संध्याकाळी चहासोबत काही ना काही खायला लागतंच. सारखी बिस्किटं आणि फरसाण, चिवडा खाणं हे आरोग्यासाठी हानिकारक असतं. म्हणून मधून मधून अशा चटपटीत पदार्थांना आराम देण्यासाठी आरोग्यदायी पदार्थही करावेत. पण आरोग्यदायी पदार्थ करणं म्हणजे ते चवीला सपक असतात असं नाही. चटपटीत स्वादाचे पदार्थही संध्याकाळच्या चहासोबत करता येतात त्यासाठी फक्त तसे पर्याय माहीत असायला हवेत. मसाला डोसा हा तर बऱ्याच जणांचा आवडीचा पदार्थ. पण संध्याकाळच्या चहासोबत कोणी मसाला डोसा खाईल का? मसाला डोशाचा विषय यासाठी काढला कारण मसाला डोश्याप्रमाणे स्टफ्ड मसाला इडलीही (stuffed masala idli) करता येते. शिवाय ती झटपट होते. रव्याची असल्यानं पचायला सुलभ आणि पौष्टिक (easy and healthy idli) असते. ही स्टफ्ड मसाला इडली करायलाही (how to make stuffed masala idli) अत्यंत सोपी आहे.
Image: Google
स्टफ्ड मसाला इडली कशी करणार?
स्टफ्ड मसाला इडली करण्यासाठी 2 वाट्या रवा, पाऊण वाटी दही, खाण्याचा सोडा, थोडं तेल घ्यावं तर इडलीत भराव्या लागणाऱ्या मसाल्यासाठी 4 बटाटे, 5-6 कढीपत्त्याची पानं, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला, अर्धा चमचा मिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे मोहरीचं तेल घ्यावं.
Image: Google
स्टफ्ड मसाला इडली करण्यासाठी सर्वात आधी इडलीत भरण्यासाठी मसाला तयार करुन घ्यावा. त्यासाठी बटाटे उकडून घ्यावेत. उकडलेले बटाटे सालं काढून कुस्करुन घ्यावेत. नंतर कढईमध्ये मोहरीचं तेल घ्यावं. ते गरम झालं की त्यात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी. नंतर वर सांगितलेले सर्व मसाले घालावेत. मसाला फोडणीत परतून घेतला की त्यात कुस्करलेले बटाटे घालावेत. बटाटा चांगला परतून घेतला की गॅस बंद करुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
Image: Google
मसाला झाला की इडली करण्याची तयारी करावी . यासाठी रव्यात दही मिसळून ते एकजीव करावं. त्यात इडलीच्या पिठाप्रमाणे सरसरीत पीठ होण्यासाठी थोडं पाणी घालावं. नंतर यात मीठ घालावं. मीठ घातल्यानंतर त्यात पाव चमचा खाण्याचा सोडा घालून मिश्रण चांगलं फेटून घ्यावं. इडलीच्या कुकरमध्ये पाणी घालून त्याला उकळी आणावी. इडलीच्या भांड्याला तूप लावून ग्रीस करावं. नंतर त्यात थोडं इडलीचं पीठ घालावं. मग यात बटाट्याचा मसाला घालावा. वरुन थोडं इडलीचं पीठ घालावं. इडल्या नेहमीप्रमाणे वाफवून घ्याव्या. वाफवलेल्या इडल्या तशाच खाल्ल्या तरी छान लागतात. किंवा आणखी चटपटीत चव हवी असल्यास थोडी तेलाची फोडणी करावी. त्यात थोडं तिखट, चाट मसाला घालून या फोडणीत इडलीचे तुकडे करुन इडली परतून घ्यावी.