पराठे खायला आवडतात (stuffed paratha) पण करायला नकोसे वाटतात. लाटताना मध्येच फाटतात, पीठ लावून लाटता लाटता नुसता राडा होतो. पराठा लाटताना पोळपाटाला तरी चिटकतात नाहीतर भाजताना सारण बाहेर येवून तवा खराब होतो. पराठे लाटताना बिघडत असल्यामुळे ते करायलाही वेळ लागतो.. आवडत्या पराठ्याच्या सोबत होणाऱ्या या नावडत्या गोष्टी टाळता येणं सहज शक्य आहे. त्यासाठी काही ( how to make stuffed paratha without breaking) सोप्या युक्त्या आहेत.
पराठे करताना..
1. पराठे नीट लाटता यावे यासाठी पराठ्यांसाठीचं पीठ मळताना विशेष काळजी घ्यावी लागते. पराठा लाटताना फुटू नये म्हणून पीठ थोडं घट्टसर मळावं. ते खूप सैल असता कामा नये.
2. पराठ्यांचं सारण भरताना लाटी मोठी करताना लाटीचा मधला आणि कडेचा भाग जाडसर ठेवावा. यामुळे सारण भरुन पराठे लाटताना ते मध्यभागी फुटत नाही किंवा कडेकडून बाहेर निघत नाही. लाटीमध्ये सारण भरताना ते हलक्या हातानं भरावं. फार दाबून भरु नये.
3. पराठा लाटताना गव्हाचं पीठ वापरण्याऐवजी मैद्याचा किंवा तांदळाच्या पिठाचा वापर करावा. यामुळे पराठा लाटताना पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकून फाटत नाही.
Image: Google
4. पराठा लाटताना सारण बाहेर येऊन पराठा फाटू नये यासाठी पीठात मीठ घालवं. पण सारणात थोडं कमी मीठ घालावं. यामुळे सारणाला पाणी सुटत नाही. सारणात मीठ जास्त घातलं तर सारणाला पाणी सुटतं आणि पराठा लाटताना तो पोळपाटाला चिटकतो.
5. पराठ्यासाठीची लाटी हातानं मोठी करावी. लाटण्यानं मोठी केल्यास कडा किंवा लाटीचा मध्यभाग पातळ होतो. लाटी बोटांनी मोठी केल्यास जाडसरपणा राहातो. लाटीत सारण भरुन ती बंद केल्यावरही थेट पराठा लाटण्यानं लाटू नये. तो जास्तीत जास्त हातानं कडा दाबून मोठा करावा. आणि मग पोळपाटावर मैदा किंवा तांदळाचं पीठ पसरवून पराठा लाटावा. पराठा लाटताना तो अगदी हलक्या हातानं लाटावा. पराठा फक्त एकाच बाजून न लाटता दोन्ही बाजूंनी लाटावा.