काहीवेळा आपल्याला रोजच्या जेवणांत त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. अशावेळी आपल्याला भाजी ऐवजी काहीतरी वेगळं चमचमीत, चटपटीत खावंसं वाटतं. असे झाल्यास आपण जेवणात पापड, लोणची, भजी, काप यांसारखे पदार्थ तोंडी लावण्यासाठी घेतो. कधीतरी रोजच्या जेवणात पोळी किंवा भातासोबत भाजी न खाता काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होतेच. त्यावेळी आपण वांग्याचे काप, बटाट्याच्या काचऱ्या, सुरणाचे काप असे चटपटीत, चमचमीत पदार्थ बनवून खातो.
आपल्या समोरील ताटात कितीही आवडीचं जेवण असलं तरीही, रोजच्या जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी चटपटीत असावे असं वाटतंच. अशा परिस्थितीत आपण वेगवेगळ्या भाज्यांचे चमचमीत काप घरच्या घरीच बनवतो. आपल्याकडील बऱ्याच घरांत जेवणात तोंडी लावण्यासाठी म्हणून झटपट सुरणाचे काप केले जातात. बहुतेक लोकांना सुरणाची भाजी खायला आवडत नाही. सुरणाची भाजी खाताना अनेकांची नाकं मुरडली जातात, पण सुरणाचे चमचमीत काप केले की घरातले सगळेचजण या सुरणाच्या कापांवर ताव मारतात. घरातल्या सगळ्यांचीच नावडती भाजी वेगळ्या प्रकाराने करुन खाऊ घालण्याचा आनंद यातून घरच्या गृहिणीला होतो. घरच्या घरी झटपट सुरणाचे काप कसे बनवायचे त्याचे साहित्य व कृती पाहूयात(How To Make Surnachi Kaap At Home).
साहित्य :-
१. सुरण - पाव किलो २. आलं लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ३. हळद - १ टेबलस्पून ४. मिरची पावडर - १ टेबलस्पून ५. धणे पावडर - १ टेबलस्पून ६. मीठ - चवीनुसार ७. चिंचेचा कोळ - २ टेबलस्पून ८. रवा - १/२ कप ९. तांदूळ पीठ - १/२ कप १०. तेल - ४ ते ५ टेबलस्पून
कृती :-
१. सर्वप्रथम सुरण स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्यावी. साल काढून झाल्यावर सुरणाचे त्रिकोणी आकारातील काप करुन घ्यावे. हे काप पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत. (सुरण कापण्यापूर्वी हाताला तेल किंवा आमसुल (कोकम) लावून घ्यावे आणि मगच सुरण हाताळावे.)२. आता एका बाऊलमध्ये आलं लसूण पेस्ट घेऊन त्यात हळद, मिरची पावडर, धणे पावडर, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ घालून मॅरिनेशन पेस्ट तयार करुन घ्यावे. ३. त्यानंतर ही तयार केलेली मॅरिनेशनची पेस्ट सुरणाच्या त्रिकोणी कापांना लावून घ्यावी.
४. आता एका दुसऱ्या बाऊलमध्ये, रवा आणि तांदळाचे पीठ समप्रमाणात घेऊन त्यात लाल मिरची पावडर आणि मीठ घालून हे पीठ एकजीव करुन घ्यावे. सुरणाच्या कापांसाठी कोटिंग तयार करुन घ्यावे. ५. मॅरिनेशनची पेस्ट लावून ठेवलेली सुरणाची काप रवा आणि तांदळाच्या पीठापासून तयार केलेल्या कोटिंगमध्ये घोळवून घ्यावीत. ६. त्यानंतर एका पॅनमध्ये तेल घेऊन, तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर ही सुरणाची काप दोन्ही बाजूंनी खरपूस तळून घ्यावीत.
सुरणाचे खरपूस, चमचमीत काप खाण्यासाठी तयार आहेत. हे सुरणाचे काप आपण पोळी किंवा गरमागरम डाळ भातासोबत खाऊ शकतो.