मुंबईचे नाव तोंडात येताच आपल्याला तिथल्या बऱ्याच प्रसिद्ध गोष्टींची आठवण येते, त्यापैकी मुंबईतील एक प्रसिद्ध गोष्ट आठवते ती म्हणजे वडापाव ! मुंबईत सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये वडापाव हा प्रथम क्रमांकावर आहे. कमी पैशांमध्ये पोट भरणाऱ्या खाद्यपदार्थात वडापावचा समावेश होतो. आज मुंबईत दिवस - रात्र केव्हाही या आपल्याला वडापाव खायला मिळेल. वडापाव केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात खायला मिळतो. एवढेच नाही तर विदेशामध्ये देखील वडापाव खायला मिळतो.
प्रत्येक मराठी माणसाला आवडणारा एक खमंग, रुचकर पदार्थ सांगायचा तर ‘वडा-पाव’ हेच नाव समोर येतं. मस्त मऊ पावाला हिरवी, लाल लसूण चटणी लावून त्यात गरमागरम वडा ठेवून सोबत तळलेली हिरवी मिरची अशा प्रकारे वडापाव सर्व्ह केला जातो. वडापावची खरी चव ही त्यात असणाऱ्या चटणीमुळे येते. वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी वडापावची लज्जत आणखीनच वाढवते. रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या ठेल्यावर वडापाव सोबत दिली जाणारी लाल सुकी तिखट चटणी आपण घरच्या घरी बनवू शकतो. ही चटणी आपण बनवून घरी हवाबंद डब्यांत स्टोअर करून ठेवू शकतो(Recipe : How to make special red dry garlic chutney served with vada pav at home).
साहित्य :-
१. बेसनाचा तळून घेतलेला चुरा - १ कप २. लसूण पाकळ्या तळलेल्या - ५ ते ६३. मीठ - चवीनुसार ४. लाल मिरची पावडर - २ टेबलस्पून५. बेसन - ४ टेबलस्पून ६. पाणी - आवश्यकतेनुसार ७. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
वडापावसोबत दिली जाणारी लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची? व यासाठी लागणारे साहित्य व कृती काय आहे ते समजून घेऊयात. foodieklix या इंस्टाग्राम पेजवरून लाल सुकी लसूण चटणी घरी कशी बनवायची याबद्दलचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
बेसनाचा तळून घेतलेला कुरकुरीत चुरा बनविण्याची कृती :- १. सर्वप्रथम बेसन आणि पाणी घेऊन त्याचे एकजीव मिश्रण तयार करा. भज्यांसाठी आपण जसे बेसन पीठ भिजवतो तसेच बेसन पीठ भिजवून घ्या. २. आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते गरम करा. या गरम तेलांत हे बेसन पीठ हातांच्या मदतीने सोडून घ्या. ३. आता हे बेसन तळून झाल्यावर बाहेर काढून घ्या. या कुरकुरीत बेसनाचा चुरा करून घ्या. ४. याच तेलांत ५ ते ६ लसूण पाकळ्या सालीसकट तळून घ्या.
वडापावची लाल सुकी लसूण चटणी बनविण्याची कृती:- १. सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कुरकुरीत बेसनाचा चुरा घ्या. २. आता यात तळून घेतलेल्या ५ ते ६ लसणाच्या पाकळ्या सालीसकट घाला. ३. त्यानंतर चवीनुसार मीठ, लाल तिखट मिरची पावडर घालून घ्यावी.४. आता हे सगळे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्यावे.
वडापावसोबत खायची लाल सुकी लसूण चटणी तयार आहे. ही चटणी आपण एका हवाबंद काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता.