न्यावी लागते. पाहूया इडली परफेक्ट होण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.
१. एका बाऊलमध्ये १ वाटी उडीद डाळ २ तासासाठी भिजत घालायची. दुसऱ्या एका बाऊलमध्ये इडलीचा तांदूळ ४ तासांसाठी भिजत घालायचा. अनेकदा आपण हे दोन्ही एकत्र भिजवतो, पण तसे न करता वेगळे भिजवावे.
२. आधी उडदाची डाळ मिक्सर किंवा ग्राईंडरमधून अंदाजे पाणी घालून बारीक करुन घ्यावी. त्यानंतर तांदूळ मिक्सरमधून बारीक करावा.
३. ही दोन्ही बारीक केलेली पीठे हाताने एकजीव करावीत म्हणजे त्यातील आंबण्याची क्रिया चांगली होण्यास मदत होते. आपण बरेचदा पीठ हलवण्यासाठी डावाचा वापर करतो, त्यापेक्षा हात घालून पीठ हलवावे.
४. रात्रभर म्हणजे किमान ८ तास हे पीठ झाकून तसेच ठेवावे. म्हणजे ते चांगले आंबते आणि फुगते. बरेचदा आपण घाईत ३ ते ४ तासच पीठ आंबवायला ठेवतो, पण त्यामुळे आंबण्याची क्रिया पूर्ण होत नाही आणि पीठ पूर्णपणे फुगत नाही.
५. एकदा पीठ आंबले आणि चांगले फुगले असेल तर ते परत जास्त हलवू नये. फुगल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ घालावे आणि गरजेपुरतेच एकजीव करावे.