उन्हाळा आणि शहाळ यांचं पूर्वीपासूनचे एक अतूट नाते आहे. उन्हाळ्यांत गरम उन्हाच्या झळांपासून शरीराला गारवा मिळण्यासाठी आपण सतत काही थंडगार पीत असतो. उन्हाळ्यांत सहसा आपण लिंबू सरबत, शीतपेय, फळांचे रस, शहाळ्याचे पाणी, कोकम सरबत, कैरीच पन्ह अशा अनेक थंडगार पदार्थांचा आस्वाद घेत असतो. उन्हाळ्यांत सर्वांच्याच आवडीचे असणारे शहाळाचे पाणी रस्तोरस्ती अतिशय सहजरित्या मिळते. घामाने अंग भिजलेले असताना थंडगार, गोड शहाळ फोडून त्यात स्ट्रॉ घालून पिण्याची मजा आपण लहानपणी सगळ्यांनीच अनुभवली असेल. रणरणत्या उन्हांमुळे आलेला शारीरिक थकवा दूर करण्याचे सर्वात मोठे काम शहाळाचे पाणी करते. शहाळ पिऊन झाल्यावर त्यातील मऊ, लुसलुशीत मलई खाणे म्हणजे स्वर्गसुखच. उन्हाळ्यांत शहाळाचे पाणी पिण्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.
उन्हाळ्याचा हंगाम सुरु झाला की अशावेळी आपल्याला खूप तहान लागते, घसा कोरडा पडतो. त्याचबरोबर अनेकदा लोक डिहायड्रेशनचे बळी ठरतात. त्यामुळे या ऋतूत शरीर हायड्रेटेड ठेवणं खूप गरजेचं आहे. उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आपण शहाळाचे पाणी तर आवर्जून पितोच. परंतु या शहाळाचे पाणी व मलई वापरुन आपण घरच्या घरी झटपट कोकोनट मिल्कशेक तयार करु शकतो. शहाळ्याच्या पाण्याचा व मलईचा वापर करुन आपण थंडगार कोकोनट मिल्कशेक बनवण्याची सोपी कृती पाहूयात(How To Make Tender Coconut Homemade Milkshake At Home).
साहित्य :-
१. शहाळ्याचे पाणी - १ ते २ कप २. शहाळ्याची मलई - १ कप ३. प्लेन वॅनिला आईस्क्रीम - २ स्कुप ४. पिस्त्याचे काप - १ टेबलस्पून (पर्यायी)
कच्च्या कैरीची आईस कँडी आता सहज करा घरच्याघरी, शेफ तारला दलाल रेसिपी...
कृती :-
१. सर्वप्रथम शहाळ फोडून त्यातील सगळे पाणी एका भांड्यात काढून घ्यावे. २. आता याच शहाळ्याच्या पाणी घेतलेल्या भांड्यात, शहाळ्याच्या आतील मलई देखील काढून घ्यावी. थोडी मलई सर्व्हिंगसाठी बाजूला काढून ठेवावी. ३. मिक्सरचे मोठे भांडे घेऊन त्यात शहाळ्याचे पाणी, शहाळ्याच्या आतील मलई व आपल्या आवडीनुसार प्लेन वॅनिला आईस्क्रीमचे स्कुप घालावेत.
४. आता हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकजीव होईपर्यंत वाटून घ्यावे. ५. शहाळ्याचे मिल्कशेक तयार झाले आहे ते आता एका सर्व्हिंग ग्लासमध्ये काढून घ्यावे. ६. शहाळ्याचे मिल्कशेक सर्व्ह करताना त्यावर थोडेसे मलईचे तुकडे व पिस्त्याचे काप घालून पिण्यासाठी सर्व्ह करावे. (आपल्याला जर हे मिल्कशेक थंडगार प्यायचे असल्यास थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा किंवा त्यात बर्फाचे खडे घालून सर्व्ह करावे.)
काहीतरी गारेगार खावेसे वाटते? करा झटपट फ्रूट कस्टर्ड, करायला सोपे आणि खायला मस्त...
थंडगार कोकोनट मिल्कशेक पिण्यासाठी तयार आहे.