सोलकढी (Solkadhi) हा कोकणी पदार्थ असला तरी महाराष्ट्राच्या सगळ्या भागात साधारणपणे सोलकढी केल जाते. नारळ आणि कोकम यांचे उत्पादन कोकणात जास्त प्रमाणात होत असल्याने तिथल्या पारंपरिक पदार्थांबरोबर सोलकढी आवर्जून प्यायली जाते. चवीला आंबट गोड आणि भरपूर पौषक तत्तव असणारी ही सोलकढी आरोग्यासाठीही तितकीच चांगली असते. कोकणात सगळ्या ऋतूंमध्ये सोलकढी प्यायली जात असली तरी उन्हाळ्यात मात्र तहान शमवण्यासाठी आणि तोंडाला चव येण्यासाठी सोलकढी आवर्जून प्यायली जाते (Benefits of Solkadhi). कोकमामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, डाएटरी फायबर्स, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम घटक मुबलक असतात. पाहूयात सोलकढी पिण्याचे फायदे आणि ती तयार करण्याची पद्धत (How to make Solkadhi)
फायदे -
१. पचायला जड आणि चमचमीत पदार्थ खाल्ल्यानंतर अपचनाचा त्रास होण्याची शक्यता असते. यामध्ये करपट ढेकर येणे, गॅसेस, अॅसिडीटी, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात. अशावेळी सोलकढी प्यायल्याने पोटाला आराम मिळतो.
२. उन्हाळ्यात डीहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी सोलकढी हे उत्तम एनर्जी ड्रिंक आहे. शरीरातील उष्णता, पित्त शमवण्याची क्षमता सोलकढीत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात मधल्या वेळेला किंवा जेवणानंतर सोलकढीचा पिणं अधिक फायदेशीर आहे.
३. अनेकदा लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही जंताची समस्या उद्भवते. ही समस्या कमी करण्यासाठी सोलकढी फायदेशीर ठरते. यातील अॅन्टीऑक्सिडंट्स घटक अॅलर्जीचा धोका कमी करण्यास मदत करतात.
४. सोलकढीमध्ये आलं-लसणाची फोडणी असल्याने सर्दी, मळमळ, पचनक्रियेत बिघाड झाल्याने वाढणारी अस्वस्थता कमी होते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास सोलकढी फायदेशीर असते.
५. त्वचेचे आरोग्य खुलवण्यास,त्वचा अधिक सतेज करण्यास आणि एजिंगची प्रक्रिया थोडी पुढे ढकलण्यास मदत होते. परिणामी चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येण्याचं प्रमाण कमी होते.
६. कोकमामध्ये असणारे मिनरल्स रक्तातल्या साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यास, त्यामध्ये होणारा चढ -उतार आटोक्यात ठेवण्यास मदत करतात. तसेच ह्रद्यविकाराचा धोकाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते. त्यामुळे जेवणानंतर मधुमेहींनी प्रमाणात सोलकढी पिणं फायदेशीर आहे.
सोलकढी कशी करायची ?
साहित्य -
१. ताज्या नारळाचं दूध
२. कोकम
३. हिरवी मिरची
४. कोथिंबीर
५. लसूण
६. साखर
७. मीठ
कृती -
१. एक कप ताज्या खोबऱ्याचे तुकडे आणि एक कप पाणी मिक्सरमधून काढा. या चोथ्याचे पाणी एका कापडातून गाळून घ्या. असे करायचे नसेल तर बाजारात मिळणाऱ्या रेडीमेड नारळाच्या दूधाचाही वापर करु शकता.
२. पाण्यात कोकम भिजवून त्याचा अर्क निघेल तो या दूधात घाला.
३. लसूण आणि मिरची आवडीनुसार बारीक ठेचून घाला. हे दोन्ही नको असेल तर नाही घातले तरी चालते.
४. साखर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे मिश्रण गार होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.
५. काही वेळाने गारेगार सोलकढी जेवणासोबत प्यायला घ्या.